अॕड.नयन वाडकर.......................................
नगरहून चिपळूण. पहिली बदली. पावणेचार वर्षे नगरला काढली. तिथली वैशिष्ट्ये बरीच. सगळ्यात मोठे म्हणजे पाण्याचा दुष्काळ. वर्षात मोजून चार ,पाच पाऊस पडायचे. चिपळूणला सामानाच्या ट्रकमध्ये बसूनच गेलो. ड्रायव्हर , क्लीनरही मे महिन्याचा शेवट असूनही वाटेत पाण्याचे साठे, धरण, नदी पाहून खूष झाले होते.
गावाचे पहिले दर्शन अंधारातच झाले. कारण लाईट गेले होते. गावात येऊन ट्रक थांबवला. "कोर्ट कोठे आहे?" समोरच्या पानवाल्यांना विचारले. "ते काय समोर." ते म्हणाले.
आत गेलो. कोणी नव्हते. मग पोलीस स्टेशन. तेंव्हा जरा वेळाने शिपाई ऊगवले. नंतर घरात गेलो .
चिपळूणास जाता ना? मग चितळे आणि वाडकर अशी माहिती झाली होती. आता काम चालू झाल्यावर भेटतीलच म्हटले. नयनवाडकर असेच त्यांचे आडनाव असे मला वाटले होते.
बारला भेट ओळखी वगैरे झाल्या. " आता आमच्याकडे धोतर शिल्लक नाही" असे वाडकर वकिल म्हणाले होते. म्हणजे जुने वकिल आता फारसे नाहीत सगळे नवीन आहेत असे त्यांचे म्हणणे.
बार आणि बेंच संबंध अत्यंत चांगले, जवळचे पण कायद्याप्रमाणे योग्य ते अंतर ठेवणारे असत.
गेल्यापासुन दोन चार दिवसांत मुन्शीसाहेबांची व्हिजीट होती. दुपारी अचानक मला ताप आला. लगेच वाडकर वकिलांनी भडभडे डाॕक्टरांना बोलावले. मी बराही झालो. मुन्शीसाहेब "काय मी आलो म्हणून तुमचे साहेब आजारी पडले काय ?" म्हणाले. तेही तेव्हढेच खिलाडू वृत्तीचे सुंदर साहेब.
हळूहळू कामे सुरु झाली. कोर्टात काय आणि कोठे काय , गिव्ह अँड टेक असे असते. तुम्ही चांगले वागलात की समोरचा तसे वागतोच.
कोकणात फौजदारीपेक्षा दिवाणीवर प्रेम अधीक. साक्षीदार एखाद दुसरा तपासतील कधीकधी तोही नाही. मुख्य भर युक्तीवादावर. तुम्ही किती ऐकता, कसे ऐकता, यावर किती खोल जायचे ते वकिल ठरवत.
एका बाजुला चितळे एका बाजुला वाडकर. अधूनमधून बाकीचे असे असायचे. ए.आय.आर. एम.एल.जे. सगळेच दाखवत. पण वाडकर वकिल योग्य ठिकाणी आॕल इंग्लंड रिपोर्टर सुद्धा दाखवत. अगदी जिल्हा न्यायाधीशांना सुद्धा त्याचे कौतुक वाटत असे.
ब-यापैकी पावणेसहा फुट उंची, लख्ख गोरा रंग, छान राहणीची आवड. नवीन गाडी . कधी गाॕगल असे हिरोसारखे रहात असत. तरीही बोलणे अत्यंत नम्रतेचे. कायदाच काय साहित्य वाचनाची आवड होती. श्री.नां ची सगळी पुस्तके माझ्याकडे आहेत असे म्हणाले होते.
चितळे वकिल जरा मागच्या पिढीचे. थोडे जास्त शांत, विद्वान. तर नयन वाडकर तडफदार नव्या पिढीचे थोडे आक्रमक होते. तरीही आकर्षक . आपले म्हणणे वेगळेवेगळ्या पद्धतीने पटवून सांगणारे. इंग्रजीवर दोघांचे खूप प्रेम आणि प्रभुत्व होते.
एका लिकर फॕक्टरीची केस होती. भरपूर चार पाचशे कागदपत्र. वाडकर वादी आणि चितळे वकिल प्रतीवादीकडून होते. अंतरीम अर्जावरच चार, पाच दिवस युक्तिवाद चालला. प्रतीवादींनी बाबा परुळेकरांना आणले होते. त्या अर्जाच्या हुकूमातच दाव्याचा जवळजवळ निकालच लागून गेला. एन्राॕनच्या केसेसही त्यांच्याकडे असत. त्यांच्या चाॕपरमधुन ते येत जात असत.
राष्ट्र ध्वजाच्या अवमानाच्या दोन, तीन फौजदा-या . वाडकरांनी आणि बुरटे वकिलांनी समरसुन चालवल्या आणि अर्थात आरोपी सुटले.
कायदा वाचताना त्याचा उद्देश, वेगळेवेगळ्या शब्दांचे अर्थ, नंतर आरोप असलेले कलम आणि पुरावा. त्यामुळे निकालपत्र लिहीणे फारसे अवघड उरत नसे.
येव्हढे असले तरी कामे खेळीमेळीत चालत. चहावाल्याने दुपारी भजी केली की आॕर्डर गेलीच म्हणून समजावे. आर.व्ही. कुलकर्णी सरकारी वकिलसुद्धा छान गप्पीष्ट. भागवत वकिल , सोमण वकिल, भोसले वकिल. सगळे सहभागी होत.
वाडकर वकिल अमेरिकेला गेले होते. तेथूनसुद्धा ग्रीटींग पाठवले होते. पंधरा आॕगस्ट, सव्वीस जानेवारीला सगळ्या लहान मुलांना चाॕकलेट आणायचे. माझ्या मुलांच्या ते अजुन लक्षात आहे.
कामे करता करता तीन वर्षे कधी संपली समजलेही नाही. चितळे , वाडकरांचे चिपळूण विसरु म्हणता विसरणे शक्य नाही.
संजयला अधूनमधून फोन होत असतो. आजच म्हणाला "वाडकर वकिल अॕडमीट आहेत." मी म्हटले, " त्यांना काय होतयं. त्याची प्रतीकारशक्ती छान आहे. येतील चार दिवसात घरी." पण नाही. काही वाईट बातम्या पाठ सोडतच नाहीत. पाचच मिनीटांनी संजयच परत फोन," वाडकर वकिल गेले. " भयंकर वाईट वाटले. त्यांच्या घरच्यांना सांभाळा सांगणेसुद्धा अवघड आहे.
पण काय करणार. जसे कोणत्या गावात तुम्ही किती राहायचे हे ठरलेले तसेच हेसुद्धा असावे.
काही वर्षांपूर्वी चितळे वकिल गेले. बुरटे वकिल गेले, आज वाडकर वकिल . बोर्डाच्या दोन बाजु संपल्या. वकिलीतला राजा गेला. त्यांच्या वाटेकडे पाहण्याशिवाय काय करणार आपण. केवळ नमन.
Comments
Post a Comment