पुस्तकांच्या जगात........................................
जागतिक पुस्तक दिन. तेंव्हा पुस्तकप्रेमींनी व्यक्त होणे अपेक्षितच आहे. शाळेत जाऊन पहिली अक्षर ओळख झाल्यापासून आपली पुस्तकांची गट्टी सुरु होते . काहींना अभ्यासाच्या पुस्तकांचा कंटाळा वाटल्यामुळे सर्वच पुस्तकांचा कंटाळा वाटू लागतो. तर काहींना मात्र अन्न, वस्त्र, निवा-यासारखी पुस्तके ही जीवनावश्यक वस्तूच वाटते.
लहानपणीच्या पुस्तकांत "खालील पुस्तके मिळवून वाचा" असे म्हणून त्या त्या लेखकाच्या काही पुस्तकांची नावे लिहीलेली असत.
पण तेंव्हाचा उत्साह आणि कोठून मिळवून वाचा हे न समजल्यामुळे ती पुस्तके मिळवून वाचायला फार वर्षे गेली. अर्थात बिघडले काहीच नाही. तेंव्हा ती मिळाली असती तर? याला काही अर्थ नसतो.
माझ्या काकांमुळे आमच्या घरातल्या बहुतेकांना वाचनाची आवड लागली. ते काका इंग्रजी शिकवत पण कोणत्याही विषयाचे वाचन त्यांना वर्ज नसे. अगदी कॕलक्युलसचे पुस्तक सुद्धा ते एखादा कथासंग्रह वाचावा तसे वाचत. ते दिवसभर एकतर शिकवत किंवा वाचत बसलेले असत.
काय देतात पुस्तके आपल्याला? पुस्तके वाचून तसे व्हायचा प्रयत्न करावा का? तसे होता येते का? असे बरेच प्रश्न उभे राहतील. कोणी कोणासारखे होणे हा विनोदच असतो. तसे होता आले असते तर बरेच प्रश्न झटकन सुटले असते. पण तसे होत नाही.
पुस्तके वाचकाला दृष्टी देतात असे मला वाटते. लेखकाने कोणत्या प्रश्नाला कसे उत्तर शोधले यावरुन आपल्याला , न हारता आपल्याही प्रश्नांना आपापले उत्तर शोधता येईल ही उर्मी मिळू शकते , हे पुस्तकांचे मोठेच उपकार मानावे लागतील.
सगळीच पुस्तके चरित्रात्मक, ऐतिहासिक नसतात. मनोरंजक आणि विनोदी पुस्तकांनी फार मोठे विश्व व्यापलेले आहे.
आपण सर्वजण अभ्यास म्हणून आवड म्हणून पुस्तके वाचत असतो. आजपर्यंत किती पुस्तके वाचली या आकडेवारीवरुन समोरच्याला अचंबीत करता येईल. पण त्याचा उपयोग काय? एखादे छोटेसे पुस्तकसुद्धा कधीकधी बरेच काही सांगून जाते.
काॕलेजमध्ये गेल्यापासुन पुस्तके आवडायला लागली. अभ्यासाची पुस्तके वाचायला लागतात , पण ती आवडतात असे वाटत नाही.
तो डिटेक्टीव्ह पुस्तकांचा जमाना होता. शहाण्णऊ किंवा एकशे बारा तेरा, पानांत ती संपत असत. काळापहाड, गुरुघंटाल, समर्थ असे नायक. काळे कपडे घालून, रबरी , आवाज न येणारे बुट घालून नायक , मारामा-या करत, तिरंदाजी करत, गाड्या चालवत, भुतांना वठणीवर आणत .नायीकेला पळवलेले , कोंडलेले असे. तीची सुटका करत. कथानक भराभर पुढे सरके.
एक लायब्ररीवाले काका एका दुकानाच्या फळीवर पुस्तके मांडत. कधीकधी तिथल्या तिथे जास्तीत जास्त घरी पोचेपर्येंत पुस्तक वाचून संपलेले असे. लगेच बदलता येत नाही म्हणून दुसरे दिवशी जायचे येव्हढेच.
कधीकधी पु.लं चे कधी चि.वीं चे पुस्तक हाती लागे. मग काय मस्त वाटे. आमच्यात बहुतेकांनी पु.ल. व.पु. शंकर पाटील, यांची पुस्तके अनेकवेळा वाचली आहेत. त्यामुळे भेटल्यानंतर, फोनवर एकाने एक वाक्य म्हटल्यावर पुढच्या वाक्याचा प्रतीसाद आला की मजा वाटते. इतरांना प्रथम हा काय प्रकार असे वाटते. "रानात उन्ह असेल " म्हटले की " रानात उन नसत. झाडझाडोरा असतो. पाणी प्यालेली जमीन अस्ती." किंवा "आग्रह नाही आमचा. नाटकाला या म्हणून ." नंतर " गावात तर आग्रहाचे बोर्ड टांगलेत." असे.
आपण लहानपणी जी पुस्तके स्वतःहुन समरसून वाचतो , ती आपली खरी आवड असते व आपले कार्यक्षेत्र त्यातून दिसते असे मला वाटते. कदाचित हे उलटही असेल की आवडीमुळे आपण तिकडे आकर्षीत होत असू.
मला त्या फायटींग बरोबर किंवा पेक्षा कोर्टात वकिल कसे उभे राहिले, कसा उलट तपास घेतला, कसा युक्तिवाद केला हे वाचायला फारच छान वाटत असे.
एक मोठे लेखक व वाचक म्हणाले की, आमचे वाचन म्हणजे एखादे जनावर जसे चारा खाताना कोणता सर्व्हे नंबर आहे ते पाहात नाही तसे असते. तर आचार्य अत्रे म्हणत की पहीलवान होण्यासाठी जसे खूप खावे , पचवावे लागते , तसेच ज्याला लिहायचे, बोलायचे आहे त्याला अखंड आणि वेगवेगळे वाचलेच पाहिजे.
श्रीपाद कृष्णांचा विनोद, पु.लं चा विनोद, आचार्यांची शैली या वेगळेवेगळ्या गोष्टी आहेत. गडक-यांच्या नाटकांतील पल्लेदार, तेजस्वी वाक्ये नाटकासारखी दृश्य रुपात फेर धरतात.
इंग्रजी वाचनाची गोडी अशीच वेगळी आहे. अगदी सोप्या , हलक्या रहस्यमयतेकडून साहित्याकडे जाता येते. अर्थात प्रत्येक भाषेची अशी कित्येक सौंदर्यस्थळे असतात. आपल्याला नीट पोहता वगैरे आले की बुडून मोती काढता येतील. कोणी लहान मोठा काही नसते. सगळ्या पुस्तकांत काही ना काही वाचनीय असतेच. तेव्हढेच घ्यायचे.
आता आवडत्या मनात घर केलेल्या काही पुस्तकांविषयी. ही यादी प्रत्येकाची वेगळी असते. अपूर्व आणि अपूर्ण असते. कोठून सुरुवात करावी कोठे शेवट करावा काही समजत नाही. आत्ता आठवतात म्हणूनही यादी.
सुरुवात बंडोपंत देवलांच्या " सर्कसबरोबर चाळीस वर्षे" या पुस्तकाने करतो. चाळीस रुपयांचे हे पुस्तक. कित्ती छान आहे.आपण सर्कसच्या तंबूत बंडोपंतांबरोबर राहून अनुभव ऐकतोय अशी भाषा आहे. प्राण्यांचे, माणसांचे स्वभाव, सर्कस खेळ तयार करणे सर्व काही आहे त्यात.
"मोगरा फुलला" हे आप्पा म्हणजे गो.नींचे पुस्तक . रसाळ भाषा म्हणजे काय याचा वस्तूपाठ म्हणावा असे ज्ञानेशांच्या जिवनावरचे कादंबरी रुप.
"नाॕट विदाऊट माय डाॕटर " आणि "मुलगा माझाच" ही दोन भिन्न पार्श्वभूमीवरील मनस्वी स्त्रीयांच्या मुली , मुला साठीच्या कायदेशीर लढ्याची चित्रे आहेत. ती वाचल्यावरच त्यातील गोडी समजेल.
गोंदवलेकरांची प्रवचने मला ऐखाद्या उत्तम युक्तीवादासारखी वाटतात. महाराज सोप्या शब्दात, भाषेत त्यांचे म्हणणे समजावतात. त्यातच इतक्या वेळा राम येतो की आपोआप जप होतो म्हणतात.
वासुदेवशास्त्री ख-यांचे काही लिखाण चुकून हाती पडले. त्यांच्या भाषेतला ताजेपणा, टवटवीतपणा वेगळाच आहे.
राजकीय विषय आवडत नसल्याने मी तिकडे मात्र वळत नाही. कारण त्यातील खरे खोटेपणा आपल्याला निवडता येत नाही.
नाटक हे बघण्यासारखे वाचायलासुद्धा फार छान असते. कथा, कादंबऱ्या , कविता, नाट्य, निबंध, विनोद, शास्त्र, ज्ञान, विज्ञान असे सर्वत्र पसरले आहे.
पुस्तके बोलावतात आपल्याला. "बाळांना या. बसा. आमचा आनंद घ्या. याने तुमच्या चिंता दूर होतील. " आपण पुढे जायचा अवकाश. ती आपले स्वागत करतात. हवे ते दान देतात. कधीच कमी न होणारे.
Comments
Post a Comment