कोर्ट ---वास्तू आणि वस्तू ..............................

 कोर्टाची वास्तू आणि कोर्टातल्या वस्तू हा लेखाचा विषय. आता एखाद्याला कोर्टाची वास्तू आणि तेथल्या वस्तू यात काय विषेश असणार आहे असे वाटण्याची शक्यता आहे. इतर वास्तूंसारखी वास्तू. पण प्रत्येकाचे या वास्तूकडे पाहणे निरनिराळे असते. म्हणून अनेकांना आपापल्या नजरेने तीच वास्तू वेगवेगळी वाटते.

सामान्यतः लोकांना कोर्टाची पायरीसुद्धा चढायला नको वाटते. परंतु सध्याच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकांना ही पायरी चढावीच लागते. आमचे भाऊ नवीनच साक्ष देणाऱ्याला " या आधी मांडवाखालुन गेला नाहीत वाटते असे ,"म्हणायचे.
न्यायदान करणा-यांस हे न्यायाचे मंदिर वाटते. कलाकार जसा रंगमंचावर पाऊल ठेवण्याआधी रंगमंचाला नमस्कार करतात, तसे न्यायाधीश सुद्धा न्यायासनाला नमस्कार करतात. न्यायालयीन कर्मचा-यांना कोर्ट हे आॕफीस असते. वेगवेगळ्या प्रकारचे काम सतत करायचे असते. वेळेची मुर्यादा तर असतेच असते. कोर्ट ही वकीलांची कर्मभूमी असते. बार रुममध्ये त्यांच्या बसण्याच्या ठराविक जागा असतात. परंतु कायम काहीच नसते . ते कोठेही बसून काम करु शकतात.
पक्षकारांस दर तारखेस पुढे काय होतयं ही रुखरूख वाढवणारे असते कोर्ट . आपल्या कामाचा शेवट काय होईल, कसा होईल, कधी होईल ही काळजी प्रत्येकाला असते. आरोपींना भिती वाटवणारे, परंतु नंतर वरुन वरुन निर्ढावलेपण दाखविणा-यांना वाट पहायला लावणारे असते कोर्ट .
साधारणतः गावात अत्यंत मोक्याच्या जागी कोर्टांच्या इमारतींची रचना असते. बहुतेक ठिकाणी अगदी इंग्रजांच्या काळात केलेले सुंदर दगडी बांधकाम असायचे. आत्ता ब-याच ठिकाणी मोठ्या आणि ऊत्तम इमारती दिसत आहेत. जुन्या कोर्टात जुन्या परंपरासुद्धा आहेत.
काही ठिकाणी छोटी मंदिरे आहेत. एका कोर्टातील मोठ्या वडाची वटपौर्णीमेला पुजा करण्यासाठी स्त्रीयासुद्धा येतात.
इमारतीत अखंड लोकांचा राबता असतो. खूप झाडे मुद्दाम लावलेली असतात. शक्यतो असलेले काहीही मुद्दाम बदलण्याचा प्रयत्न केला जात नाही. मुद्देमालासकट सगळ्याच्या चोख नोंदी, वारंवार तपासणी असते. कामांसाठी जरुरी असल्यामुळे त्याची काळजी घ्यावीच लागते.
मुद्देमाल ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था असते. कर्मचा-यांसाठी कामांप्रमाणे व्यवस्था असते. काहीजण कोर्ट हाॕलमध्ये काहीजण न्यायाधीशां जवळ असतात. काही वेगळ्या खोल्यात बसतात. काहींना कपाटांच्या आडोशामागे बसायला लागते. पुर्वी टाइप रायटर असायचे आता संगणक असतात.
टेबल खुर्च्या जुन्या छान सागवानी होत्या. त्यांचे वय दशकात, शतकात सुद्धा झाले असेल. "गर्वमेंट आॕफ बाँम्बे" लिहीलेले काचेचे पेपरवेट कोर्ट सोडून कोठेही दिसणार नाहीत.
जुन्या इमारतीत न्यायासनामागील भिंत अंर्तगोल असे. त्यामुळे न्यायाधीश बोललेले नीट ऐकू येई. एखादेच कोर्ट असणा-या ठिकाणी न्यायाधीशांना बाहेरचे गेट दिसेल अशी असे. भिंती जाडजूड , ऊंची खूप सर्वत्र हवा खेळती राहण्याची व्यवस्था असे.
खूप तापमान असणाऱ्या ठिकाणी पडदे व ते ओढले जाण्याची व्यवस्थासुद्धा दिसून येईल. थोडक्यात ,एकदा बांधकाम केले की वर्षानुवर्षे तिकडे पहायला सुद्धा लागत नसावे.
पिना ठेवण्याचे कुशन,शाई शोषून घेण्यासाठी लाकडी अर्ध गोलाकार टिपकागद लावण्याची व्यवस्था असणारे शोषक,आत्ता आत्तापर्येंत कोर्टात होते,त्यांचा ऊपयोग कित्येक वर्षांपुर्वी संपला असला तरी.
एका कोर्टात वाॕशरुममध्ये एक लाकडी ऊंच तिपाई असे. त्यावर एक स्टीलचे तसराळे असे. ते पाण्याने भरुन ठेवले जायचे. त्याचा ऊपयोग कोणाला माहितीही नव्हता. चौकशी करता समजले की इंग्रजांना उन्हाळा सहन होत नसे. थंड पाण्यात टाॕवेल भिजवून ते वापरत असत.ते गेले, टाॕवेल गेले, गरम हवेतलेच न्यायाधीश आले तरी तिपाई, तसराळे कायम होते.
कोर्टातले कँटीन हा प्रकारसुद्धा विशेष असतो. तेथे बराच अंधार असतो. अपवाद वगळता तेथे खास खाण्यासारखे काही नसते. चहा स्पेशल म्हटले तरच बरा मिळतो. तरीही वकील व त्यांचे कारकून सतत चहा घेत असतात.
कोर्टातले कागद ,स्टँप, बाँड , डेस्क सगळे वेगळे असते. माणसे आपापल्या कामासाठी येतात आपापले काम करुन जातात. येथील इमारत ,वस्तू मात्र पिढ्यान पिढ्या माणसे येथे काय करतात याचा विचार करत असतील.

Comments

  1. खूपच छान लेख.
    कोर्टाच्या इमारती अद्याप तरी बाहेरूनच पाहिल्या होत्या, तरी त्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
    ब्रिटिश गेल्यावर इतर सरकारी विभागांनी बरीच कात टाकली. पण कोर्टात काही प्रथा परंपरा अद्यापही चालूच आहेत. उदा. उन्हाळी सुट्टी.

    ReplyDelete

Post a Comment