पोस्टर्स, होर्डिंगज...............................
परवाच कामावरुन परत येत होतो. एका चौकातून जात हौतो. अचानक डाव्या बाजूच्या खांबावर लावलेल्या एका होर्डिंगने लक्ष वेधून घेतले. छोट्या होर्डिंगचा बराच भाग एका मस्त पांढऱ्या पामेरियनसारख्या कुत्र्याने व्यापला होता. संदेश तर फारच भारी होता. "सगळ्या काॕलनीचा सहवास असणाऱ्या राजू डाॕगीस पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ."
आता मात्र कमाल झाली. वाटले पोस्टर कोणासाठी लावले आहे. खाली काही शुभेच्छुकांची नावे आणि फोटोसुद्धा होते. धन्य तो डाॕगी ज्याला असे प्रेमळ आणि हौशी मालक आणि मित्र भेटले.
ज्याच्यासाठी पोस्टर केले त्याला तरी दाखवले की नाही ते मात्र समजले नाही.
डिजीटलायझेशनच्या युगात प्रसिद्धी फार सोपी झाली आहे. मोठे पोस्टरसुद्धा काँप्युटरमुळे काहीशे रुपयात काही तासात तयार होते. बरे लावण्यासाठी वगैरेसुद्धा स्वतः कष्ट वगैरे लागत नाहीत. सगळे करणारी माणसे काही पैसे दिले म्हणजे मिळतात.
पुर्वी साधे दोन चार बोर्ड लावायचे म्हणजे प्रथम बोर्ड तयार करा किंवा कोठूनतरी पैदा करा, चांगला पेंटर गाठा, त्याला मजकूर सांगा, त्याच्या मागे लागून तो चांगला लिहून घ्या, ते चांगल्या ठिकाणी लावा, कार्यक्रम झाल्यावर लगेच काढून आणा असे बरेच व्याप असत. आता तसले उद्योग कोणी करताना दिसत नाही.
जरा कोठे काही झाले की लागले पोस्टर . त्यावरचे मोठ्ठे फोटो, पांढरे स्वच्छ , किंवा पदास वगैरे शोभणा-या रंगाचे कपडे, सुहास्य मुद्रा , अंगावर व्यवस्थित दागीने, खाली शुभेच्छुक म्हणून पाच पंचवीस जणांचे चेहरे कोण पाहते आणि त्यातुन काय साधते ते त्यांनाच माहिती .
कोणाचे वाढदिवस, कोणाची कोणत्या पदासाठी निवड झाली, बैलगाडी जिंकून आली काहीही कारण पोस्टरवाल्यांना पुरते. या सगळ्यांमुळे आनंद झाला ना मग उपभोगा ना तो आनंद. पोस्टर पाहून येणाऱ्या जाणाऱ्यांना तसाच आनंद वाटेल हे कशावरुन ठरवतात कोण जाणे.
गावातल्या, वस्तीतल्या लोकांना घटना माहितच असते. त्यांना व्हायचा तो आनंद झालेलाच असतो. बरे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी लावले म्हटले तर वाहनातून येता जाता पोस्टर फारसे वाचताही येत नाही. चित्र दिसले , काही वाचले ,कळले तर ते फार काळ लक्षात रहात नाही. राहिले तर त्याचा उपयोग काय हेच कळत नाही.
पुढारी वगैरे मोठे लोक यायचे तर केव्हढे पोस्टर , केव्हढ्या कमानी, थाटमाट विचारु नका. बरे ते उघड्या गाड्यातुन वगैरे आले तर ठीक. नपेक्षा बरेच पोस्टर ,कमानी होत्या ह्यापलीकडे काय दिसणार. पण मला वाटते त्यात प्रचाराचा म्हणजे ताकद दाखवायचा सुद्धा भाग असावा.
गेलेल्याबद्दल तर काय विचारावे. त्यांच्या घरातून मिळतील ते फोटो. विषेशणांची रेलचेल. कविता. काय विचारु नका. एखाद्याला पोस्टर वाचुन "उगाच गेलो." असे वाटायचे. कारण कविताच तशी असते.
"मनी होता साधेपणा.
कधी न धरला मोठेपणा.
व्याकुळ जीव हे होती.
आण्णा परतून या जगती."
बरे पेंटरला तेही माहिती असावे. कारण ब-याच फोटोंखाली तसेच काव्य नजरेस पडते. पुन्हा गेलेल्याचा शोक ठीक आहे. परंतु पोस्टर वाचायचे कोणी आणि त्याचा उपयोग कोणाला काय होतो देव जाणे.
एखादा कार्यक्रम आहे, कोठे आहे, केंव्हा आहे, कोण पाहुणे आहेत, वक्ते आहेत हे सांगणारे पोस्टर निश्चितच उपयोगी असतात.
पोस्टरचा सर्वात उत्तम उपयोग सिनेमा, नाटकवाले आणि रोज नवीन , नवीन वस्तू बाजारात विक्रीस आणणाऱ्या कंपन्या करत असतात. ते प्रचंड मोठे पोस्टर तयार करणारे, लावणारे,काढणारे, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करुन देणारे अशी ही मोठी इंडस्ट्रीच महानगरात काम करत असते.
साध्या रंगीत पोस्टर्सपासून सुरु होउन आता काँप्युटरवर तयार होणारे प्रत्यक्ष वस्तूच समोर ठेवणारे, त्या घ्याव्यात म्हणून आकर्षणासाठी नट नट्या असणारे पोस्टर कोठूनही लक्ष खेचून घेतात. ते पाहणा-या अनेकांपैकी काही जणांना वस्तू खरेच हवी असते. काही जणांना लगेच नको असली तरी तिची गरज वाढवली जाते. हेच तर जाहिरात शास्त्र आहे. अशांतून त्यांचे गिऱ्हाईक तयार होते असे म्हणतात.
लहान मुलांच्या वस्तूंच्या , म्हणजे बिस्कीटे,चाॕकलेटस व शालोपयोगी वस्तूंच्या जाहिराती खुबीने केल्या जातात. मग मित्राकडे , मैत्रीणीकडे आहे करत,करत तोंडी जाहिरात होते. दहाविसातला एखादा ग्राहक मिळाला तरी कंपन्यांचे काम होते असे म्हणतात.
पोस्टरचा सर्वोत्तम उपयोग पाहिला "अमुल बटरचा. " मुंबईत मोक्याच्या अगदी थोड्या म्हणजे पाच सात ठिकाणीच कोणतीही राजकीय , सामाजिक , खेळातील अभिमानास्पद घटना घेउन दर दहा पंधरा दिवसांनी, तिच्यावर एकाच ओळीचे भाष्य.अमुल बटरचा छान उल्लेख , ती छोटी मुलगी. बस्स वाचणारा कोणीही ती जाहिरात विसरु पाहता विसरु शकणार नाही.
हे कौशल्य , हा जाहिरात तंत्राचा खरा व छान उपयोग आहे असे मला वाटते. मरीन लाईन्सवरील कोपऱ्यातील एका हाॕटेलवर अशीच एक ओळीची मुख्यत्वे लाल रंगात इंग्रजीत केलेली राजकीय टिप्पणी लक्ष वेधून घेत असे.
अर्थात जग केव्हढे मोठे आणि आपले डोळे कित्ती लहान. त्यातुन दिसते तेव्हढेच आपण पाहणार. कदाचित् काही जणांना पोस्टर होर्डिंगचे आणखी उत्तमोत्तम उपयोग आणि नमुने पाहण्यास मिळालेही असतील.
कार्यसम्राट, कार्यतत्पर वगैरे वगैरे विशेषणांची किंमत त्या पोस्टरच्या आयुष्याइतकी तकलादू ठरत आहे त्याचे वाईट वाटते इतकेच....
Comments
Post a Comment