दात्ये वाडा......................................

 आज थोडेसे "मेड टू आॕर्डर " आहे. एका बहिणीने ,दात्ये वाड्यावरच का लिहीत नाहीस त्यावर कित्ती लिहीण्यासारखे आहे अशी आॕर्डर केली ,म्हणून हा घाट घातला आहे.

काय होते वाड्यात? यापेक्षा काय नव्हते हेच विचारावे लागेल.
आजी सांगायची त्यानुसार पणजोबांनी का कोणी वाडा बांधला. वेणाबाईंचा मठ बांधला तेंव्हा वाडा बांधला म्हणे. म्हणजे अगदी रामदासांच्या वेळेला नसेल परंतु मठाचे नविन बांधकाम झाले तेंव्हा कदाचित वाडा बांधला असावा.
पुर्वी मधला भाग व मागे ओसरी असे त्याचे स्वरुप होते. नंतर थोडे थोडे बांधकाम केले असावे.
बाहेरच्या भिंती दगडी , ऊंच पंधरा फुटाच्या. पुढचा दरवाजा सात आठ फूट ऊंच ऊंबराचा. त्याला किड लागत नाही . ऊंबराचा असतो म्हणून ऊंबरा म्हणायचे. आता ऊंबराचा नसला तरी म्हटला जातो. अर्थात ऊंबराही असला तरच.
ह्या ऊंब-यावर रोज संध्याकाळी कोणी ना कोणी शक्यतो मुलेच बसलेली असत. गल्लीतल्या छोट्या मुलांना बोलवायचे. त्यांच्याशी मस्ती करत बसायचे. आम्हा सर्व भावांचे मित्रही आल्यानंतर घरात बसण्यापेक्षा ऊंब-यावर बसणेच पसंत करत.
हा ऊंबरा मात्र मोठा तीन फुट लांबीचा चांगला रुंद, दगडी. अजुनही आहे. , तीन जण आरामात बसू शकतात त्यावर. पुढे दोन पायऱ्या . रात्री नाटकाची प्रॕक्टीस झाल्यावर सात, आठ जण मस्त बसुन गप्पा मारायचो. प्रॕक्टीसमधल्या चूका आणी नविन प्लॕन ठरवायचो.
सतत हसणे, खिदळणे, एकमेकांच्या , शाळा, काॕलेजच्या, कामावरच्या गप्पा. आनंद हा वाड्याचा स्थायीभाव होता व आता वाडा नसला तरी भाव टिकून आहे.
दोन काकांचे क्लास, पुर्वी आजीचे व नंतर काकुचे "नवयुग भजनी मंडळ" , आम्हा सर्वांचे मित्र, नाना हुंडेकरी असल्यामुळे हमाल, गाडीवान असे रोज कारणाकारणाने दोन तीनशे लोक घरी यायचे. वाड्याचा दरवाजा रात्र सोडता सतत ऊघडाच असे. घरातलेच लग्न असले तर असे माझ्या पाहण्यात पन्नास वर्षात दरवाजाला एकदोन वेळाच बाहेरुन कुलूप लागले असेल.
आमचे एकत्र कुटुंब होते. आजी, आजोबा, चार भाऊ आणी त्यांचे कुटुंबीय अशी बावीस माणसे घरात होती. पुढे सोपा, त्यामागे माजघर, डाव्या बाजूला एक खोली, लोणच्याच्या वगैरे बरण्या ठेवायची, माजघराच्या ऊजवीकडे छोटी अंधारी पुर्वी बाळंतीणीची, नंतर अडगळीची खोली, तीच्यात एक मोठ्ठे लाकडी कपाट होते. डावीकडे स्वैपाकघर. एका वेळेस दहा पंधरा जणांची पंगत बसे. प्रथम चूली होत्या. धूर जाण्यासाठी भिंतीतून एक सिमेंटचा पाईप वरपर्येंत सोडला होता. प्रकाशासाठी पाच फुट बाय तीन फुट मापाच्या मोठ्या खिडक्या पश्चिम भिंतीत ठेवल्या होत्या.
स्वैपाकघराच्या मागील बाजूस एका लहान खोली येव्हढे देवघर होते. त्याचा मुख्य वापर रेशन दुकानवाले काका करायचे. ते तास दिडतास स्तोत्रे म्हणत खूप देव होते त्यांची पुजा करत. गुरुचरित्राचा सप्ताह करत.बाकी सर्वजण नमस्काराला , फुले घालायला वाकत.
माजघराच्या मागे दोन खोल्या होत्या. एकीत स्वैपाकाची भांडी, आंब्यांच्या मोसमात आंब्याच्या करंड्या ठेवत. तर ऊजवीकडच्या खोलीत गोविंदराव क्लास घेत. सकाळपासून संध्याकाळपर्येंत मुले येत. एक काकु त्याला गोविंदराव हायस्कुल म्हणायची.
वर तीन माड्या होत्या. मागे गोठा होता. त्यात एक म्हैस असे. नंतर तेथे एक खोली केली. अशा चांगल्या नऊ दहा मोठ्या खोल्या होत्या. सगळ्यांचा सगळीकडे वावर असे. घरातली मुले , मुली, मित्र, भेटायला येणारे, नातेवाईक,शेजारी सगळ्यांना मुक्त प्रवेश असे.
पुढच्या अंगणात पारीजातक सतत बहरलेला असे. वडिलांना झाडे लावण्याची फार हौस होती. वीस, पंचवीस कुंड्यातुन झाडे लावली होती. ती मुख्यत्वे सजावटीची होती. फर्नचे झाड होते. एक लांब लालसर पाने असणारे झाड होते. मागील बाजूला कण्हेर आणी नेवाळीचे झाड होते.
एकत्र कुटुंब असल्यामुळे काकू, त्यांच्या बहिणी , भाऊ , त्यांची मुले , मुली असा मस्त मोठ्ठा गोतावळा होत असे. सख्खे, चुलत, आत्ते, मामे, सगळे असले तरी रहायचे सख्खे असल्यासारखेच. येव्हढी माणखे म्हणजे कुरबुर , वाद चर्चा आल्याच. आजी मुख्य, जनरल मॕनेजर. तीचा शब्द शेवटचा असे. शैक्षणिक प्रश्न दादा म्हणजे सर सोडवत असत.
सर्व विषयात पास ही साधारण बौध्दिक पातळी असे. मार्कांची फार मक्तेदारी नव्हतीच. मॕट्रीकला चांगले मार्क हवेत. फर्स्ट क्लास म्हणजे हुशार . त्याने सायन्सला जायचे, मग ऊतरत्या क्रमाने काॕमर्स, आर्टस. ही तेंव्हाची रुढ पद्धत होती. त्यात काही अर्थ नाही हे आता समजते.
कला वगैरेना किंमत नाही हे ऊगीचच गृहीत धरले होते. विजूआक्का, वासंतीताई, यांचे आवाज गोड होते. त्या सुंदर गाणी म्हणायच्या. वासंतीताई विनायकराव पटवर्धनांकडे गाणे शिकली होती.
सोप्यात मोठ्ठा झोपाळा टांगला होता. तो कधी माजघरात बांधायचो. आतेभाऊ नंदू सतत झोपाळ्यावर अभ्यास करत बसलेला असे. तो हुशार होता. घरातला पहिला इंजीनिअर म्हणून त्याचे सर्वांना फार कौतुक असे. माजघरात गणपतीचा कोनाडा. गणेश चतुर्थीला तो रंगवायचो. आरत्या म्हणायला सगळे हजर असत. मोठ्याने टाळ, घंटासह आरत्या व्हायच्या.
माजघरात एका फळीवर मोठा व्हाॕव्हचा रेडीओ होता. समोर त्याचा स्पीकर ठेवला होता. सकाळची भक्तीगीते, बातम्या व मुख्य म्हणजे नाट्यगीते रोज ऐकायचो.
भटजींना बोलावून लघूरुद्र, महारुद्र, शांती, म्हणणे , सत्यनारायण, अनंताची पुजा असे सारखे काहीना काही चालत असे. मग त्याच्या तया-या, बोलावणी, सवाष्णी, ब्राह्यण असे बरेच. मुलांना रस म्हणजे मिष्टांन्नांची जेवणे.
गुरुवारी भजनाच्या बायका चारच्या सुमाराला यायच्या. सतरंज्या घालायच्या. पेटीसाठी जोगळेकर , महाजन मास्तर यायचे. " अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार त्या ज्ञानराजेश्वराशी." याने सुरुवात व्हायची. मग नामाचा घ्या, रुपाचा घ्या, दत्ताचा, देवीचा असे अभंग घ्यायच्या.
"काय आवाज, काय ओरडताहेत." अशा आमच्या प्रतीक्रिया असत. रवीवर्मांच्या प्रेसची देवांची चित्रे येत. त्यांचे फोटो सर्व सोपाभर अडकवलेले होते. त्यांची किंमत न समजल्यामुळे ते पण आवडायचे नाहीत.
हादगे, गौरी यांच्यामुळे स्त्रियांचे सतत येणेजाणे असायचे. घागरभर रस आणला जाई. तसेच दिवाळीला भरपूर फटाके.
आजी, आजोबा, काका, काकू गेले. सगळे वेगळे झाले. कुटूंबे छोटी झाली. तरी खूप वर्षे वाडा होता. कालौघात तोही जूना झाल्यामुळे पाडावा लागला. आता शिल्लक आहे पत्ता ,दात्ये वाडा, ब्राह्मणपुरी , मिरज, मागच्या तटाची भिंत आणी असंख्य आठवणी.

Comments