के.बी. ..............................

 वेगळेवेगळ्या विषयांवर लिहील्यानंतर आता एका खास स्थानविशेषा विषयी लिहीणार आहे. तशी प्रत्येक गावात जिव्हाळ्याच्या काही जागा असतात तसेच आमच्या गावातील अगदी मध्यवस्तील एक हाॕटेल होते. त्याने कित्येक पिढ्यांना वेड लावले होते , ते आता नाही पण त्याच्याबद्दल प्रत्येक मुलाच्या काहीना काही आठवणी निश्चितच असतील. ते म्हणजे " श्री. कृष्ण भुवन ." परंतु सर्वांच्या आवडीचे नाव के.बी.

आमचे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असल्याने एके काळी सगळीकडे होती तशी उडपी लोकांची खूप हाॕटेल होती. आता सगळीकडचीच उडपी मंडळी वेगळेवेगळ्या कारणांसाठी धंद्यातुन बाहेर पडली आहेत. कामगार न मिळणे, नवीन पिढी धंदा करण्यास उत्सुक नसणे ही मुख्य कारणे आहेत.
साधारण काॕलेजात जायला जायला सुरवात आणि के.बी.त दिवसातुन कमीतकमी एक दोनदा के.बी.त आपोआप जाणे होत असे.
गिऱ्हाईक फार वेळ जागा अडवून बसू नये या हेतूने हाॕटेलात पेपर न ठेवणे रेडिओ लावून ठेवणे परंतु त्यात क्वचितच ओळखीचे स्टेशन लावणे अशा त्या क्लुप्त्या असत. के.बी.त मात्र पेपर ठेवत असत.
या हाॕटेलची जुनी जागा लहान होती. डावीकडे कौंटर. मागे बरेच फोटो. बहुतेक कृष्णाचे , राघवेंद्र स्वामी, क्वचित बालाजीचे असत.सकाळी त्यांची पुजा होई. चंदनाची अगरबत्ती लावत. छान वाटत राही.
उजवीकडे काही टेबले , एक फॕमीली रुम होती. तेथे फॕमीली चुकूनच असत. बरीच मुले व माणसे मजेत खात , मुख्यत्वे चहा पीत, सीग्रेटी ओढत बसलेली असत.
तसे हाॕटेल साधेच असले तरी तेथील खास दक्षीण भारतीय पदार्थ म्हणजे मसाला डोसा,ईडली, ऊत्तप्पा , चहा , काॕफी, आणि मसाला वडा हा पदार्थ लाजबाव होता.
कित्येक लोकांनी तसा मसाला वडा हा पदार्थ करुन पाहिला परंतु तसा कोणाला जमल्याचे ऐकिवात नाही.
होते काय येव्हढे त्या मसाल्या वड्यात. डोश्याच्या पिठासारखे पीठ. त्यात रवा , खोबरे, धने, आणि खरपुस कडकपणा. प्रथम तो नीट तोडताही येणार नाही असे वाटे. तो गरम सांबाराच बुडवून खायचा.कधी कधी सांबारात चकलीचे तुकडेही असत. मग काय विचारता. त्याची चव इतकी अप्रतीम असे की एकदा तो खाल्यानंतर परत काहीही खाण्याची इच्छाच होत नसे. माझ्या एका मित्राची बायको त्याला तळलेले उप्पीट म्हणत असे. तरी उप्पीट तळून तसा मसाला वडा होणे शक्य नसे.
तीथल्या लस्सीत काजू म्हणून शेंगदाण्याची पूड घालत असत असेही कोणी म्हणे. तरीही ती चव ग्रेट होती.
मालक हरदास भट होते.ते आपल्या अनुनासीक आवाजात " आला नाहीत बरेच दिवसात." म्हणत असत. उधारी चालणार नाही असा बोर्ड असला तरी उधारीच्या ब-याच डाय-या तेथे होत्या हे नंतर समजत असे.
हरदास मध्यम उंचीचे गोरेपान गृहस्थ होते. ते हसतमुख होते. परंतु ते अन्य धंदेवाईकांप्रमाणे कोणाला फार जवळ येऊ देत नसत. धंद्याशिवाय फार बोलत नसत. कधीही सुट्टी घेत नसत. राजकारणात पडत नसत.
त्यांचा मुलगा श्रीनिवास माझ्याकडे काही काळ शिकायला येत होता. तो छान बारकासा गोड मुलगा होता. त्याला श्री म्हणत.
रोजचीच अशी कित्येक गिऱ्हाईके असत. कोणी खेळून आल्यानंतर, कोणी पोहून आल्यानंतर व्यवस्थीत नाष्टा वगैरे करुनच घरी जात. शेव ऊप्पीटाचे शौकीन तेव्हढेच खाऊन जात असत.
शाळा काॕलेजच्या , धंद्याच्या , राजकारणाच्या चर्चा रंगत. चहा काॕफीच्या आॕर्डर मागुन आॕर्डर सुटत. आणि मंडळी तृप्त होऊन जात असत.
पुढे जरा जागा वाढवून के.बी. आणखी मोठे झाले. मालक, वेटर सगळेच लोकांच्या चांगल्या ओळखीचे असत. कधीकधी हरदासही गप्पात सामील होत असत. जागा मोठी झाली तरी वातावरणात बदल नव्हताच.
ऊदघाटनालाच ब-याच डिश ठेवल्याने रोजचे लोक तर होतेच तरी गर्दी रोजच्यापेक्षा कितीतरी जास्त झाली आणि महिन्याचा धंदा गेला असे हरदास कौतुकाने सांगत होते.
सकाळी साडेसहा सातला ऊघडलेले हाॕटेल रात्री नऊपर्येंत चांगले चालत असे. माऊथ पब्लीसीटीच इतकी होती की आणखी काही करण्याची जरुरच पडत नसे. चुकून कधी हाॕटेल बंद असले तर लोकांची घरालाच कुलूप लागल्यासारखी पंचाईत होत असे.
कधीकधी हरदासांचे काका गल्ल्यावर बसत असत. ते जरा जाड, धोतर नेसणारे होते. पण हरदासांची मजा त्यांच्यात ईतकी नसे.
हाॕटेल कमी करणार, धंदा होत नाही, मुलगा इंजीनिअर होऊन मुंबईला गेला ,मुलीचे लग्न झाले, गावी जाणार म्हणत म्हणत एके दिवशी खरेच के.बी. बंदही झाले. नंतर कोणी जागा घेऊन तसेच हाॕटेल चालवण्याचा प्रयत्नही केला.
पण हाॕटेल धंद्याचे महत्व तिथल्या पदार्थांना म्हणजे ते करणा-याला मालकांना म्हणजे व्यवस्थानलाच असते. तसेच हे तेच कधीच नसते. अजुनही कोणी मसाला वडा म्हटले तरी सगळ्यांच्या आठवणीत, मनात, डोळ्यापुढे येते ते के.बी. आणी हरदासच. त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही.

Comments