द.वा..............................

 द.वा. म्हटल्यावर कोणाला द.वा. म्हणजे दत्तो वामन पोतदार आठवतील तर कोणाला दवा वाटेल. मी म्हणतो ते द.वा. म्हणजे मिरजेतील गेल्या पिढीतील अत्यंत प्रसिद्ध , कार्यतत्पर, प्रसंगी पक्षकारांवर ओरडणारे , तितकेच पक्षकारांचे लाडके वकिल दत्तोपंत वासुदेवराव नवरे म्हणजे घरच्यांचे व परिचीतांचे बाबा उर्फ नवरे वकिल .

मला अधूनमधून अशी वेगळी व्यक्तिमत्वे भुरळ घातलात.त्यांच्याविषयी सर्वांना सांगावेसे वाटते. फेसबुक व्हाॕट्सअॕप च्या माध्यमातून सुंदर संवाद साधता येतो. म्हणून हा पंक्तीप्रपंच.
नवरे वकिल आमच्या घराच्या पलिकडच्या शेठजींच्या घरापलिकडे रहात असत. वकिल म्हटले की कोणाच्या डोळ्यापुढे न्यायालयात कायद्याचा कीस पाडणारे लोक येतात. कोणाला ते कठोर, लोकांत न मिसळणारे आपल्याच वर्तुळात राहणारे वाटतात. वेळ आल्यावर मात्र ते हवेसे वाटतात.
नवरे वकिलांचा छान दगडी वाडा होता. सकाळी सहाला उघडणारा दरवाजा रात्रीपर्येंत उघडाच असे. दरवाजातुन आत गेल्यावर उजवीकडे बरीच फुलझाडे लावली होती. वकिलांचे बंधु किसनराव कधीकधी त्यांच्याकडे पहात असत. उजवीकडे दोन पाय-या चढल्यावार आॕफीस होते. घरात बैठकीची खोली, मागे चार खोल्या , स्वयंपाकघर होते. वर माडी होती.
लहानपणापासुन या ना त्या कारणाने त्यांच्याघरी जाणे होत असे. सकाळी नउ सव्वानऊला नाना कुलकर्णी , पेपर घेऊन येत. नाना म्हणजे मध्यम उंचीचे , रेव्हीन्यु खात्यातुन चोवीस वर्षे नोकरी करुन रिटायर्ड झालेले गृहस्थ होते. ते आणखी एकदा रिटायर होतील असे म्हटले जात असे.
आॕफीसात नाना डेस्कजवळ बसत. कागद घेऊन भराभरा त्यावर प्रथम आडव्या रेषा मारत. नंतर वकिल सांगतील ते लिहून घेत आणि सहीसाठी पुढे ठेवत. दावे, कैफीयती, नोटीसा, ऊत्तरे टाईप करुन घेत.
नवरे वकिल आवरुन आले की त्यांचा दरबार भरत असे. रोजची कामे काढून ठेवलेली असत. हरीभाऊ रानडे, सुधीर मराठे आणि सुभाष मुतालीक हे ज्युनीअर यायच्या आधी त्यांचे रोजचे पैसे टेबलवर ठेवत असत. पक्षकार येऊन नमस्कार करीत.
त्यांना त्यांच्या केसबद्दल सांगितले जाई. जबाब, ऊलटतपास याबद्दल सांगितले जाई. लिखाण होत असे. युक्तीवादाबद्दल चर्चा होई. आॕफीसात काचेच्या कपाटात लाॕ रिपोर्टसची पुस्तके भरलेली असत. संदर्भ काढले जात. सर्व तया-या रोजच्या रोज केल्या जात. ते अडुसस्ठ सुप्रीम कोर्ट काढ असे म्हणत.
नवरे वकिल आॕफीसात येरझा-या घालत तोंडाने मजकूर सांगत. पक्षकारांशी बोलत. भोळ्या पक्षकारांना कडक शब्दात समजावत असत. इतरेजनांना त्या शिव्या वाटल्या तरी पक्षकारांना त्याचे वाटत नसे. भाजीपाला, शेतात काही तयार झाले, लग्न समारंभ ठरला की देवानंतर नवरे वकिलांकडे असा शिरस्ता होता. पक्षकारांचा त्यांच्यावर फारच विश्वास असे. हल्ली कोणी पक्षकारांना तशा भाषेत बोलायला धजणार नाही.
"अरे तो हरीभाऊ आला नाही. जा त्याला बोलावून आणा." म्हणत असत. रोज दावे, अपीले चालवत असत. तयारी झाली नाही, उद्या पाहून सांगतो, जवळची तारीख ठेवा असे कधीच होत नसे.
सकाळी फिरता फिरता कोणाही वकिलाच्या घरी जात. चहा घेऊन येत. बारमध्ये सगळ्यांशी मिळून मिसळून असत. अगदी मित्रांसारखे खांद्यावर हात ठेऊन जात.
न्यायालयात साहेबांना योग्य मान देत असले तरी त्यांचा दरारा मोठा होता. मध्यम उंची, पांढरे धोतर, पांढरा शर्ट, काळा कोट, काळी टोपी असा त्यांचा पेहराव असे. आवाज खणखणीत होता.नारायणकडचे पान, चांगले खाणे हा आवडीचा विषय होता.
समोरचा वकिल साधा असला तर त्याला ते वाघासारखे वाटत असावेत. दाव्याच्या घटना, नातेसंबंध, विरुद्ध बाजूचे म्हणणे, कायद्याचे संदर्भ सगळे तोंडपाठ असे. त्यामुळे त्यांचा ऊलटतपास, सरतपास, युक्तिवाद ऐकण्यासारखा असे. मधूनच टोपी काढणे , योग्य ठीकाणी हातांच्या हालचाली , आवाजातील चढउतार , खाकरणे, आवंढा गिळणे, यामुळे त्यांचे काम एखाद्या नटासारखे वाटत असे.
चांगला वकिल चांगला सल्लागार, कधी मऊपणाने, कधी कठोर शब्दांनी हे सगळे पक्षकाराचे भांडण स्वतःचेच वाटावे इतक्या तळमळीने करतो.
त्यांनी किती दावे चालवले, जिंकले, याची मोजदाद बाकीच्यांनी करावी. त्यांना त्याचे फारसे वाटत नसे. महिनोंमहिने वर्षानुवर्षे त्यांचे काम चाललेले असायचे. आपल्या कामात ते बुडालेले असत.
त्यांचे कर्तुत्व तेव्हढेच नव्हते. तालीम संस्था, शाळा याच्या संचालक मंडळात ते होते. तेथेही तेव्हढ्याच निष्ठेने काम करत. उठसुठ समाजात मिसळत नसले तरी आजूबाजूला काय चालते याची खडानखडा माहिती त्यांना असे.
रत्ना, चारु, संध्या या त्यांच्या मुली सुंदर आणि अत्यंत हुशार . असा योग दुर्मिळच असतो म्हणे. त्या आर्टस, सायन्स, काॕमर्स अशा वेगळेवेगळ्या शाखांत शिकत होत्या. चारुताई डाॕक्टर झाली. रत्नाताई एम. ए. झाली. त्यांची लग्ने झाली. कोणी टवाळखोर त्यांच्या किंवा कोणत्याही मुलीच्या मागे लागला तर समाचार घ्यायला ते तयार असत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. अगदी आणीबाणीत कारावासही भोगून आले होते. पण सगळ्याचा गाजावाजा करावा असे त्यांस वाटत नसे. त्याचा फायदा घेणे लांबच राहिले .
वेळ येताच ट्रस्ट करुन त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थाना तहहयात मदत होईल अशी सोय केली होती. वहिनी, आई जिजी, सगळेच आपापले व्याप संभाळून होते.
जवळपासच्या सगळ्यांना त्यांचा भक्कम आधार होता. शेवटी वाडाही विकून ते दुसरीकडे रहायला गेले. हरीभाऊंच्या घरात आॕफीस थाटले.
त्यांना अशक्य काहीच नव्हते. तरीही त्यांनी गाडीसुद्धा घेतली नाही. चालत, रिक्षाने जाण्यात त्यांना कधीच कमीपणा वाटला नाही.
एके दिवशी आपल्या असंख्य पक्षकारांना, ज्युनीअरना , जवळच्यांना पोरके करुन बाबा गेले. तरीही त्यांच दरारा , शिस्त, बोलून न दाखवता केलेले प्रेम विसरता थोडेच येईल?

Comments