बायकांची कामे...........................
हा लेख लिहील्याबद्दल मला निश्चितच काही मित्रांचे बोलणे ऐकावे लागणार आहे तर काही मैत्रीणींना निश्चितच हे वाचुन आनंद वाटणार आहे.
वास्तविक बायकांची कामे, पुरुषांची कामे असा भेद असण्याचे कारण नाही मात्र पुरुषसत्ताक पद्धतीचा एक असा फायदा काहीजणांकडुन घेतला जातो . काही स्त्रीयांनाही " आमच्या ह्यांना काही येत नाही. " याचे कौतुकही वाटते.
सामाजिक ऊत्क्रांतीचा लंबक आता एकदम दुसरे टोक गाठू पहात आहे. त्यामुळे काही मुलीसुद्धा , बायकांची म्हटली जाणारी कामे करायला ठाम नकार देत आहेत. तेंव्हा नाइलाजाने का होईना मुलांना ही कामे करावी लागत आहेत, लागणार आहेत. त्याला त्यांचाही नकार दिसत नाही. त्यामुळे त्यादृष्टीने कदाचित काही दिवसांनी हा प्रश्न शिल्लकही उरणार नाही.
काय होते अशी बायकांची कामे पुरुषांनी न केल्याने. एकतर त्यांना ऊगाचच पुरुषीपणाचा खोटा अहंकार येतो. काही वयानंतर स्त्रीयांनाही तीच कामे सतत करण्याने जास्त शारीरिक श्रम होतात. भांडणे होण्याची शक्यता वाढते.
अशा वागण्याने म्हणजे स्त्रीयांना जास्त कामाला लावल्याने , त्यांची काळजी हवी तशी न घेतल्याने अनावस्था प्रसंग ओढवल्याची उदाहरणेही आपण अधूनमधून ऐकतो. " मीच एकटीने का मरावे. ?" असे वाक्य कधी ऐकू आले तर ती प्रश्नाची नांदी आहे असे समजायला हरकत नसावी.
मी स्वयंपाक करतो समजल्यावर मैत्रीणीने फोनवर " आज काय स्वयंपाक करणार आहेस ?" असा टिपीकल बायका बायकांना विचारतात तसा प्रश्न विचारल्यावर मला आगदी धन्य वाटले.
नैसर्गिक फरकाने करावयाची स्त्री विशीष्ठ कामे वगळता एकही काम स्त्रीचे ,पुरुषाचे असते असे मला वाटत नाही. अशी सर्व कामे मला करता येतात, मी करतो . माझी मुलेसुद्धा करतात.
बायकांच्या म्हणून हिणवले जाणा-या प्रत्येक कामाला उत्तम व्यवस्थापनाची , वेळेचे नियोजन करण्याची गरज असते. त्या सर्व कामांतुन निर्मितीचा आनंद मिळतो शिवाय स्वतःबरोबर घरातील व घराबाहेरील चार लोकांना आनंद देण्याचे समाधान मिळते. हे सर्व स्त्रिया न बोलता आयुष्यभर विनातक्रार करत असतात.
आमच्या एकत्र कुटुंबात मुले, मुली साधारण सारख्याच संख्येने होते. त्यामुळे सगळी कामे बघुन करुन पाहिली पाहिजेत असे उगाचच वाटत असे. साधे काठीने उंच दांडीवर कपडे वाळत घालणे एक खास काम होते. ती नऊवारी पातळे व धोतरेही दोन दांड्यावर मिळून मध्ये गोलसर आकार ठेऊन घातली जात एकही सुरकुती न पाडता. आता दांड्याच खाली येतात आणि येव्हढे मोठे कपडेही कोणी घालत नाही त्यामुळे तो त्रास संपल्यात जमा आहे.
लहान ,मोठ्या झाडू केरसुण्यांनी झाडणे, साफसफाई करणे यामुळे घरात कोठे काय ठेवले आहे , किती वस्तू हव्या असणा-या आहेत, कोणत्या वस्तूंच्या जागा बदलायला हव्यात , कोणत्या वस्तूंना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आहे हे आपोआप समजते. घर आवरले जाते. ते सर्वांच्याच फायद्याचे ठरते.
"तू माझ्या रुममध्ये येऊ नको. माझे मी आवरतो/ते ," म्हणणा-या मुलांना ते खरे करायचेच नसते. पण घरात सगळेच कामे करताहेत म्हटल्यावर त्यांना कामे करण्यापासुन ईलाजच उरत नाही.
ऊखळात , मुसळाने गहू वगैरे कांडणे, मसाले करणे यांत हात देताना ते वेगळ्याच कौशल्याचे काम आहे हे जाणवले. एका हाताने ऊखळातील पदार्थ वरखाली करणे दुसरीकडून वरुन येणारे मुसळ हातावर बसू न देणे हे वैशिष्ट्यपूर्ण असते. शेवटी ऊखळ धुवून त्याचे पाणी आमटीत घातल्यानंतर जी चव लागायची ती अजुनही जिभेवर रेंगाळत आहे.
खोबरे कसे खीसले जाते ते नुसते पाहुन सोपे वाटते. करवंटीचा कणही पडू न देता स्वच्छ खिसणे ही कलाच म्हणावी लागेल. तेच मुळा विळीवर हळूहळू कोचुन गोल गोल फिरवणे नंतर तो चिरणे या प्रोसेसने होणारी मुळ्याची कोशींबीर निश्चितच वेगळी लागते.
गाई म्हशींची धार काढणे हे असेच वेगळे काम आहे. जनावरे बीन ओळखीच्या व्यक्तीला धार काढायला बसुही देत नाही. डाव्या बाजुचा मागचा पाय अर्धाच ऊचलून व्यक्तीला गारद करतात.
कपडे धुणे, ईस्त्री करणे, नीट घड्या करणे एक ना अनेक ती घरातली कामे न संपणारी असतात.
स्वयंपाक करणे , आवश्यक सामान संपायच्या आत आणून ठेवणे, ते फुकट न घालवता वापरणे, स्वयंपाक झाल्यावर आवराआवरी करणे सगळेच जरुरीचे व त्या त्या वेळीच करावे लागते. आता मशीन्समुळे, झोमॕटोमुळे काही त्रास कमी झाले असतील. फक्त एक घरातली कामे पुरुषांनी केल्यास कदाचित त्यांची किंमत कळू शकेल.
आता तर ब-याचजणी घरचे करुन आॕफीसला जातात. पैसे मिळवतात, तरीही त्यांची किंमत कमीच असते . काही पुरुष यातील एकही काम करत नाहीत कारण ती त्यांची कामे नसतात ना?
परदेशात बहुतेक वेळा अन्न फक्त गरम करुन खायचे असते तरीही डीश वाॕशींग हे काम पुरुष करतात.
असो. ह्या याद्या न संपणा-या आहेत. इतर भारी, मोठी, बाहेरची कामे करणा-या पुरुषवर्गाने चॕलेंज म्हणून काही घरकामे रोज केल्यास आख्खे स्त्री विश्व कणभर तरी जास्त सुखी होईल वेगळे गीफ्ट न देता.
Comments
Post a Comment