न येणाऱ्या गोष्टी ................................
तशा आपल्याला ब-याच गोष्टी येत नसतात. म्हणजे आपल्याला रेल्वे, विमान चालवायला येत नाही. एव्हरेस्ट चढायला येत नाही. ते फार फार दुरचे झाले. परंतु घरातल्या , रोजच्या जगण्यातल्या साध्या , साध्या, इतर काही जणांना सहज जमणा-या गोष्टीसुद्धा जमत नाहीत त्यांची मजा औरच असते.
अशा गोष्टी आपण शिकण्याचा , करण्याचा प्रयत्न करत नाही असे नाही. पण इतर जण म्हणतात ," हे तुला जमायचे नाही. तू करु नको. आणखी काहीतरी घोळ घालून ठेवशील." तो हा प्रकार असतो. अर्थात न येणाऱ्या कामांमुळे फार काही अडते असे नाही. उलट काही जणांना आराम व सुटका मिळत असते. दुस-या कुणाचे ते काम वाढते येव्हढेच.
"येव्हढे साधे तुम्हाला कसे येत नाही? " असे न ऐकलेला पुरुष असेल की नाही माहिती नाही. असे म्हणून ती ते काम झटकन करुन दाखवते. अशा वेळेस फार प्रतीक्रिया न देणे शहाणपणाचे असते.
आश्चर्य म्हणजे ही न येणारी कामे आपण करायला घेतली तरी ती अगदी पहिल्या वेळी केली तशीच होतात. चुकाही त्याच होतात. आपण तेथेच थांबतो. चुका बदलतसुद्धा नाहीत.
साधे बुटांना लेस लावण्याचे काम घ्या. ती सुरवात लेस एका भोकातुन घालून दुसरीकडून काढायची वगैरे. पण ती लेस किती ओढायची, दुसऱ्या भोकातून म्हणजे त्याच बाजुच्या का समोरच्या बाजुच्या असे प्रश्न उभे राहतात. लेस कधी कमी कधी जास्त होते. ती सुंदर ओवून तीचे फुलसुदूधा बांधता येते म्हणे. म्हणजे तसे पाहिले आहे. पण जमत नाही. अर्थात त्याला बुटच न घालणे. घालावेच लागत असल्यास बीनलेसचे बुट घेणे असे सोपे उपायही असतात.
मुलांना मात्र असे प्रश्न पडतच नसावेत. ती झटकन मोबाईल काढून यु ट्युबर व्हीडीओ पाहून उत्तर शोधतात. कधीकधी त्यातून शिकून तयार होतात. आपण तसे करायला जातो पण किती वेळा पाहून दुरुस्त्या करणार म्हणून तो नाद सोडून देतो.
टायची गाठ बांधणे हा सुद्धा असाच जीव खाणारा प्रकार आहे. आपल्याला टायची गाठ बांधता येत नसते . जवळ ती बांधता येणारे कोणी नसते. जायला अगदी पाच दहाच मिनीटे शिल्लक असतात आणि गाठ बांधली नसल्यामुळे कार्यक्रमाची गाठ पडते का नाही अशी वेळ असते. तेंव्हाची मजा खास बघण्यासारखी असते.
ड्रेस चढवलेला. बुट घातलेले असतात. त्यांना पाॕलीश नसतेच . ते झटकन कसेतरी करायचे. नंतर टायची गाठ. प्रथम तो मध्ये धरुन कमी जास्त अंतर ठेवणे. मग एक सैलसर गाठ घेवून त्यातुन ओवणे, फिरवणे. शेवटी एक शेपूट लांब एक अगदी आखूड होते. परत ते सोडवायचे. ओढून ताणून कशीतरी गाठ मारायची. सुट वगैरे असला तर त्याची बटणे लावून, टाय थोडाच दिसेल अशी व्यवस्था करता येते.
माझ्या अनेक मित्रांनी कित्येक वेळा मला टायची गाठ मारायला शिकवायचा प्रयत्न केला. आता तशी थोडीशी येते म्हणायचे येव्हढेच. सहज उभ्याउभ्या टाय हातात घेवून झटकन गाठ मारणारे पाहिले की अगदी हेवा वाटतो.
तोच प्रकार कपड्यांना घड्या घालण्याचा आहे. तसे हे काम सतत पडणारे. आपण घरीच आपल्या कपड्यांना ईस्त्री करायला लागलो तर हा प्रकार कसला अवघड आहे हे समजून येते.
तसे पहिल्या ईस्त्रीच्या घडीवरुन ईस्त्री फिरवली की झाले. ती घडी दिसत असली तर बरे. फुलशर्टाच्या हाताच्या घडीचे आडवी व सरळ का काय असे दोन प्रकार असतात. पुर्वीची घडी न बिघडवणे हे सगळ्यात चांगले व कमी कटकटीचे असते.
बरे ते कसेतरी जमवले तर शर्टसना सगळी इत्री झाल्यानंतर घडी घालण्याची वेळ येते. ती एका बाजुला कमी व दुसरीकडे जास्त रुंदीवर घालायची असते.
आजपर्यंत मी हजारो वेळा शर्टसना घड्या घातल्या असतील, पण ती एकदाही बिनचूक आली असे आठवत नाही. मग कशीतरी घडी घालून ते काम उरकावे लागते.
तोच प्रकार कोटाची घडी घालण्याचा आहे. ती चांगली येणाऱ्यांचे अगदी पाय धरावेसे वाटतात.
हे सगळे मिळून प्रचंड आकाराचे मोठ्ठे भूत असावे तसे काम असते ते बॕग भरण्याचे. एखाद दुसऱ्या कपड्याची घडी घालताना येव्हढे अवघड वाटणाऱ्यास आख्खी बॕग व्यवस्थीत भरणा-या यच्चयावत स्त्रीवर्गाचे प्रचंड कौतुक वाटते. त्या कपड्यांच्या फटाफट घड्या घालून वर चार वस्तू मावतील येव्हढी जागा करुन दाखवतात. म्हणून मी शक्यतो त्या फंदातच पडत नाही.
घड्यांचाच विषय असल्यामुळे मग कागदांच्या घड्या घालणे, रेषा मारणे , चित्रकला सगळीकडे काय होत असेल याचा विचारच केलेला बरा. त्यामुळे आखीव रेघांचा कागद वापरणे आपोआपच आवडू लागते.
त्यामुळे एकुणातच शिस्तीने, कलात्मकतेने करण्याची कामे न येणाऱ्या कामांच्या यादीत गेली. त्यामुळे ती यादी वाढत गेली.
ह्या यादीत अजून ब-याच गोष्टी आहेत. त्या व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. कोणाच्या याद्या किती आणि कसल्या होतील सांगता यायचे नाही. अर्थात आयुष्यात सगळेच पूर्ण असुन कसे चालेल. अपूर्णता आहे म्हणूनच जग आहे नाही का?
Comments
Post a Comment