अटेंम्प्ट आॕफ मर्डर.....................................

 जगजीत राणे असे वेगळे नाव असले तरे ते होते पूर्ण महाराष्ट्रीयन. जगजीत असे नाव त्यांच्या आजोबांनी आवडीने ठेवले होते. त्यांच्या पुर्वजांनी सैन्यात खूप लढाया केल्या होत्या. मोठे पराक्रम गाजवले होते. तेंव्हा त्यांना मोठी जहागीर मिळाली. राजे कसे म्हणायचे म्हणून त्यांना राणे अशी पदवी मिळाली होती .

राणेंचा गोतावळा मोठा असला तरी आता त्यांच्या गढीसारख्या मोठ्या वाड्यात दोन, चार नोकरांशीवाय कोणी नव्हते.बाकीची सगळी कामे करायला मुरारराव मुनीमजी होतेच. ते इंग्रजी शिकलेले, कायदेकानू जाणणारे होते.
राणेंचा मुराररावांवर फार जीव होता. तसे दोघांत वयाने पाच, सहा वर्षांचेच अंतर होते. जगजीतरावांना एकच मुलगा, उमेश. तो मुद्दाम चांगले शिकून अमेरिकेत राहीला होता. कधीतरी वर्ष, सहा महिन्यांनी तो गावी येत असे. त्याची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा अजय यांना फारशी गावाची गोडी उरली नव्हती. जगदीशरावांसाठी ते यायचे एव्हढेच.
उमेशने जगदीशरावांना अमेरिकेत यायचा फार आग्रह केला होता. तरीही इथले सगळे व्यवहार सोडून कोठे जाणे त्यांना शक्य होत नसे. आवडतही नसे.
आता पंचाहत्तर वय झाले तरी जगदीशराव तसे शरीराने, मनाने घट्ट होते. धोतर, शर्ट, कोट, टोपी घालून ते गावातुन चालले की सगळ्यांच्या माना आपोआप खाली होत असत.
पण वेळ काही सांगुन येत नाही. शनीवारी गावातल्या विठोबाच्या देवळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी मिटींग बोलावली होती. गावातले सगळे प्रतिष्ठीत म्हणजे पाटील, सरपंच, मुख्याध्यापक साळेसर, पंच, एकजात हजर होते. कोणी किती पैसे द्यायचे, काम कोणाला द्यायचे सगळी बोलणी झाली. जगदीशरावांनी नेहमीप्रमाणे "तुम्हाला होतील तेव्हढे पैसे जमवा. उरलेले सगळे मी देईन ." म्हटल्यावर सगळ्यांनी आता काम पूर्ण होणारच म्हणून निश्वास सोडला.
लोक गेल्यानंतर सगळे आवरुन घ्यायला अकरा वाजले. कोट, टोपी, शर्ट काढून जगदीशराव हाॕलच्या आतल्या खोलीत पलंगावर बसले होते.
येव्हढ्यात लाईट गेले. मुरारराव हाॕलमध्ये आवरत होते. अंधार झाला. दिव्याची सोय करण्यासाठी त्यांनी शंकर, रखमा, हरी यांना हाका मारल्या. येव्हढ्यात त्यांच्या हातात परवाच्या भेटीत छोट्या अजय मालकांना तिकडून आणलेली गन लागली.
"ही इथे कशाला ठेवली," असे म्हणत ते गन ठेवणार येव्हढ्यात गनचा ट्रीगर खेचला गेला. धाड धाड गोळ्या सुटाव्या असे आवाज येऊ लागले.रंगीत प्रकाश पडू लागला. आवाज थांबेचनात. ते ऐकून शंकर, रखमा, हरी सगळे हाॕलकडे धावले.
मुराररावांच्या हातात गन. त्यातुन आवाज येत आहेत. रंगीत प्रकाश पडत आहे असे त्यांना दिसले. "काय हे बाबा ? काय करतासा?" म्हणून शंकरने मुराररावांच्या हातातील गन काढून घेतली. ट्रीगर पुन्हा खेचताच आवाज बंद झाले.
तेव्हढ्यात आतल्या खोलीतून "अं, अं. अरे मुरार " असा आवाज आला. सगळे आत जातात तर जगदीशराव पलंगावर कोसळले होते. मान एका बाजुला कलली होती. हात छातीवर धरला होता.
मुराररावांनी जगदीशरावांची नाडी पाहिली. ती लागेना. चटकन शंकरला डाॕक्टरांना घेऊन यायला पाठवले.
मिटींग संपून घरी चाललेले पाटील, सरपंच, मुख्याध्यापक, पंचमंडळ यांनीही गोळ्यांसारखे आवाज ऐकले होते. पाठोपाठ शंकर डाॕक्टरांकडे पळत चालल्याचे पाहताच मंडळी परत फिरली. जगदीशरावांच्या घराकडे निघाली. आता लाईट आले होते.
घरी जाताच घरातले सगळे म्हणजे हरी, रखमा आणि मुरारराव हाॕलजवळच्या खोलीत चिंताक्रांत बसलेले दिसले. रखमा तर जोराने रडायच्या बेतात होती. " आवो, काय झाले हे मालकांना. बघा की. गोळ्या उडाल्या आणि आत ते पडले." म्हणत होती.
मुराररावांना काय झाले कळतच नव्हते. गनचा आवाज होतो काय आणि जगदीशराव पडतात काय? आपल्या कृतीचा काही संबंध नाही पण लोकांना काय वाटेल काय सांगता येतय? आतापर्यंत या घरासाठी काय काय केले आहे सगळे क्षणात मातीमोल होऊन जाईल.
पाटील, सरपंच, पंच सगळ्यांनी एकदम मुराररावांना विचारायला सुरुवात केली. ते काही सांगणार येव्हढ्यात डाॕक्टर माने आलेच. त्यांनी सर्वांना खोलीबाहेर थांबायला सांगितले . स्टेथेस्कोप काढला. जगदीशरावांना शांतपणे तपासले आणि सांगितले " आता काही उपयोग नाही. दहा पंधरा मिनीटांपुर्वीच जगदीशराव मृत झाले आहेत."
"आता काय करायचे?" हा प्रश्न उभा राहिला. उमेशाला फोन गेला. तो निघतो म्हणाला. तरी पोचायला दोन दिवस लागणारच
सरपंच , पाटीलांनी येव्हढा वेळ मयत ठेवणे बरे नाही. अंत्यविधी करुन टाकू, वाटले तर उमेशाला आणखी एक फोन करुन सांगावे असे सुचवले.
येव्हढ्यात मुख्याध्यापक साळेसरांनी शंका काढली, " मला वाटते, इकडे गोळ्या उडाल्या, तिकडे ते गेले, पोलिसांना कळवलेले बरे. नाहीतर नंतर आफत होईल. "
मुराररावांनी काय काय झाले पुन्हा सांगितले . त्यात त्यांचा काहीच हात नव्हता. उलट या घरासाठी त्यांनी आयुष्य काढले होते. " अहो , ते सगळं आम्हाला काय माहिती नाही का?" पण गुरुजी म्हणतात तस पोलिसांना कळवून काय ते केलेले बर.
ते सगळ्यांनाच पटले. पोलीस चौकीला फोन गेला. हेड काॕन्स्टेबल कांबळे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी प्रकार पाहिला. लोकांना कोणत्याही वस्तूला हात लावू नका सांगितले . पोलिस स्टेशनला फोन केला. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सावंत साहेब आणि लवाजमा आला.
त्यांनी पुन्हा सगळ्यांकडे चौकशा केल्या. डायरीत नोंदी केल्या. पंच बोलावून घटनास्थळाचा, मयताचा पंचनामा केला.गन ताब्यात घेतली. पोलिसांकडे काम गेले. आता ते त्यांच्या पद्धतीनेच वागणार हे ठरले.
घातपात वाटत नव्हता. साळे डाॕक्टराना पुन्हा बोलावले. त्यांनीसुद्धा मृत्यू ऋदय बंद पडल्यामुळेच झाला असावा म्हटले. तरीही खबरदारी म्हणून शवविच्छेदन केले गेलेच.
संध्याकाळी प्रेत ताब्यात मिळणार तोवर उमेशचा फोन आला की तो उद्या मुंबईत पोचेल. लोकांना वाटले बरे झाले, मुलाच्या हातानेच संस्कार होतील.
सावंत साहेबांनी मुराररावांना, त्यांना कळविल्याशिवाय कोठेही न जाण्यास सांगितले होतेच. संध्याकाळी अचानक गाडी आली आणि मुराररावांना पकडून घेउनच गेली. सगळेजण साळेसरांना बोलायला लागले " बघा सरळ इथल्याइथे झाले असते. आता गेला का बाबा आत. कोण सोडवणार त्याला.हाय कोण त्याच्या घरात?"
तरीही चार लोक एकत्र आले. एक वकिल दिले. मॕजीस्ट्रेट साहेबांनी केस पाहिली. मुराररावांच्या बाबतीतला तपास संपला असे वाटत होते. तरीही सावधगीरी म्हणून दोन दिवस पोलीस कोठडी दिलीच.
साधे, सरळ , मुरारराव सगळे पाहुन वैतागले होते. पोलीस कोठडी संपल्यावर सेशन कोर्टात जामीनाचा अर्ज केला गेला.
शवविच्छेदनाचा अहवालही आला होता. मृत्यूचे कारण "हार्ट कोलॕप्स्ड बाय अॕटॕक" असे नमुद होते. शरीरावर अन्य एकही खूण नव्हती की जखम नव्हती.
सरकारी वकिल निंबाळकर सुद्धा चकीत झाले होते. इंपोर्टेड गन असली तरी ती खरी नव्हती. गोळ्यांचा आवाज खरा वाटला तरी त्यामुळे घाबरायला ख-या गोळ्यांचा आवाज तरी कोणाला माहित होता?
निबांळकरांनी जुजबी आक्षेप घेतले, आरोपीच्या वकिलांना फारसा युक्तिवाद करावा लागलाच नाही. मुरारराव जामीनावर सुटले याचा सगळ्या गावाला आनंद झाला.
जगदीशरावांचे अंत्यविधी , दिवस आटोपून उमेश वाड्याला कुलूप घालून गेला. एरव्ही किल्ली मुराररावांकडे असायची. आता तेच तुरुंगात असल्याने त्याने किल्ली साळे सरांकडेच ठेवली.
सावंतांनी शंकर, रखमा, हरी, सरपंच, पाटील, साळेसर, डाॕक्टर सगळ्यांच्या साक्षी घेतल्या. दोषारोपपत्र दाखल केले. जगदीशरावांच्या मृत्यूचा प्रयत्न करणे , भिती दाखवणे, असे आरोप ठेवले.
निंबाळकरांना सुद्धा या केसमध्ये फारसा दम नाही हे स्पष्ट दिसत होते तरीही त्यांना कर्तव्य म्हणून सगळे करायला लागणारच होते.
मुराररावांना कोणीच नव्हते. साहेबांनी लिगल एड मधून अगदी होतकरु तरीही कष्टाळू अॕड. शिंदे याची नेमणूक केली.
आरोप ठेवण्याबाबत युक्तिवाद झाला. तसा जगदीशरावांचा मृत्यू आणि मुरारराव यांचा संबंध दूरचाही दिसत नव्हता. तरीही मृत्यूचा प्रयत्न करणे, भिती दाखवणे असे आरोप ठेवले गेले. मुरारराव थंड डोळ्यांनी काय होते ते पहात होते.
हळूहळू साक्षी सुरु झाल्या. पंच, घरातले नोकर, मिटींगला आलेले लोक, डाॕक्टर , शवविच्छेदन करणारे डाॕक्टर व शेवटी सावंतसाहेब. सगळ्यांनी घटनाच कोर्टापुढे आणली.
आरोपीने निवेदनात, लाईट कसे गेले, गन कशी हातात आली, जगदीशराव आतल्या खोलीत होते, हाॕलमध्ये त्यांच्याशिवाय कोणीच नव्हते हे सांगितले .
शिंदे वकिलांनी डाॕक्टर .साळेंना पुन्हा उलट तपासासाठी बोलावण्याची परवानगी मागितली . परवानगी मिळाल्यावर त्यांना परत विचारले की ते जगदीशरावांना किती काळ ओळखतात. त्यांनी जगदीशराव त्यांच्या वर्गातच होते , तेव्हढे म्हणजे साठ पासष्ट वर्षे ओळखतो म्हटले.
हल्ली जगदीशरावांची तब्येत ठीक होती, पण ते जरा दमत होते म्हटले. जगदीशरावांची दृष्टी आणि ऐकण्याची शक्ती कशी होती यांस त्यांनी जगदीशरावांना थोडे कमी दिसत होते. एका कानाने ऐकू येत नव्हते, दुसऱ्या कानाने , मोठ्यांदा बोलले तर ऐकू येत होते म्हटले . झाले उलट तपास संपला.
निंबाळकरांनी युक्तिवादास नेहमीसारखा आवाज लावला नाही. वेळही फार घेतला नाही. मृत्यू झाला आहे. मुरारराव घरातले होते, जगदीशरावांच्या मृत्यूने त्यांचा फायदा नव्हता, तरीही गनच्या गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतरच जगदीशरावांचा मृत्यू झाला याचा विचार करुन शिक्षा द्यावी म्हटले.
शिंदे वकिलांनी जगदीशराव व मुराररावांची मैत्री , साक्षीदारांचे जबाब, वैद्यकिय अधिका-यांचा पुरावा व शेवटी माने डाॕक्टरांचा उलटतपास की जगदीशरावांना चांगले दिसत नव्हते, लाईट गेले होते, गनचा आवाज हाॕलमध्ये होता, तो जगदीशरावांना कळालाही नसेल, गन ठेवताना ट्रीगर ओढला जाणे, जगदीशरावांचा अचानक ऋदय बंद पडून मृत्यू होणे केवळ योगायोग होता म्हटले. मुराररावांना नाहक गोवले आहे म्हटले.
पितळे साहेबांनी सर्व दृष्टीने विचार केला आणि तिसरे दिवशी सकाळीच मुराररावांना गुन्हा सिद्ध न झाल्याने सोडून दिले.
संध्याकाळी मुरारराव गावात आले. तेंव्हा रस्त्यांवर फारसे कोणीच नव्हते. मुरारराव जगदीशरावांच्या वाड्याकडे गेले. उंब-याला नमस्कार केला आणि विषण्ण मनाने घराची वाट चालू लागले.

Comments