नाना..........................................

 नाना हे एक वेगळेच रसायन आहे. देव सगळ्यांना काही ना काही विशेष देतो म्हणे. तसे नानाला काय दिले असेल? हा प्रश्नच पडण्यासारखा आहे.

कोणाला चिरतारुण्याचे वरदान असते तर कोणाला आणखी काही. नानाला बहुतेक चिरवयस्कत्व व त्याच वेळेला चिरबालकत्वाचे वरदान मिळाले असावे.
प्रस्तावना फार झाली नाही का? कोण आहे हा नाना. लहानग्या मुलापासुन म्हाताऱ्यांपर्येंत सगळेजण त्याला" ए नाना" असेच म्हणतात.
पावणेसहा फुट उंची, अगदीच बारिक नाही पण किरकोळ शरीरयष्टी, धुवट लेंगा, तसलाच साधासा शर्ट, सावळा वर्ण, तोंडात एकही दात नाही , जीभ ओठात फिरवुन बोलण्याची सवय असा नाना त्याच्या घराच्या आसपास वावरत असतो.
त्याला इकडेतिकडे फिरतानाही कोणी पाहिले नसेल. त्याचे वय सत्तरच्या पुढे आहे असे म्हणतात.तो कित्येक वर्षे तसाच दिसतो. तो करतो काय? त्याचे चालते कसे हे एक कोडेच आहे.
त्याचे चांगले मोठे घर होते. जेवाणा खाण्याची सोय कोणीतरी करुन दिली आहे. त्यामुळे त्याला नोकरी धंदा काही नाही. तरी त्याचे काहीच बिघडलेले नाही. असेही बरेच लोक आपल्या अवती भोवती असतात.
जवळपास इतके क्लास, शिक्षक असताना नाना शाळा काॕलेजात गेल्याचे ऐकीवात नाही. थोडीफार शाळा झाली असेल. अगदी लहानपणापासून नाना आहे तसाच आहे.
त्याला सगळे जसे ओळखतात तसेच तोही जवळपासच्या सगळ्या मुला , माणसांना ओळखतो. पण त्याची जास्त सलगी मुलांबरोबरच असते.
पुर्वी मुलांना खेळासाठी साधने लागत नसत. जास्त करमणूक प्रत्यक्ष लोकांमधुनच होत असे. त्यामुळे क्लासमधुन शाळांतुन येता जाता सगळीच मुले " काय नाना काय चाललेय?" असे काहीतरी म्हणूनच पुढे जात असत.
लगेच नाना " काय रे शाळा, काॕलेज नाही का तुला?" म्हणायचा. मुलांनी आणखी छेडल्यावर "कोण आहेस तू? त्या सुधाकाकुंचा पोरगा ना? थांब तुझ्या घरीच सांगतो." म्हणायचा. मग पोरे पळून जायची.
अगदी मोठ्या झालेल्या एखाद्यालासुद्धा " का रे गिड्ड्या फुटाण्या?" असे सुनवत असे.नानाचे बसायचे ठिकाण म्हणजे त्याच्या घराबाहेरची पायरी , एखादा बाक असे असते.
नानाचा वाडा पाडला. आता नवीन घर बांधणार असे बरेच वर्षे ऐकीवात आहे. वाडा गेल्यावर आता राहणार कोठे म्हटल्यावर " मी दोन खोल्या बांधून घेतल्या आहेत. माझी राहण्याची सोय झाली आहे ."असे नाना सांगतो.
त्याच्या आयुष्यात फार बरे वाईट घडत नसावे.कधीतरी नाना जास्तीतजास्त दुधाचे पातेले घेऊन दुध आणायला जाताना दिसतो तेव्हढेच. बाकी भाजी आणताना, देवळात, करमणुकीच्या कार्यक्रमांस, कोणाशी गप्पा मारतानाही नाना दिसत नाही.
काहीही काम नसले तरी तो रिकामा वाटत नाही. बाकी सगळे आजुबाजुचे बदलले, जवळचे , बरोबरीचे मोठे झाले तरी नाना अजीबात बदललेला नाही.
बरोबरच्या मित्रांची लग्ने झाली. त्यांना मुले नातवंडे झाली तरी नानाला त्यांच्याबरोबर घालवलेले बालपणच आठवत असते. एका काणे आडनावाच्या मित्राबरोबर घरचे कोणी असतानासुद्धा लहानपणी आम्ही त्याला, " काणे , काणे चड्डीत दाणे चिडवत होतो." हेच त्याला आठवते. व सगळ्यांसमोर सांगायलासुद्धा काही वाटत नाही. त्यामुळे बाकीचे सगळेजण त्याला तसेच लहान असल्यासारखे समजतात. हेच बालकत्वाचे वरदान.
काळ पुढे गेला तरी , नाना आहे तसाच आहे तिथेच आहे. उद्या बरोबरीचे, लहानपणापासून त्याला चिडवणारेसुद्धा वयस्क झाले तरी नाना " अरे केव्हढासा होतास. आता म्हातारा झालास." म्हणायला कमी करणार नाही.
येव्हढेसे काही मिळाले तरी माणसे केव्हढी चढून जातात. फुशारक्या मारतात. जवळ काहीही नसताना नाना तसा हसत , खेळत मजेचे काहीतरी बोलत कसे काय दिवस काढतो हे मलातरी न सुटलेले कोडेच आहे. हेच बाल्य त्याला मोठे होऊ देत नसावे. शेवटी ठेवीले अनंते म्हणतात ते हेच असेल की काय?

Comments