आकाश कंदील .....................................

 छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी आपल्याला खूप आनंद देऊन जातात. तसेच काही दिवसही. दिवाळीच्या आधी एकदोन दिवस असेही ऊगीचच भारी वाटत असते. दिवाळी संपल्यावर रुखरूख . तसे दिवाळीतही आपण वेगळे काय करतो. पण त्या दिवसांची मजाच और असते.

अशीच एका वर्षीची दिवाळी. कधी नव्हे ते दिवाळीभर सुट्टी मिळाली होती. कोकणातली भाचे मंडळी त्यांच्याकडची मजा सांगत.
दिवाळीच्या आदले दिवशी एक बांबू तोडायचा. तो तासुन त्याच्या पट्ट्या काढायच्या. नंतर लहान लहान लहानमोठ्या लांबीच्या काड्या काढायच्या. त्यांचा सांगाडा तयार करायचा. जिलेटीनचा कागद आणायचा. तो सांगाड्यावर चिकटवायचा. जोडांवर पांढरी कागदी फुले लावायची. डिंक किंवा सरससुद्धा तयार करायचा. सगळेजण मदतीला यायचे. पहाटेपर्येंत सर्वांच्या घरचे चार पाच सुंदर कंदील तयार व्हायचे.
दरवर्षी त्यांचे वर्णन व ऊत्साह पाहून वाटायचे की आपणही असे केले पाहिजे. कित्ती मजा येईल . माझा एक मित्र सुरेश म्हणायचा की येव्हढे काय अवघड आहे आकाश कंदील करणे. एक आंब्याची करंडी घ्यायची. तीला बाहेरुन रंगीत कागद लावायचा. आत बल्ब सोडायचा. झाला कंदील तयार.
पण येव्हढाही मी अरसीक नव्हतो. तसा पारंपरिक आकाश कंदीलाचा सांगाडा डोळ्यापुढे असतोच. ऊभ्या काड्या. त्यांना वारखाली आडव्या लहान काड्या जोडायच्या. चारी बाजूला बाहेरुन पिरॕमीडसारखे आकार. रंगीत कागद आणि पांढरा कागद.
मनात लीस्ट तयार होतीच. मुलांना विचारले पण त्यांना डि.आय. वाय. ह्या कृतीतल्या आनंदापेक्षा तयार वस्तूच जास्तच आनंद देईल असे वाटत होते. शिवाय बाबांच्या कलाक्षेत्रातील गतिवर फारसा विश्वास नव्हता. तसे तोंडावर कसे सांगायचे म्हणून तुम्ही सुरु करा आम्ही नंतर जाॕईन होतो असे आश्वासन दिले.
अशा खरेदीला सायकलच बरी म्हणून मी सायकलवरुन निघालो. शिड्या वगैरे तयार करणारे बुरुड असतात तशा एकदोन दुकानात गेलो. त्यांना आकाश कंदीलासाठी काड्या म्हणजे काय तेच कळेना. मग जरा समजावल्यानंतर आत्ता असे कोणी घेत नाही म्हणून काड्या त्यांच्याकडे नाहीत सांगितले . त्या कोठे मिळतील विचारल्यावर काही माहिती नाही सांगितले पण एक दोन ठिकाणी पहायला सांगितले .
परत तसल्या दुसऱ्या दुकानात गेलो. आश्चर्य म्हणजे एका दुकानात मला हव्या होत्या तशा काड्यांचा एक छोटा जुडगा बांधून ठेवलेला दिसला. तो जाड काड्यांचा होता. "किंमत किती?" विचारल्यावर पंधरा रुपये म्हणाला. सौदा चांगला वाटला. द्या सांगितले . काड्या जरा तासुन द्या सांगितले .
मामांनी काम सुरु केले. आता गिऱ्हाईक काही परत जात नाही आणि दुसरीकडे काड्या नाहीत म्हटल्यावर, " एका काडीला पंधरा रुपये होतात बघा." बोलले. मी म्हणालो" मगाशी तसे बोलला नाहीत. एका काडीला कुठे पंधरा रुपये असतात का? " शेवटी मामा पंधरा काड्यांचे शंभर रुपये घ्यायला तयार झाले.
चला एक काम तरी झाले म्हणून आनंद झाला. जवळच एक रंगीत कागदाचे दुकान दिसले. दोन चार रंगांचे प्रत्येकी दोन तीन कागद घेतले.
ठरल्याप्रमाणे मदतीला कोणी नव्हतेच. सारख्या उंचीच्या चार काड्या उभ्या केल्या. त्यांना आडव्या काड्या बांधू लागलो. त्या उभ्याच रहायला तयार नव्हत्या. नंतर एक एक बाजू बांधून घेतली. हळूहळू तकलातु, अशक्त का होईना पण सांगाडा उभा राहिला.
बाहेरच्या बाजुच्या काड्या बांधल्या. तेथे चार टोकांचा गुच्छ तयार व्हायचा. त्याला फुले लावून ते बंद केले. कागद कापून चिकटवले. ते निसटायचे. ते घट्ट केले.
काम संपत आल्यावर जवळच खेळणारी मुले मदतीला आली. "बाबा प्रत्येक बाजूला वेगळा रंग. निदान समोरासमोरच्या बाजू तरी सारख्या रंगाच्या घ्यायच्या." म्हणू लागली. आता कुठे परत सोडायचा, शिवाय वर टांगल्यावर छान दिसेल असे त्यांचे समाधान केले.
"पैसे किती लागले?" या प्रश्नावर मी काड्या शंभर ,कागद पन्नास, डिंक तीस असा एकशे ऐंशीचा हिशोब सांगितला. ती एकदम हसायला लागली. "का हसायला काय झाले. चार तास घालून चांगला कंदील केलाय की."
"अहो आत्ताच मित्रांनी शंभर, सव्वाशे रुपयांना भारी कंदील आणलेत. " मुले सांगू लागली. " अरे काही झाले तरी त्याला घरच्याची सर येणार आहे का? घरचे ते घरचे. " मी अभिमानाने म्हणालो. आणि ते खरेच झाले कारण दोन दिवसांनी बांधलेला कंदील आपोआप खाली आला. त्याला फार इजा झाली नव्हती . तो परत बांधला.
"असे कंदील हल्ली दिसत नाहीत. " असे सगळेजण कौतुकाने का चेष्टेने म्हणत होते. दरवर्षी दिवाळी येते. केलेल्या कंदीलाची आठवण होते आणि मुले मी काही बोलायच्या आधीच छान छान कंदील आणून ठेवतात. मी या वर्षी काय तयार करावे याचा विचार करत राहतो.

Comments