वाहिन्या, मनोरंजन , तर्कशास्त्र वगैरे.................................

 एकदा वाटले की दूरदर्शन वाहिन्यांवरील मालिका आणी तर्कशास्त्र हा विषय घ्यावा पण लगेच दुसरा विचार आला की या गोष्टींचा संबंध नसतो तो कसला शोधता असे तुम्ही म्हणाल. म्हणून या थोडा व्यापक विषय.

मनोरंजन म्हणजे काय. फक्त वेळ घालवण्याचे साधन की त्यातुन काही चांगल्या ऊत्तम ख-याची अपेक्षा. सगळ्या वाहिन्यावाल्यांनी भारतीय नागरिक म्हणजे त्याला काही कळत नाही आपल्या हातात चॕनल आहे , त्यांना मनोरंजनच्या नावाखाली काहीही दाखवले तरी चालते अशी करुन घेतली आहे का ते कळत नाही.
पुर्वी सकाळी लोक रेडिओ लावायचे. आता रेडिओ , ट्रँन्झीस्टर तसा लागतच नाही. मोबाईल मध्येच छान लागतो. काहीजण तो ऐकतात. पण बरेचजण अगदी झोपड्यातही टी.व्ही. लावतात. दिवस रात्र त्या किरणांमुळे, आवाजामुळे कानाचे, डोळ्यांचे काय होईल काय माहीती. धार्मिक कार्यक्रमांची चॕनल. मेकअप केलेले साधु, साध्वी किंवा भजने दाखवत असतात. मला असे वाटते एखादी गोष्ट सतत करत राहिले की तिच्यातील रस कमी होतो आणी तोचतोचपणा झाल्यामुळे तिच्यातील रस मनापर्येंत जाऊन काही करु शकत नाही. ते तिकडे चाललय आणी आपले इकडे व्यवहार सुरु आहेत.
शांतपणाने लोक आपापली कामे करत आहेत, कोणी वाचन करते आहे, मुले फक्त अभ्यास करताहेत असे दृश्य छानच असते की. असो. तो विषय थोडा वेगळा असेल.
दूरदर्शन सुरु झाले तेंव्हा अगदी थोडा वेळ असे. काही तास दिल्ली हिंदी , काही तास मराठी. एकएक मालिका आठवड्यातून एकच दिवस असे. तरीही दर आठवड्यात त्या वेळी लोक आवर्जून ती बघत. एकमेकांना सांगत असत. कथेवीषयी पात्रांच्या बोलण्याविषयी, अभिनयाविषयी आपण बोलत असु. अजूनही बोलतो. का ? तर ते जूने , थोडे, होते म्हणून ? नाही. तर त्यात आशय ओतप्रोत भरला होता म्हणून .
आशय असला तर नट नट्यांना कामात रस मिळतो. वेळ जातो, पैसे मिळतो. पण कलेचे काय आशयाचे काय. ते कामांच्या पाट्या टाकताहेत आणी आपण फारसे पर्याय नसल्यामुळे त्यास चिकटलो आहोत असे ऊगाच वाटून जाते.
वाहिन्या वाढल्या , तास वाढवले आणी पाणी वाढले त्यामुळे गाडे घसरले असे मला वाटते. रात्री रिपीट टेलीकास्ट सोडला तरी दिवसभर दाखवायचे काय? हा प्रश्न त्यांनाही पडत असेल.
बरे पडद्यावर सगळ्यांसमोर जायचे म्हणचे म्हणजे रंगरंगोटी हवीच. आमचे सर म्हणायचे की सर्कशीत काळा माणूस गोरा वाटला पाहिजे ईतका मेकअप आणी प्रकाश हवा. तेच चालते.
मुलतः सतत हास्यविनोद, किंवा दुष्ट बायका , नेभळट मुले, त्यांना सरळ करणा-या तेजस्वी सूना , तेचतेच डावपेच हे जिवन आहे ? असे आयुष्य असते? बरोबर आहे. समाजात काही वाईट अत्यंत वाईट माणसे असतात. कोणताही माणूस पुर्ण आणी सतत चांगला तर कोणी पूर्ण आणी सतत वाईट असे असतच नाही. त्या कमीजास्त मिश्रणातच मजा आहे तेच आयुष्य असते.
पण वाहीन्यावाल्यांचे विश्व आणी त्याकडे पाहण्याची नजर वेगळीच असावी. त्यातुन सत्याचा भास , आभास राहोच तर जग कसे नसते याचेच दृश्य जास्त दिसते.
तर्कशास्त्राशी यांचे देणेघेणेच नसते. बावीस मिनीटात ब्रेक वगैरे दाखवताना काही चमकदार प्रसंग. तरी आठ दहा दिवसांनी पाहिल्यानंतर कथानक फारसे पुढे गेलेलेच नसते. कितीही गरिबी आली तरी त्यांचे मोठ्ठे फ्लॕट, घरे बदलत नाहीत. फक्त हजारोंच्या जरीच्या साड्यांऐवजी काॕटनच्या साड्या, हलका मेकअप येवढाच बदल. दिवसभराची कामेधामे सोडून हे लोक घरीच कसे असतात याचे आश्चर्य वाटते.
रोज त्याच मालीका आणी त्यांचे असंख्य भाग यात घोडे पेंड खाते असे वाटते. दूरदर्शन याबाबतीत खूप प्रयोग करत असे. छोट्या मालीका. पाच भाग. तेरा भाग. तेव्हढ्यातच सगळे संपवायचे. मग आशय , अभिनय यांचा कस लागतच असे. मग ते काम स्मरणीय, पुन्हा पुन्हा बघावेसे, आठवावेसे वाटत असे. एरव्ही ही मालीका कधी संपवता याची वाट पाहिली जात आहे. लोक तशी पत्रेही पाठवत आहेत.
काय जगात ऊत्तम आशयाच्या साहित्याचा तुटवडा पडला आहे? काळीज पिळवटून टाकणारी वेदना, क्रौर्याची परिसीमा, सुंदर विनोद सग्गळे खूप आहे. इतक्या भाषा , ईतके साहित्यिक आहेत. यांच्या रिसर्च टीम किंवा त्यातुन चांगले दाखवू शकणारे कमी पडत आहेतअसे वाटते. त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांची बौद्धिक पातळी कमी केली आहे.
समाजात कित्ती ठिकाणी ऊत्तम कामे चाललेली असतात. नाटके आहेत, एकांकिका स्पर्धा आहेत, भाषणे आहेत, प्रवचने आहेत, संशोधन आहेत, खरी समाजसेवा आहे. हे सर्व एकही पैसा न देता ऊपलब्ध होऊ शकते. ऊलट त्यांनाच चांगले स्टेज मिळेल.
बातम्यांची चॕनेल. ती निखळ बातम्यांची असावीत अशी अपेक्षा असते. पण त्यांचे मालक असतात. त्यांना पटतात त्याच तश्याच बातम्या ते दाखवतात. तेच आता छापील वृत्तात होत आहे म्हणा. बातम्या देताना कोणाची बाजू का घ्यावी लागते , का घ्यावीशी वाटते हेच मला समजत नाही. अहो बाजू लोकांनी घ्यायची आहे , त्यांना हवी ती. ती आपल्याला हवी तशी वळवावी अशी ही पत्रकारीता आहे. पण लोकांना ते समजते. ते सरळ तिकडे दुर्लक्ष करतात. ते चांगलेच आहे म्हणा.
साध्या पत्रकारीतेबरोबर शोध पत्रकारीता ऊत्तम आहे पण आक्रमक पत्रकारीता हा प्रकार किती भयंकर होईल सांगता येणार नाही.
बातम्यांचा अग्रक्रमाबद्दल तर बोलायलाच नको. ह्या लोकांना एखादे काही सनसनाटी घडले की बघायला नको. ह्यांचे कित्येक तास आणी दिवस भरुन निघतात. मग तो विहीरीत पडलेला प्रींन्स असो कि सुशांत . कोणी काय जबाब दिले येव्हढेच नव्हे तर जाबजबाब घेऊन निकालही देऊन टाकतात. ऊत्तम पत्रकारीतेने सिंहासने ऊलटून टाकली आहेत. पण ती शांतपणाने शोध करुन.
वाहीन्यांच्या या दिखाव्याचा परिणाम त्यांना दिसत नसला तरी आपल्याला स्पष्ट दिसत आहे. तो म्हणजे नवा प्रेक्षक. मुले मालीकांकडे ढुंकुनही बघत नाही. ऊत्तम आशय असणाऱ्या मराठी (अपवादाने), हिंदी ,इंग्रजी वेब सेरीज, त्यांना भुरळ घालताहेत. बरे त्या मस्त पाच सात मिनीटांपासून जास्तीतजास्त तीस चाळीस मिनीटांच्या असतात. सवडीने मोबाईलवर बघता येतात. त्या रेटींग वगैरे तपासून पाहिल्या जातात.
सुधारा अन्यथा बाजूला व्हा हा नवा मंत्र आहे. तो सर्व क्षेत्रांना लागू होणार आहे. यासाठी त्यांना क्रांतीच्या आरोळ्या नकोत की रक्तपात. साधे मोबाईल आणी सोशल मीडीया जग हालवू शकेल यात शंका नाही. आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या या प्रेमात जुन्यातले सर्व ऊत्तम आहेच आहे.बघा. इकडे की तीकडे? चाॕइज इझ युअर्स....

Comments