पोळ्यांचे प्रयोग.............................................
पोळी, भाकरी, रोटी, नान, पराठा , कुलचे ही भावंडे भारतीय अन्नव्यवहारातील महत्वाचे घटक आहेत. अर्थात त्यांच्याशिवाय आपले जेवण पूर्ण होऊ शकत नाही. तरीही रोजच्या साध्या पोळीला काय किंमत असते ते घराबाहेर राहिलेल्यानांच उत्तमपणे समजते.
आता अगदी घरच्यासारख सगळं असले तरी ते सारखच असते. घरच नसते. गरमपणा ह्या गुणावरच ते वेळ मारुन त्यांची पोळी भाजून घेतात.
कधी घरच्यासारख्या म्हणवणा-या पोळ्या एकपदरी पारदर्शक असतात तर कधी जाड मोठ्याच्या मोठ्या असतात.
हे पाहिलेले असल्यामुळे काहीही झाले तरी पोळ्या आपणच करायचा असा निश्चय मी कारणाकारणाने एकटा राहिल्याच्या वेळोवेळी केला
.आहे काय आणि नाही काय . साहित्य साधेच, कणिक, पाणी, थोडे तेल, पोळपाट लाटणे, तवा आणि गॕस. झाले. शिवाय खाणारे आपण स्वतःच . लहानपणापासून पहात आलेली कृती. केली सुरुवात. कणीक मळणे वगैरे प्रोसेस इथपर्येंत ठीक होते. पण नंतर लांबून पाहणे सोपे का असते ते समाजले. ते मुले म्हणतात तसे" इफ यू नो दी आन्सर्स दे चेन्ज दी क्वस्चन पेपर."
लाटण्याने पोळपाटावर लाटलेला तो गोळा पोळपाटच सोडेना. काढला ओढून आणि परत पीठ घालून नवा लाटला. आता तो पोळपाटाला चिकटेना पण घट्ट झाला. असुदे म्हणून पद्धतशीर घड्या घालून पोळी का पोळा केला आणि ठेवला तव्यावर.
पोळी फूगणे लांबच पण उलटी पालटी करुन भाजल्याने मस्त कडक रोटी आणि पापड यांच्यामधले काहीतरी तयार झाले. नशीब पीठ फार नव्हते. दोन तीन रोट्या खाल्या. बाकी स्वयंपाक उत्तम येत असल्याने फारसे नडत नव्हते.
मग भेटतील त्या भगीनींना विचारायचे . त्या सगळे ऐकून घेऊन पीठ कसे आहे, किती मळता, तवा कोणता असे विचारायच्या. त्यांच्या सांगण्याप्रमाणे पीठ, गोळ्याचा मऊपणा, बदलून कोणी म्हटले म्हणून नाॕन स्टीक तवा आणून सगळे झाले .गॕस तेव्हढा बदलला नाही.पण रिझल्ट ग्रेस पासापुरताही येईना.
मुली कशा लहानपणापासून आईकडून शिकतात तसे सुटीत मेघनाकडून सगळी कृती पाहून घेतली. माझ्याबरोबर पोळ्या शिकणारी पुतणी राधीका फटाफट पोळ्या करायला लागलीसुद्धा.
एकदा जाहीरात वाचली. रोटी मेकर. अशी मस्त जाहीरात की वाटल सुटले आता कोडे. गेलो. तो माणूस थोडीशी कणीक मऊसर घेऊन मशीनमध्ये ठेवे आणि थोडे दाबून मशीन लावले की पोळी बाहेर. किंमत फार नाही. फक्त अठराशे. घेतले मशीन.
घरी प्रात्यक्षिक पाहता कुठे एका बाजूने जाड, एकीकडून पातळ अर्धवट भाजल्यासारखे काहीतरी बाहेर पडले. बघू सावकाश म्हणून ठेऊन दिले. पुढे ते मार्केटमधूनही गेलेच.
हे त्या सारेगम च्या स्काय शाॕप मधील जाहीरातीसारखे. आठ दिवसात कॕसीओवर कोणतेही गाणे वाजयायला यायचे म्हणे. बरे झाले ते घेतले नाही. हे सगळे आतून यायचे असतं ना त्याला नुसते उपकरण असून चालत नाही. लागते ती चालवायची विद्या. तीचे दुकान नाही ना अजुन कुठे. म्हणून अडचण.
गिरनारखाली जुनागडला पाहिले पोळपाट वगैरे काही नसता कट्ट्यावर जाड लाटण्याने फटाफट पोळ्या लाटून एकावर ठेऊन भाजत होते. एका लांब सळईने परतत होते. हे स्कील.
हळूहळू प्रयत्न सुरु होते. सगळे चांगले असून माझे वजन कमी का होतेय तेच कळेना. कोणी म्हणे आजार आहे का? तर कोणाला वाटे डाएट. पण तो पोळीप्रताप आहे फक्त मलाच माहिती होते.
आता त्यांनीसुद्धा थोडा रुसवा सोडला होता. चार पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर गोळा मध्यम मऊ घ्यायचा, सारखी उलटायची नाही , दाबायची नाही ह्या टिपस् मिळाल्या.
आता आकार सोडून सगळ यायला लागल. त्यांच्या पोळ्यांचा गोलाशीवाय कोणताही आकार होत नाही आणि माझ्या पोळ्यांचा गोल सोडून सगळे आकार होतात. अर्ध्या केल्यावर काय कळतय म्हणून अर्ध्याच करुन ठेवतो.
कधीतरी ब-या झाल्यात असे म्हणणे शेवटी एकदा पास झाल्याचे समाधान मिळवून देते. या एकदा जेवायला .
Comments
Post a Comment