वास्तव....................................

 "बापूराव तुम्ही काहीही म्हणा आजचा तुमचा "राजकारणाचे सत्य स्वरुप " लेख ज ब र द स्त. तुम्ही सगळ्यांचे पितळ ऊघडे पाडून वर सगळ्यांना चार बोल सुनावलेत. मजा आला." "वहिनी चहा होऊ द्या ." हे बायकोला ऊद्देशुन.

रमेशराव साने माझे लहानपणचे दोस्त आणि शेजारी. माझे कोठेही काहीही छापून आले की त्याच्यावर पहिली नजर रमेशरावांची पडलीच म्हणून समजा. ऊलट दुसरे मित्र काका साखरे मी लिहीन त्याच्या ऊलट बाजु मांडायचे. ते सुद्धा अगदी हिरीरीने . ते यायचे संध्याकाळी.
चहा आला. रमेशराव थांबतच नव्हते . "वहिनी चहा बेश्ट . शिल्लक असला थोडा तर आणा." हीला असे कौतुक हवेच असते. थोडा चहा शिल्लकही असतोच. ती तो घेऊन आली.
"बसा आता निवांत.वहिनी मी काय म्हणतो, बापूराव आता इतके चांगले लिहीतात. सगळीकडे नाव झाले आहे. कशाला ती आॕफीसातली नोकरी करतात. आता वयाची पन्नास वर्षे आणि काय वीस, बावीस वर्षे नोकरी झाली की स्वेच्छानिवृत्ती योजना आली ना? ती घ्या. आणि दिवसभर लिहा की. मी आणतो काम."
नेहा म्हणाली, "खरेच काय हरकत आहे. भावजी म्हणताहेत तसे केले तर. एका मुलीचे शिक्षण. ते तेर या वर्षी संपतच आले आहे. जरा फिरुन, बीरुन येऊ."
मला हा प्लॕन अजिबात पसंत नव्हता. मी आपला छंद म्हणून इकडेतिकडे बरेच दिवस लिहीत होतो येव्हढेच. तो दिवसभराचा ऊद्योग होऊ शकेल ,म्हणून त्यासाठी नोकरीतुन स्वेच्छानिवृत्ती घेणे मला आवडले नसते.
"बर. बर. प्लॕन छान आहे. विचार करुया. नेहा मला जेवायला वाढ. " मी म्हणालो. थोड्या वेळाने रमेशराव गेले.
मी आॕफीसात आलो. आज तर सात आठच्या स्टाफपैकी चार जण रजेवर होते. बरे जे आले होते ते दुस-यांचे काम करायला तयार नसायचे. बरे मोजणी खाते असल्यामुळे लोकांची अखंड गर्दी . कोणाला लवकर मोजणी करुन हवी असे तर कोणाला हद्दी निश्चित करुन हव्या असत. ऊतारे मागणीचे अर्ज फक्त सोमवारी घेत असू तरी बरेच काम बाकी असायचे. आॕफीसचा मुख्य म्हणून सगळे माझ्याकडेच येऊन थडकत.
असेल त्याच्याकडून काम करुन घ्यायचे ही माझी पद्धत असल्यामुळे स्टाफला तसा माझा वैतागच वाटत असे. वरवर मात्र तसे कोणीच दाखवत नसे.
कामे सुरु झाल्यावर माझ्या मनात विचार आला. "बस्स झाले आता काम. इतकी वर्षे केली नोकरी. मस्त रहावे. पेन्शन मिळेलच. दिवसभर मनसोक्त लिखाण. विषयांचे बंधन नको. की नोकरीचे बंधन नको.
माझा मीच एक कागद घेतला . पाकिटात घालून हेड आॕफीसला पाठवून दिला. आवश्यक त्या सुचना तिकडे दिल्या.
घरी आलो. नेहाला म्हटले. "चल केले तुझ्या मनासारखे. स्वेच्छानिवृत्तीची नोटीसच दिली. आता महिनाभर आॕफीस नाही. "
"अरे. वाः कधी नव्हे ते माझे ऐकलेत. तसे मला काही खरे वाटत नाही आहे. आत्ता रीमा काॕलेजातुन येईल. ती काय म्हणते बघु."
रीमा म्हणजे नेहाच्या उलट. पप्पा करतील ते बरोबरच हा तीला विश्वासच असायचा. "बरे केलेत हो पप्पा. माझे बी.ए. होईल या वर्षी. मला एम. ए.च्या अभ्यासाला मदत करा. " ए बाई. तुझे ते तर्कशास्त्र मला काय कळणार. तुझा तू अभ्यास बघ. " मी म्हणालो.
"नाही पप्पा . तुम्ही इतके लिहीता. तुम्हाला काय अवघड. ?" बर बर. पुढचे पुढे पाहू म्हणून मी विषय टाळला.
दूसरे दिवशीपासुन खरेच आहे का काही किंमत आपल्या लिखाणाला याचा शोध घ्यायला निघालो.
ज्या वर्तमानपत्रात मी अधूनमधून लेख लिहायचो त्या संपादकांना भेटावे म्हणून त्यांच्याकडे प्रथम गेलो. ते कामात होते. जरा वेळाने ते रिकामे झाले. मी त्यांच्या केबीनमध्ये गेलो. "दादा , आता मी बराच रिकामा आहे. तुमच्या वर्तमानपत्रात रोज किंवा आठवड्याच्या पुरवणीत लिहायला मिळेल का?"
दादा म्हणाले ," का हो बापूराव नोकरी संपली का? अहो तुमचे छापतो ते कधीतरी बदल म्हणून .तुमची मते म्हणजे सामान्य माणसाचा आवाज. विचारतो कोण त्याला? तुम्ही आज एका पक्षाला बरे म्हणाल तर ऊद्या त्यालाच शिव्या. इथे तसे नाही चालत." आमचे ट्रस्टी म्हणजे मालकच. आम्ही त्यांना बांधील असतो. हां ते सोडून , हलके फुलके ,कथा वगैरे आणलेत कधी तर छापू."
झाले पहिल्याच घासाला खडा लागला. पण अजून सुरुवात होती. काही दिवसांनी आणखी दोन तीन वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटलो. दादा म्हणाले तेच त्यांनी वेगळेवेगळ्या भाषेत सांगितले .
आॕफीसचा त्रास नसल्यामुळे नेहा आणि रीमा जाम खूष होत्या. अधूनमधून मस्त फिरणे, हाॕटेलींग जोरात सुरु होते.
एकदा रमेशराव म्हणाले, तुमची ती कादंबरी घ्या. आज एका चॕनल हेडकडे जायचे आहे. रमेशरावांनी ओळखी काढून ठेवल्या होत्या. दूपारी चार वाजता आम्ही त्या कसल्यातरी क्रीएशनच्या आॕफीसात पोचलो.
चॕनल हेड कोणी मनतानी होते. त्यांनी स्टोरी डिपार्टमेंटच्या मयूर मानेंना बोलावले. त्यांच्या सांगण्यावरुन मी त्यांना माझी कांदबरी ऐकवली. " सर, ही वाचायला ठीक आहे. पण तुमचे विचार आहेत ना ते बरेच जुने आहेत. सध्या कोणी असले पहात नाही. आम्हाला रोज ड्रामा लागतो. त्यात कंटेंट नाही हे आम्हाला कळते . पण चालते तेच दाखवावे लागते. तुम्ही आमच्या घोस्ट रायटिंगलाही कंटाळाल. बघा येता का ऊद्या. आत्ता मी सीन देतो. ऊद्या त्याच्यावर बावीस मिनीटे चालेल असे स्क्रीट द्यायचे.
सासू सुनेला म्हणते, तुझ्या आईने असेच शिकवले का? बरोबर आहे तुझे भिक्कार माहेर. तेथे कसली शिकवणूक असणार.?" आम्ही ऊडालोच. म्हणेल तसे स्क्रीप्ट पाडणारे लेखक म्हणजे मला आॕर्डरप्रमाणे बुंदी पाडणारे आचारी वाटू लागले.
आता ह्या क्षेत्राचे काही खरे नाही असे कळून चुकले. रमेशरावांचा ऊत्साहसुद्धा तसेच दोन तीन प्रयत्न केल्यावर मावळला. रोज काका साखरे संध्याकाळी भेटायचाच. "तरी मी सांगत होतो बापू अरे कसल्या गोष्टी करता लिखाणाच्या." चला कोकणात फिरुन येऊ.
आम्ही चार मित्र कोकणात फिरुन आलो.चार दिवस मजेत गेले. परत आलो. अजून काहीही नवीन लिखाण झाले नव्हते. त्यापेक्षा कामावर असतानाच छान लिखाण होत असे , असे वाटून गेले.
किती दिवस झाले कोणाच्या लक्षातही नव्हते.शनिवार , रविवार झाले. सोमवार उजाडला. नऊ वाजले. मी आवरुन तयार झालो. "कुठे चाललात?" नेहा म्हणाली. "जाऊन येतो जरा म्हणून मी सटकलो. तडक आॕफीसात पोचलो. रामु शिपायाशिवाय कोणी आले नव्हते. "साहेब. तुम्ही कसे आलात?" म्हणजे काय? तुम्हाला काय वाटले?"
नाही. सगळे बोलले. तुम्ही व्ही.आर. एस. घेतली. "चल शहाणा आहेस. मी फक्त बघत होतो आॕफीस सोडल्यावर काय होईल. मी फक्त महिन्याची रजा घेतली घेतली होती. तुम्हाला निरोप मात्र व्ही. आर.एस. चा दिला होता."
आॕफीसातले सगळे चकीत झाले. न बोलता कामाला लागले. संध्याकाळी घरी जाताना नेहा आणि रीमाला पीझ्झा, आईसक्रीम घेऊन गेलो. सगळे सांगितल्यावर त्या म्हणाल्या. "पण पार्टी कशाची?" मी म्हणालो , "लेखनाच्या किंमतीच्या आस्तीत्वाचा फूगा फुटल्याची." आणि आम्ही तीघे हसतच राहीलो.

Comments