गल्लत.....................................

 "या पुढे तू एक शब्द ऊच्चारु नकोस. आजपर्येंत या घरात माझा असा अपमान कोणीच केला नव्हता.पुन्हा तुमचे तोंड बघणार नाही. हा मी चाललो घराबाहेर. " ताड ताड भांडणाचे स्वर रोज त्या गल्लीत ऐकू यायचे. लोकांना प्रथम यांच्या घरात अतुल आणि आई दोघेच राहतात मग भांडते कोण? असा प्रश्न पडत असे. प्रथम काही लोक घरात डोकावूनही गेले.

जाताना मात्र हसत हसत गेले. कारण अतुलच्या घरात आम्ही "घराबाहेर" या नाटकाची प्रॕक्टीस रोज करत होतो. पहिला अंक बसत आला होता. आता दोन तीन दिवसांनी दुसरा अंक बसवायला घेऊ असा विचार होता. नाटक करायचे होते एका काॕलेजच्या गॕदरिंगसाठी.
त्या काॕलेजची मुले अजून नाटकात इतकी तयार नव्हती म्हणून आम्ही ही सुपारी घेतली होती. त्यांचा आग्रह म्हणून त्या काॕलेजचे "पाटील" सर डायरेक्शन करत होते. आमचा नेहमीचा डायरेक्टर विवेक नाटकात काम करत होता.
थंडीचे दिवस होते. रात्रीचे अकरा केंव्हाच वाजून गेले होते. प्रॕक्टीस संपली. थोडा वेळ अतुलच्या घराबाहेर बसून गप्पा मारल्या. कितीही प्रॕक्टीस केली तरी नंतरच्या गप्पा विशेष असतात. त्या चुकवता येत नाहीत.
विवेकने नेहमीची रेकाॕर्ड चालू केली. "बाबा उगीच मागे लागतात. नाटक करु नको. अभ्यास कर " म्हणतात. "आता आर्टसला काही अभ्यास असतो का? आणि दरवर्षी पास होतोय की नाही ? बस्स." हे त्याचे मत. ते त्याच्या बाबांना अजिबात पटायचे नाही.
कधी त्यांच्या घरी बाबा भेटले की त्यांना समजवत असू. " विवेकला नाटक आवडतय . इतक चांगल जमतय तर करु द्या की त्याला काम. तुम्हीपण नाटक, सिनेमात कामे करत होता ना?" ते त्यांना पटायचे. मग काही दिवस बाबा गप्प असत.
असे सांगून झाल्यावर पाटील सरांनी त्यांच्या काॕलेजतल्या गंमती सांगायला सुरुवात केली. " सर आता बास.त्या चहावाल्याकडे जाऊन चहा मारु. " अतुलने चांगली आठवण करुन दिली.
अतुलच्या गाडीवर मी बसलो. सरांच्या गाडीवर विवेक बसला. हाॕस्पीटलजवळच्या चहावाल्याकडे पोचेपर्येंत चांगले पावणे बारा वाजले. तो स्टाॕल बंद करायलाच लागला होता. " आज वेळ केलात. प्रॕक्टीस झाली का?चहा संपतच आलाय. बघतो किटलीत काही आहे का?" त्याने आपुलकीने विचारले.
सुदैवाने चौघांना अर्धा अर्धा कपमिळाला. थोडा चहा उरला. तो त्याला प्यायला लावला. सरांनी सिग्रेट ओढली. चला आता सगळे झाले. आता निघुया म्हणता म्हणता आणखी थोडा वेळ गेला.
सरांना घरी सोडायचे .येताना तिघांनी एका गाडीवर यायचे असा विचार केला. सरांचे घर गावाच्या एका टोकाला पाटील गल्लीत होते.
रस्ते सगळे सुनसान. नेहमीसारखे मुख्य चौकातुन पुढे गेलो. पाटील गल्लीच्या अलिकडे दोन तीन गल्ल्या होता. तेथे लाईटच नव्हते. " या बोर्डाची रोजची कटकट आहे. दिवसभरात एकदा तरी लाईट घालवल्याशिवाय यांना चैनच पडत नाही." विवेकने त्याचे मत मांडायला सुरुवात केली. "
एका गल्लीतुन वळून पुढे जातो तो काय. एका घराच्या कट्यावर पाच सहा चांगले धिप्पाड दिसणारे काळे कभीन्न लोक हातात मोठमोठ्या काठ्या घेऊन बसलेले होते.
माझ्या पोटात क्षणभर गोळाच आला. "अरे हे दरवडेखोर , चोर दिसताहेत. त्यांचे लक्ष आपल्याकडे जाईतोपर्येंत पळावे. चला सर गाडी वळवा.दुसरीकडुन जाऊ " मी सरांना म्हटले. " थांबा बघुया तरी काय होतेय?" असे सर म्हणेपर्येंत त्यांचे लक्ष आमच्याकडे गेलेच.
" सापडले बघा चोर. " म्हणत ते लोक काठ्या घेऊन पळतच आमच्याकडे आले. आम्हाला उतरवून आमचा समाचार घेणार येव्हढ्यात एकाचे लक्ष सरांकडे गेले. तो बाकीच्यांना म्हणाला, " अरे गाढवांनो थांबा. हे पाटील गल्लीतले दिसतात. "
तेंव्हा कुठे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. चोरांना पकडून समाचार घेण्याचा आनंद अचानकच फुस्स झाला.
त्यांनी चौकशा सुरु केल्या. सरांनी नाटकाबद्दल सांगितले . आमच्या ओळखी त्यांना करुन दिल्या. त्यांनी सांगितले की त्यांच्या भागात अलिकडे चोऱ्या फार व्हायला लागल्या होत्या. चोरांना गाड्यांवरुन निघुन जाताना कोणीतरी पाहिले होते.त्यांना पकडण्यासाठी प्रत्येक गल्लीतल्या तरुणांनी गस्त लावली होती. आज दुस-या गल्लीतल्या मुलांची गस्त होती म्हणून त्यांनी सरांना चटकन ओळखले नाही.
म्हणून त्यांना वाटले "आम्हीच ते गाडीवरचे चोर." आम्हाला वाटले " हेच ते लाठ्या काठ्या घेऊन तयारीत असलेले दरोडेखोर. "
एकमेकांची गल्लत समजल्यावर "थोडक्यात मार चुकला"असे विवेकने म्हटल्यावर दरोडेखोर आणि चोर हसायला लागले. त्यांच्यापैकी एकाचे घर जवळच होते. तीथे त्यांनी चहा सांगितलाच होता. त्यांच्या आग्रहाने परत थोडा थोडा चहा प्यायलो.
मग तडक घरी आलो. तिथला माहोल निवळेपर्येंत सरांना तुम्ही एकटेच घरी जात जावा सांगितले . आणि पुन्हा जोमाने प्रॕक्टीसला लागलो. नाटक झाले. सर कधी दिसले एकमेकांना "काय चोर कसे काय चालले आहे? " म्हणतो आणि हसत बसतो.

Comments