री युनीयन. --१. ...............................
सर्वांनी काढलेल्या फोटो , व्हिडीओंनी ट्रीपच्या मजेची, अनुपस्थीतांना , बरीचशी कल्पना आलीच असेल. पण सगळ्याच गोष्टी कॕमे-यात पकडता थोड्याच येतात? त्यासाठी थोडे तोंडी निवेदनच लागते. तशी काही लोकांनी सूचना केली म्हणून ट्रीपचा रिपोर्ट खास आपल्यासाठी.
शाळेच्या ट्रीपनंतर उद्या येताना सगळ्यांनी "आजची ट्रीप" निबंध लिहून आणा असे शिक्षक बजावत असल्याचे आठवतच असेल. अर्थात दुसरे दिवशी ते कोणी तपासत नसत, हे चांगले होते. नाहीतर ट्रीप नको पण निबंध आवर असे झाले असते.
पुणेकरांच्या मिटींगच्या प्रेमाला बळी न पडता , वैजूने ट्रीपचे खरे मनावर घेतले. प्रथम सातारा, कास- बामणोली जवळचे ठिकाण निवडले होते परंतु गणसंख्या पाहता ते फारसे सुखावह , पुरेसे होईलसे वाटत नव्हते. म्हणून ते बदलेले गेले. नेटवरुन शोध घेता व पूर्वी जाऊन आलेल्या वैजू , राणी, विवेक, किरण यांच्या खात्रीशीर अनुभवावरुन आंबा, ता. शाहुवाडी. जिल्हा. कोल्हापूर .येथील "पावनखिंड रिसाॕर्ट" हे ठिकाण निश्चित केले गेले.
परत परत सर्वांना विचारुन सर्वांची पसंती , तोंडी व लेखी घेतली गेली. रु.२३००/- साधारणतः लागतील असे म्हटले व पाळले गेले. अर्थात त्याबाबत कोणाचीही कसलीही हरकत नव्हती.
कोणी कसे यायचे हे ठरत गेले. अभय आणि धनंजय यांनी ऐनवेळी सबळ कारणांसाठी माघार घेतली. कुलदिपसुद्धा तसा प्रयत्न करत होता त्याचे कारण फारसे गंभीर नसल्याने मनावल्यावर तो ऐनवेळी तयार झाला.
मुंबई, कोल्हापूर , मिरज, पुणे अशा दूरदुरच्या ठिकाणांहून चार श्री आणि सौ. उरलेले नुसतेच श्री किंवा सौ असे एकूण अठराजण जमा झाले.
वैजूने तेथे थंडी असते याचा विचारही करुन सर्वांनी काय काय आणायचे याची यादी दिली होती. काय आणायचे नाही याचीही तोंडी यादी होती म्हणे.
मोबाईलस मुळे सगळे एकमेकांच्या सतत संपर्कात होतेच. दहा वा अकरा तारखेला शक्य तेव्हढे स्थलदर्शन , भरपूर गप्पा येव्हढेच कमीतकमी ध्येय गाठायचे ठरले होते.
मी एक वाजता विवेकच्या घरी पोचलो. थोड्या वेळाने किरण व कुलदिप हजर झाले. थोड्या वेळाने निघालो. पुणेकर , खेड शिवापूर सोडून साता-याकडे रवाना झाले होते. आमचा प्रवास तसा थोडाच होता.
वारणा , बोरपाडळी मार्गे मलकापुरला पोचलो. कुलदिप , विवेक यांच्या कोरोनामुळे व्यवसायांवर झालेले चढऊतार या विषयावर गप्पा रंगल्या होत्या.
वाटेत "फौजी चहा" असे नुसते नावच नव्हे तर हुतात्मा फौजीची पत्नी व एका फौजीची माता असलेल्या ,एका माईकडील मस्त चहा प्यायलो.
मलकापुरी किरणला रक्तचंदन या दुर्मिळ वृक्षाची चौकशी करावयाची होती. पस्तीस एकरात पसरलेल्या व "पस्तीस एकर प्रशस्त जागा, लागेल ते रोप मागा" . अशी जाहिरात केलेल्या शैलेंद्र नर्सरीत गेलो. पाण्याने थोडाफार चिखल झाला होता. आणखी पाणी मारत होते.
वेगवेगळे पक्षी न बोलावता आले होते. खालच्या नर्सरीत रक्तचंदन नव्हते. मग वरच्या नर्सरीत पहा म्हणाले. वरच्या नर्सरीत गेलो. तेथे काही रोपे अगदीच लहान होती. मोठी झाडे हवी होती. ती मागे होती. त्यांचे दर , वाहतूक याची चर्चा झाली. मग निघालो.
किरणला रस्ता व्यवस्थित माहिती होता. विवेकला मनाली (रेसाॕर्ट) माहिती होती. साडेचारच्या सुमारास पोचलो. पुणेकर कोल्हापूरकर आधीच पोचले होते. सगळ्यात जवळचे सगळ्यात उशीरा का पोचले याबद्दल प्रेमाने विचारपुस झाली.
हा कोण? ही कोण? तेंव्हा वेगळा/ळी च होता नाही? झाले.
बाकांतले काही फूटांचे अंतर केव्हाच संपले होते. कारण ते तसे नव्हतेच. रोज भेटत असल्यासारखे झाले. मैत्रीचे असेच असते. महिने , वर्षे , मैल हे अंतर मैत्र जाणत नाही. खोल्या ताब्यात घ्या. सांगण्यात आले. वैजूने अकरा ते एकोणीस क्रमांकाच्या खोल्या घेतल्या असल्याचे सांगितले . आम्ही बारा व तेरा नंबरच्या खोल्या घेतल्या. स्वाती , रमेशभाईनी एक खोली घेतली. बाकीच्यांनी आधी खोल्या घेतल्या होत्या.
या ठिकाणी "पावनखिंड रिसाॕर्ट" बद्दल थोडे सांगणे बरे ठरेल. पावनखिंडीला जवळ म्हणून हे नाव घेतले असावे. प्रभाकर शिरगावकर या आय.आय.टी यन व त्यांच्या आर्कीटेक्ट पत्नी यांच्या कल्पनेचा हा अविष्कार आहे.
ऐकवीस पूर्णांक दोन दशांश एकरांपैकी पाच एकरात रिसाॕर्ट ईमारत आहे. निसर्ग संरक्षण व पर्यावरण स्नेह ही मुख्य कल्पना आहे. आवश्यक तेव्हढे सेवक जरुर आहेत. तरीही
चहा , काॕफी, जेवण जेव्हढे हवे तेव्हढे, स्वतः घ्यावे, अशी सोय आहे. लाल रंगात थंडगार वाटतील अशा वर्तुळाकार आकारात अकरा ते एकवीस खोल्या बसवल्या आहेत. वर कौले, खाली सिमेंटचा सनला आहे. मोठे सोलर पॕनल बसविले आहेत. सर्वत्र छोटे पाच सहा दिव्यांचे एल. ई. डी. युनीट लावले आहेत.
तेथे कोणी अभ्यासाला जात नाहीत. तरीही छान लायब्ररी सुद्धा आहे. ती शेवटी आॕफीसात दिसली. सॕनेटायझर व कापूस सोडून सर्व वस्तू विक्रीला आहे ही पाटी मालकांचे पुणेरीपण जपणारी दिसली. बाकी सर्व पाट्या तशा सौम्य आहेत.
लाईट बंद करायचे बटनच दिसेना. शेवाटी ते ट्रीप संपताना फॕन रेग्यूलेटरमध्ये सापडले. फॕनचे बटन अन्य कोठे असेल. ते दिसलेच नाही. लागलेही नाही. असो.
पितळी बंब व त्याखाली घंघाळ्याचे बेसीन, मालकांना बोलवायला डायनींग हाॕलमध्ये घंटा, झाडांच्या तिकाटण्यावर छप्पर, लाकडी बुंध्यांचे टेबल, पेपर कप सोडायला नळे, अशा ब-याच मजा दिसल्या.
सर्वजण पोचल्यानंतर चहा काॕफी होईपर्यंत जंगल वाॕक, स्वीमींग, बोटींगची वेळ झाली. विशेष गाड्यांमधून मुले टपावर बाकी चे खाली असे गेलो. कुवतीनुसार लोकांनी बोटींग, स्वीमींग केले. मागामी का काही नावाचा सुंदर शांत तलाव, सुर्यास्त होत आलेला, सोबत मित्र , मैत्रीणींचा मेळा. मग आनंदा पारावार कुठला. काय बोलू, किती बोलू असे झालेले. वेळ थोडा सोंगे फार अशी परिस्थिती . पुढच्या वेळी सोंगे कमी करायचे ठरले.
सगळे फिरुन येईतो बराच वेळ झाला. पुन्हा चहा झाला. मग बसलो कार्यक्रमाला. खोल्यांसमोर खुर्च्या मांडल्या. अकरावीनंतर काय? म्हणजे काय केले , काय नाही , याचा हिशोब मांडू म्हटले.
पहिल्या, दुसऱ्या , तिसऱ्या नंबरवाल्यांनी यशोगाथा वाचल्या. रामकृष्णाने मेडलस् मिळवल्याचे सांगितले . राणीने शंकरशेठ कथा सांगितली. स्वातीने ती घरात काय काय करते सांगितले तर रमेशभाईंनी त्यांच्या टायर व्यवसायाबद्दल माहिती दिली. जोशी सरांनी त्यांचे क्लास, मोठ्ठे आजारपण त्यात सुधाने दिलेली साथ याबद्दल सांगितले. तर चव्हाण बाईंनी तीचे शिक्षण आवड असून पूर्ण का झाले नाही याची खंत बोलून दाखवली.
सगळेजण आपापल्या जिवनात खूप यशस्वी , आनंदी असल्याचे दिसले. सगळ्यांची मुले तर आणखी पुढे बरीचशी परदेशात आहेत. वासंती मुलांकडे आठ नऊ वेळा , अमेरिकेत जाऊन आली. पहिल्या वेळेस हिथ्रो विमानतळावर विमान बदलताना कशी मजा झाली ते तीने येताना गाडीत सांगितले .
दहा वाजत आल्यावर अनिच्छेने ऊठलो. यथास्थित सामीष, निरामीष भोजनावर तावा मारल्यानंतर पुन्हा मंडळी बसली. राणीने किर्तनाच्या शिक्षणाबद्दल आवडीबद्दल सांगितले . राणीने प्रथम स्वतः रचलेला" हायस्कुलची मुले " हा पोवाडा जोरात म्हटला.
"सत्य" विषयावर थोडके परंतु अत्यंत सुंदर किर्तन टाळ वाजवून , गाऊन सादर केले. प्रचंड थंडीमुळे काहींचे डोळे मिटू लागले तेंव्हा ऊठलो. सुधाने खास कोल्हापूरच्या गुळाच्या ढेपा आणि हलवा सगळ्यांना दिला.स्वाती आणि रमेशभाईंच्या लग्नाचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस, मुलांसारखा रात्री बारानंतर साजरा करु म्हटले. बारा वाजूनही गेले होते, पण सगळे झोपेला आल्यामुळे तो दुसरे दिवशी सकाळी तीच्याच सुनेने केलेला मस्त केक कापून , तीनेच आणलेली द्राक्षे वा भडंग खाऊन साजरा केला. दिस गोड झाला.
सकाळी नाष्टा झाल्यानंतर आपापल्या गाडीने जंगलात फिरुन आलो. मस्त रस्ते असलेले माणसाळलेले जंगल. डोंगर द-या आणि माकडे येव्हढेच दिसले. प्रसिद्ध पावनखिंड पाहिली. दरीत उतरुन आलो. पुराव्यादाखल फोटो काढले.
जेवणानंतर मी थोडे काव्यवाचन केले. चहानंतर स्वाती , श्याम, रामकृष्ण , राणी , वैजू , जोशी सर यांस कंठ फुटला. खूप फोटो काढले. पुरनागमनायच म्हणत सर्वांनी आपापल्या गाड्यांत पाय ठेवले. पोचल्याचे संदेश आले. मंडळी ट्रीपचे टाॕनीक घेऊन वर्षभर ग्रुपवर आहोतच म्हणू लागली.
पुढच्या वेळी काय करायचे काय नाही ते ठरले. मॕनेजर वैजू आणि टीमने नोंद घेतली. आणि री युनीयन ट्रीप संपली..
Comments
Post a Comment