अंडा पिठले...................................
हा नवीन पदार्थ नाही. तर अंडा करीचे चुकून झालेले रुप आहे. अंडा करी हा अत्यंत सोपा, मुलांत व पुरुषात अत्यंत लोकप्रिय कारण करण्यास सोपा पदार्थ आहे. काही जास्त असले तर ती जास्त छान होत नाही आणि काही कमी पडले तर बिघडतही नाही.
फिरुन येता येता मित्र भेटले. गप्पा मारुन झाल्या . राजकारणात बरीच धुमधाम चालू असल्यामुळे ह्याच काय होईल ? त्याच काय होईल ? अशा गप्पा सगळीकडे जोरात सुरु असतात.
त्यांना काय करायचे ते करतच असतात आपण आपले गप्पांचे धनी.
"बरे ते जाऊदे? जेवायचे काय करतोयस?" सुबोध म्हणाला. "काय करणार? मी एकटाच आहे. ये जेवायला. " ह्या रमेशला पण घेऊन ये."
या रमेशच्या पाहुण्यांची पोल्ट्री आहे. त्यामुळे त्याच्याकडे कधीकधी अंडी शिल्लक असतात. " एक फोन करुन सांगतो." रमेशने आपल्या नेहमीच्या सवयीने म्हटले.
"बर , कर फोन. मी आणि सुबोध पोळ्या, भाकरी मिळेल ते घेऊन जातो. " मी म्हटले. आम्ही निघालो. वाटेत पोळ्या घेतल्या.
घरी पोचलो. करीची तयारी ती काय ?दोन मोठे कांदे, एक टोमॕटो, तीन मिरच्या , आल्ले, लसूण, परतले. मिक्सरमधून काढले. मस्त लालसर ग्रेव्ही तयार झाली.
उरलेला बारिक कांदा परतला. खडा मसाला , तिखट, मीठ, मसाला घातला. ग्रेव्ही घातली. आता अंडी शिजवुन सोडली की संपले. " तो रम्या कुठे अडकलाय, बघ" सुबोधला म्हटले. तो रमेशला फोन करणार येव्हढ्यात दार वाजले. आला बघ शहाणा. "कित्ती उशीर?" करी झाली सुद्धा. तू आता अंडी आणलीस म्हणजे झाले.
"तर मग मी काय विसरतोय काय?" हे बघ. म्हणून रमेशने एक प्लॕस्टीकचा चपटा डबा काढला.पाणी तापायला ठेवले.
डबा उघडला. तो थंडगार लागत होता. "हे काय रे? फ्रीझमध्ये होता वाटत?" मी म्हटले. पाहिले आणि चकितच झालो. दोन अंडी फुटून पांढरा, पिवळा बलक डब्यात पसरला होता. चार अंडी दिसत होती. एक उचलले. तर त्यालासुद्धा चांगलेच भोक होते. ते धरले तर तेही फुटल्याचे समजले.
बाकीची तीन अंडीसुद्धा तशीच फुटलेलीच होती. मग सरळ ती फोडून सगळा रस एकत्र केला. लगेच तो गावरान अंडा करीचा त्या आजीचा व्हिडीओ आठवला.
करी तयार करुन अंडी डायरेक्ट फोडून घालायची. अचानक पाहुणा आला तर करायची रेसीपी. झटकन होणारी. कडक लागणारी.
इथे तशी अंडीही नव्हती. आता रमेश परत जाणे शक्यच नव्हते. त्यांना पदार्थाच्या कृतीत किंवा आकृतीत फारसा रस नव्हताच. त्याचाच फायदा घ्यायचे ठरवले. शिवाय रमेशानेच अशी अंडी आणल्यामुळे काही म्हणण्याचा त्याला अधीकारही नव्हता.
सरळ डबा उचलला. गरम, गरम, करीत, हळूहळू सर्व अंड्याचा रस मिसळला. प्रथम जरा करी पातळ झाली आणि दोन तीन मिनीटांत सर्व अंडी फुटून, शिजून, पांढऱ्या, पांढऱ्या , कणांनी कढई भरुन गेली. ती झाकून ठेवली.
जेवताना कढई उघडली. पोळ्यांबरोबर ते फारच सुंदर लागले , आणि अंडा पिठल्याचा जन्म झाला.
Comments
Post a Comment