डिजीटल सौभद्र.........................................

 सौरभ देवस्थळी , प्रथीतयश नाट्य दिग्दर्शक होता. सतत नवीन प्रयोग, नवीन पात्रांच्या शोधात असायचा. सर्व मोठेमोठे नट, नट्या त्याच्याकडे एकदा तरी काम करायला मिळावे म्हणून धडपडत असत.

आज मात्र सौरभ वेगळ्याच चिंतेत होता." कट्यार काळजात घुसली," नटसम्राट" वगैरे नाटकांचे सिनेमे झाल्यापासून त्याला एखाद्या संगीत नाटकाचे काहीतरी करावे असे सतत वाटत असायचे.
संगीत रंगभूमीचा तो वैभवशाली इतिहास वाचताना, ऐकताना त्याला अगदी भरुन यायचे. येव्हढे मोठमोठे गायक नट, प्रयोगाचा थाटमाट, राजाश्रय, त्यांचे दौरे, गावोगावी मुक्काम सगळ डोळ्यापुढे उभं रहात असे.
काय झाल? कस संपल सगळं? एकतर इतका वेळ चालणारे प्रयोग, पैसे, प्रयोगांची लांबी, मुख्य म्हणजे चांगले गाणे येणारे नट यांचीच वानवा होती.
तो विचार करायचा या संगीत नाटकांच्या आत्म्याला अजिबात हात न लावता , लांबी वाढवणा-या प्रवेशांची, गाण्यांची थोडी काटछाट करुन तसेच मुख्य म्हणजे उत्तम नट, नट्या घेऊन प्ले बॕक पद्धतीने गाणी केली तर बरेच प्रश्न सुटतील. प्रयोग आटोपशीर , सुंदर होतील. कदाचित नव्या , जुन्या सगळ्यांनाच हे रुपडे आवडुनही जाईल. रंगभुमीची आणखी थोडी वेगळी सेवा होईल.
मनात आलेला बेत सौरभ कधीच तसाच सोडत नसे. किर्लोस्करांच्या " सौभद्र" वर त्याचे अगदी प्रेमच बसले होते. नाटक आणून, त्याचा इतिहास, ते केलेले नट , दिग्दर्शक सगळ्यांचा त्याने उत्तम अभ्यास केला. त्याचा लेखक मित्र श्याम साने याच्याकडून थोडे संस्करण करुन बरोबर एकशे वीस मिनीटात बसणारे सुटसुटीत रुप करुन घेतले होते.
" तुला संगीत नाटकातले काय कळते?" नानासाहेबांनी त्याला पहिला प्रश्न केला. " मला त्यातले काही कळत नाही. म्हणूनच मी तुम्हाला एका नवीन प्रयोगाबाबत विचारायला आलोय. " सौरभने प्रामाणिकपणे सांगितले. तसे नानासाहेबांकडे प्रयोगाचे हक्क असले तरी सध्या कोणी प्रयोगाचे विचारायला येत नसे.
मग नानासाहेबांनी सौरभला सौभद्राबद्दल सांगायला सुरुवात केली. पण ते चकितच होत गेले. त्यांचीही बरीच माहिती ऐकीव असली तरी त्यालाही भरपूर माहिती होती.
त्याने त्याच्या नव्या कल्पनेबाबत सांगितले . " म्हणजे तुम्ही श्रीकृष्णाला पँट नेसवणार का? नवा प्रयोग म्हणे. " "नाना काहीही काय बोलता. रंगभूमीबद्दल, तीच्या इतिहासाबद्दल मलाही तुमच्या येव्हढेच प्रेम आहे. "
त्याने नानासाहेबांना संगीत नाट्य रंगभूमीचे असे का झाले ?याबद्दल त्याचे विचार सांगितले . " नाटकात तुम्ही कणाचा बदल करायचा नाही. " त्याने प्रवेशांच्या , पदांच्या थोड्या काटछाटीबद्दल प्ले बॕक बद्दल सगळे सांगितले .
"याला कोणी तयार होईल?. "नाना. "तयार? अहो लोकांच्या उड्या पडतील. मी आजच्या पिढीचा दिग्दर्शक आहे. लोकांना काय, कसे हवे याचा मला अचूक अंदाज आहे. महाभारत सिरीयल मध्ये काम केलेला नट, कृष्ण करणार आहे. रुख्मीणी , सुभद्रा, बलराम, नारद सगळे ठरलेत. तुम्ही मला सध्या पाच प्रयोग करायची परवानगी द्या. " सौरभने स्पष्ट सांगितले .
नानासाहेबांनी आणखी दोन चार संबंधीतांशी बोलणी करुन सौरभला बोलावले. " तुला इतके बोललो, काही नावे ठेवली तरी तू शांत कसा?" आतून चहा घेऊन बाहेर येत काकू म्हणाल्या " अहो, तो आपल्या नलूचा मुलगा. तुम्हाला आधी सांगायच नाही असेच ठरले होते. " छान .करा म्हाता-याची थट्टा, " म्हणत नानासाहेबांनी सौरभच्या पाच प्रयोगांना परवानगी दिली.
" अरे पण तालमींच काय ?" तालमी सुरु झाल्या आॕनलाईन. सगळे जाम खूष आहेत नविन काहीतरी करायला मिळतय म्हणून . "
आणखीन नवीन बदल म्हणून सौरभने नानासाहेबांना सगळेच काही सांगितले नव्हते. नानासाहेबांना खरेतर तालीम बघायला यायचे होते . पण त्यांची तब्येत इतकी बरी नसे. म्हणून ते जमले नाही.
" संगीत रंगभूमीच्या इतिहासात नवे पाऊल.डिजीटल "सौभद्र" अश्या झगझगीत जाहिराती सोशल मीडीयावर , पेपरमध्ये , टि.व्ही वर झळकु लागल्या.
नवीन प्रयोग, टि.व्ही वरचे नट नट्या , दिग्दर्शक सौरभ देवस्थळी, फक्त दोन तास .साडेसात ते साडेनऊ. लोकांचा विश्वासच बसेना.
सर्व प्रयोगांची आॕन आॕफ , लाईन सर्व तिकीटे प्रयोगाआधीच संपली. सौरभ नानासाहेबांना प्रयोगांचे मानधन आधीच द्यायला आला. " अरे असे कधीच झाले नव्हते. सगळीकडे जाहिराती पाहतोय. अगदी गंधर्व युगाची आठवण झाली. पण होईल ना रे सगळ नीट. प्रेक्षकांना आवडेल ना? " नाना तुम्हाला आणि काकूंना न्यायला माणसे, गाडी पाठवतोय. आणखी कोणाला बोलवायचे सांगा. ?" "नको रे आता आहे कोण आठवणीने बोलावण्यासारखे. ?" नानासाहेब म्हणाले.
प्रयोगाच्या दिवाशी मंडळी चारपासुन थिएटरवर हजर होती. साऊंड, लाईट, बरोबर डिजीट्राॕन कंपनीचे लोक होते. त्यांच्या तया-या सुरु होत्या.
सव्वासातला दरवाजे बंद झाले. आॕर्गनवर मंद संगीत ऐकू येऊ लागले. अचानक सुवासिक स्प्रे फवारले गेले. पडदा ऊघडला. तर मागे मोठ्ठा स्क्रीन दीसु लागला. त्यावर "संगीत सौभद्रचा थोडक्यात इतीहास झळकुन गेला. नानासाहेबांचा संगीत रंगभूमीचे प्रतीनिधी म्हणून मोठा सत्कार केला गेला.
नाटकाला सुरुवात झाली. ओळखीच्या नटांच्या ऊत्तम अभिनयाला लोक भरभरुन दाद होते. श्रीकृष्णाच्या खट्याळपणाला हसत होते. गाणी वेळेवर येत होती. हे तर गाणारे नव्हेत , तरी काहीच कमी वाटत नव्हते. नट नट्याच गाताना दिसत होत्या. वादकांच्या जागांवर वादक दिसत होते फक्त , छान वाद्येही दिसत होती.
वेगळेवेगळ्या प्रवेशांसाठी सेट नव्हतेच. तर प्रत्यक्ष राजवाडे, रस्ते, ऊद्याने, जंगले अशा ठिकाणीच दृश्ये साकार होताना दिसत होती.
जुन्यांसारखे अगदी तरुणसुद्धा नाटक एंजाॕय करत होते. मध्यंतरात चहा काॕफीची सोय तिकीटातच अंतर्भूत असल्यामुळे लोक सगळ्याचे कौतुक करत होते.
घंटा झाली. दुसरा अंक सुरु झाला. पुन्हा सुवासाचा वर्षाव झाला. कथानक पुढे सरकता सरकता कधी संपले समजले सुद्धा नाही. " प्रीये पहा..रात्रीचा समय सरूनी" अगदी समरसुन गायले गेले.
दरवाजे ऊघडल्यासारखे झाले , बाहेर ऊगवतीसारखा प्रकाश दिसला. जुन्या लोकांना क्षणभर पुर्वीचेच नाटक संपून सकाळ झाली वाटले. पण तो प्रकाश योजनेचा खेळ असल्याचे समजले. लोक ऊभे राहून टाळ्या वाजवायचे थांबेचनात. आणि डिजीटल संगीत नाटकाचा जन्म झाला.

Comments