हू रुल्स................................

 रवी आणि शंकर दोघांच्या घरी आज आनंदाचे वातावरण होते. दोघेजण एकाच सोसायटीत राहणारे जीवलग दोस्त. दोघे एकदम बी. काॕम. झाले. एम. बी. ए. सुद्धा झाले. त्यांच्या मार्कांसारखेच काॕलेज असल्यामुळे तेथील कँपस नावापुरतेच असायचे .

बरेच दिवस दोघेजण जाॕब मिळवायचा प्रयत्न करत करत होते. रिझ्युम टाकत होते. अचानक दोघांना " सनशाईन माॕल्स प्रा.ली. " असे सोनेरी अक्षरांनी लिहीलेल्या लेटरहेडवर सुंदर शब्दात शुक्रवारी दुपारी तीन वाजता सेंट्रल माॕलमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलावले होते.
सनशाईनचे महानगरात वेगळेवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी मोठेच्या मोठे माॕल होते. तेथे काही मिळत नाही असे होतच नव्हते. चप्पल , बुटांपासुन , सोन्याच्या दागीन्यांपर्येंत आणि किराण्यापासुन , इलेक्ट्राॕनीक पर्येंत सगळ्या वस्तू चांगल्या, उत्तम, रास्त किंमतीत व सुहास्य सेवेसह मिळत. प्रत्येकाची पसंती सनशाईनच असायची. शिवाय ती दादासाहेब सावंत या मराठी माणसाची कंपनी असल्यामुळे विशेष भाव खाऊन असे.
इंटरव्ह्यूची तयारी फारशी नव्हतीच. दोघांना एकदम एके ठिकाणी बोलावले याचेही घरच्यांना आश्चर्य वाटले, बरेही वाटले.
व्यवस्थीत आवरुन दोघेजण सव्वादोन वाजताच सेंट्रल माॕलमध्ये पोचले. त्यांना तिसऱ्या मजल्यावरील कोपऱ्यातील छोट्या हाॕलमध्ये बसवण्यात आले.
हळूहळू इतर मुले , मुली जमू लागली. त्यांच्यात चर्चा सुरु झाल्या. ब-याच जणांना सेल्स पर्सोनल म्हणून बोलावले होते. रवी, शंकरसारख्या एम. बी. ए. वाल्यांना ट्रेनी फ्लोअर मॕनेजर म्हणून बोलावले होते.
सगळे जण वेगळेवेगळ्या सोफ्यांवर बसले होते. रवी आणि शंकर दोघांच्या हाताला सनशाईन लोगो असणाऱ्या सुंदर की चेन लागल्या. त्यांचे काय करायचे? या कोणी विसरल्या आहेत ? की मुद्दाम ठेवल्या आहेत? असे प्रश्न दोघांच्या मनात येत होते. कोणाला विचारावे तर जवळ कोणीच नव्हते. त्यांनी नेहमीच्या सवयीने की चेन खिशात घातल्या.
मधूनच सर्वांना चहा देण्यात आला. साहेब लोक आल्याची वर्दी आली. हळूहळू इंटरव्ह्यू सुरु झाले. प्रथम सेल्सच्या एकेकाला बोलावण्यात आले. पाच दहा मिनीटांत दुसऱ्याला बोलावले जाई. इंटरव्ह्यू झालेल्यांना लिफ्टने बाहेर सोडले जाई.
प्रथम रवीला बोलावले. त्याने इंटरव्ह्यू घेणाऱ्या तीघांना नमस्कार करुन प्रथम की. चेन . काढून पुढे ठेवली. ती हाॕलमध्ये सोफ्यावर मिळाल्याचे सांगितले . टिमचे डोळे हसताहेत असा त्याला उगीचच भास झाला.
शिक्षण, घरची पार्श्वभूमी , आवडी निवडी, कामावर घेतल्यास कामाला किती महत्व द्याल वगैरे प्रश्न विचारले गेले. मोठ्या टेबलामागे मध्यभागी बसलेली उंच , धिप्पाड , गोरीपान व्यक्तीच , दादासाहेब असावेत असा त्याला संशय आला. प्रश्न संपल्यानंतर त्याला बाहेर थांबण्यास सांगण्यात आले.
थोड्या वेळेने शंकरसुद्धा आला. दोघांत इंटरव्ह्यूबद्दल बोलणे झाले. शंकरनेही की चेन रवीसारखीच परत दिली होती. आणखी एक मुलगा आणि दोन मुलींना सुद्धा थांबवण्यात आले होते.
सगळे काम संपल्यानंतर पाच जणांना पुन्हा वर बोलावण्यात आले. शिपायाने त्यांना पुन्हा आत नेले. दादासाहेबांनी त्यांचे
अभिनंदन
केले. त्यांची आणखी काही अडचण न उदभवल्यास, सर्वांची निवड केली असल्याचे सांगितले . प्रत्येकाला की चेन बाबत विचारले. सी.सी. टि.व्ही. तुन त्यांच्यावर नजर असल्याचे व तेच पाच असे होते की ज्यांनी की चेन आत दिल्या होत्या हे सांगितले .
बाकीच्यांनी एकतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले केले, एक दोघे जण की चेन घेऊनही गेले. प्रामाणिकपणा, काम करण्याची आणि शिकण्याची इच्छा येव्हढेच त्यांना हवे होते. मार्कांवर वगैरे त्यांचा फार विश्वास नव्हता. त्यांनी इंटरव्ह्यू घेणारे दुसरे जनरल मॕनेजर साळुंखे , आणि सेल्स मॕनेजर लोबो यांच्या ओळखी करुन दिल्या.
एकेकाला जाॕईन होण्यास किती वेळ हवा वगैरे विचारले. " तुम्ही रवी आणि शंकर अर्धे अर्धे कसे? दोघे मिळून संगीतातली केव्हढी हस्ती होते ते विचारले. दोघांनी हसून तो योगायोग आहे , एरव्ही दोघांना संगीतातले "सं "सुद्धा कळत नाही म्हटल्यावर दादासाहेब मोठ्यांदा हसले. "छान छान म्हणजे तुम्ही जास्त वेळ कामालाच द्याल" म्हटले.
दादासाहेब निघुन गेले. साळुंखेसाहेबांनी कंपनी वक्तशीरपणा, सचोटी व काम येव्हढ्यालाच कसे महत्व देते ते पुन्हा सांगितले . मानधन, प्रोबेशन, कामाच्या वेळा , प्रशिक्षण याबाबत सांगितले .
रवी आणि शंकर माॕलमधुनच मिठाई घेऊन घरी गेले. पहिलाच इंटरव्ह्यू आणि एकदम सनशाईन मध्ये सिलेक्शन कसे? तेच घरच्यांना पचत नव्हते. रात्री दोन्ही कुटुंबीयांनी पार्टी करुन सेलीब्रेशन केले.
सोमवारपासुन एकदम सकाळी नऊ ते रात्री नऊ कामच सुरु झाले. त्यांना माॕलचा कोपरान कोपरा, दाखवण्यात आला. कोठे काय काम चालते ते सांगण्यात आले.
माॕलमधील विभाग, स्टोअर्स, बॕक आॕफीस, अकाऊंटस सर्वत्र काम करणा-या माणसांच्या ओळखी करुन देण्यात आल्या. नंतर त्यांचे विशिष्ठ काम, सेल्स स्टाफवर नजर ठेवणे, कस्टमर रिलेशन्स, स्टाॕक टेकींग हे समजावण्यात आले. त्यात दोन, तीन आठवडे गेले. हळूहळू दोघे कामात रुळायला लागले.
बोलता बोलता सर्वजण दादासाहेबांबद्दल इतक्या आदराने का बोलतात ते समजू लागले. धंद्याची कोणतीही पार्श्वभूमी नसताना दादासाहेबांनी शुन्यातून कसे विश्व निर्माण केले होते. त्यांना खेळ, संगीत, समाजकार्य याची फारच आवड होती. गरजुंना ते हवी तेव्हढी मदत करीत व स्वतःच्या पायावर उभे रहायला लावत वगैरे समजले.
महिन्यातून एकदा सर्व कर्मचा-यांना भेटायचे असा दादासाहेबांचा शिरस्ता होता. तेंव्हा कोणीही कसलीही अडचण सांगितली तर खेळीमेळीने मार्ग शोधला जात असे.
एकदा रवी मिटींगसाठी दादासाहेबांच्या केबीनमध्ये गेला असता दादासाहेब एका साध्या कपड्यातल्या तेजःपुंज व्यक्तीच्या पायाशी बसून काही ऐकत आहेत असा मोठ्ठा फोटो पाहिला.
लोबोंना त्याबद्दल विचारता ते बाबाजी असल्याचे समजले.
त्यांना बाबाजींच्या अध्यात्मात फारसा रस नव्हता कळतही नव्हते पण दादासाहेंबांबद्दल अती आदर होता. आणखी कोणी म्हणाले बाबाजी कोणाशी फार बोलत नसत. कधीतरी माॕलमध्ये येत , वाटले तर एखादा शब्द बोलत.
ते दादासाहेबांना खूप वर्षांपूर्वी भेटले आणि म्हणाले "सनशाईन". तोच शब्द दादासाहेंबानी पकडला . ते स्वतः अनेकांसाठी सनशाईन झाले. त्यांनी माॕललाही सनशाईन केले आणि इतिहास घडला.
रवीने ते सगळे शंकरला गप्पांत सांगितले . त्यालाही या सगळ्याचे आश्चर्य वाटले. एखादा माणूस इतका ज्ञानी असतो आणि इतका प्रभाव टाकू शकतो याचे थोडे आश्चर्य , थोडा भोळेपणाही वाटला. कधीतरी या बाबाजींशी भेट व्हायला हवी असे दोघांना वाटत राहिले.
ती वेळ अचानकच आली. रोजच्या सवयीने ते साडेआठला माॕलमध्ये पोचले. तो गुरुपोर्णीमेचा दिवस होते हे त्यांना नंतर समजले. सकाळी माॕलमध्ये बाबाजी अवतरले. त्यांना मॕनेजर ट्रेसीने दादासाहेबांच्या केबीनमध्ये आदराने नेऊन बसवले. दादासाहेबांना फोन गेले.
रवी आणि शंकर जवळच काहीतरी कामाचे बोलत होते. बाबाजी आल्याचे समजताच ते परवानगी घेऊन केबीनमध्ये गेले. बाबांजींना पाणी दिले. ते म्हणाले " इतका संशय. ? ज्ञान हवे. आधी शोधा " हू रुल्स?"
दोघांची विकेट ऊडाली. काय या शब्दांचा अर्थ. दादासाहेब पळतच आले. बाबाजींच्या पायाशी बसले. बाबाजी त्यांच्याशी काही बोलले. रवी आणि शंकर हळूच दादासाहेंबाजवळ गेले आणि त्यांनी बाबाजींना "हू रुल्स ?" म्हणजे काय ते सांगण्याची विनंती करण्यास सांगितले . दादासाहेबांनी त्यांना कामाच्या जागी जाण्यास सांगितले .
रवी आणि शंकर त्या क्षणापासुन हू रुल्स म्हणजे आपल्या आयुष्यावर कोण राज्य करते ? का आपल्या मनावर कोण राज्य करते याचा विचार करु लागले. प्रश्न मोठा गहन होता. त्याचे उत्तरही सहज कोणी देण्यासारखे नव्हते.
आपण आयुष्य घडवतो की आणखी काही? त्यांचे साधेसोपे आयुष्य थोडे ढवळून निघाले. बाबाजी केंव्हाच निघुन गेले. काही दिवसांनी बातमी आली की बाबाजींनी महासमाधी घेतली.
दादासाहेब थोडाकाळ सैरभैर झाले पण सावरले. रवी आणि शंकरशी बाबाजी बोलले ते शेवटचे. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात या दोघांचा ज्ञानी होण्याचा चान्स मात्र निघुन गेला.

Comments