कलम ४५१...............................
शहरातल्या मुख्य चौकातील एका शाॕपींग काॕम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये "गुरुकृपा एजन्सीज" चे आॕफीस होते. आत मालकांची छोटीशी केबीन बाहेर रिसेप्शनिस्ट .तेथेच सेल्समन , ड्रायव्हर , यांची उठबस असे. ते फारसे मालकांच्या म्हणजे जीवाशेठच्या केबीनमध्ये जात नसत. सगळे निरोप रिसेप्शनिस्ट रुपाच्या मार्फतच यायचे.
आॕफीस दिसायला येव्हढेसे दिसले तरी रोज लक्षावधी रुपयांची घडामोड होत असे. जीवाशेठकडे मोठ्या बिस्कीटांच्या ब्रँडच्या एजन्सीज होत्या. त्यामुळे आॕर्डर रुपाकडेच येत असत. सेल्समधनना तसे सेल वाढवण्याचे काम करावे लागत नसे. आलेल्या आॕर्डर्स पुर्ण करताकरताच त्यांचा दिवस संपत असे. कंपनीकडे तीन व्हॕन होत्या. चार ड्रायव्हर होते. सेल्समनसुद्धा प्रथम तीन होते. किरण मुंबईला जाॕब मिळाला म्हणून अचानक सोडून गेला.
आता विराज आणि रमेशवर सगळी जबाबदारी आली. फिरुन फिरुन ते वैतागून जायचे. विराज संध्याकाळी , रात्री काम संपवून दमुन भागुन, यायचा. जेवण झाल्यावर कट्यावर बसायला, गप्पा मारायला त्याला फार आवडत असे. गल्लीतली बरीच मुले जमा व्हायची. गप्पाला विषय कमी पडत नसत.
कोणाकोणाच्या भानगडी, लफडी, नोक-या , बाॕसेस, मुली एकातून एक विषय निघत आणि मंडळी रमून जात. त्यातच एक शशी होता. बी.काॕम. झालेला. दिसायला स्मार्ट, छोटीशी मिशी, रिमलेस चष्मा , अगदी एखादा आॕफीसर वाटत असे.
गप्पा मारण्यात तर त्याचा हात कोणी धरु शकत नसे. त्याची एकच खोड होती. ती म्हणजे त्याला शिव्या द्यायला त्याला भयंकर आवडत असत. नवीन नवीन शिव्या सतत तोंडात येत. च्यायला, मायला, काय वाट्टेल ते. त्याच्यात काम करण्याची धडाडी मात्र दिसत होती.
"हा शशी बी.काॕम. झालाय. गप्पा मारतोय. आपल्याला सेल्समन हवा आहे. यालाच विचारावे का?" असा विराजने विचार केला. शशीला जरा बाजुला बोलावून हळूच "तुला नोकरीत रस आहे का," विचारले. शशी तसा नोकरीच्या शोधातच होता.
"खरच सांगतोयस का ढिला द्यायलायस?" शशी बोलला. तेंव्हा विराजने त्याला सगळे सांगितले . आॕफीसात शिव्या दिलेले चालत नाही हेही बजावले . नोकरी मिळवायची तर हो ला हो म्हणावे लागते येव्हढे ज्ञान शशीला होतेच.
दुसरेच दिवशी सर्टीफिकेट घेऊन शशी आणि विराज आॕफीसात पोचले. जीवासेठ आल्याआल्या विराजने सेल्समनसाठी मुलगा आणला आहे, बी.काॕम. आहे. ओळखीचा आहे, सगळे सांगितले . जीवासेठ देत असलेला पगार पाहुन सहज कोणी तयार होतच नसे.
शशीला काय घरबसल्या काम मिळाले बरे वाटले. जीवासेठने नेहमीच्या पद्धतीने , पगार पहिल्यांदा पाच हजारच मिळेल, सांगितल्याशिवाय सुट्टी घ्यायची नाही. परगावी जावे लागेल, सगळे कबुल करुन घेतले. मग रुपाला अॕपाॕईँटमेंट लेटर करायला सांगितले.
दुसरे दिवशी शशी रुजु झाला. बिस्कीटांचे कार्टनस घ्यायचे गाडीतून पोचवायचे. किरकोळ लिखापढी. आॕर्डर घ्यायच्या येव्हढेच काम. शशीला फारच आवडले.
बाकी शशी चुटचुटीत असल्यामुळे सराईत सेल्समनसारखा त्याचा सेल वाढू लागला. जीवासेठ खूष झाला. हळूहळू शशीला परगावची कामे बिनधास्त सोपवू लागला.
आता शशीचा कट्यावर भाव वाढला. केवढे काम करुन घेतोय सेठ, आणि पगार केव्हढा, म्हणून शिव्या द्यायला शशीला आणखी एक कारण मिळाले.
आपली मोटरसायकल असावी, गाडीवरुन मस्त फिरावे असे शशीचे काॕलेजपासूनचे स्वप्न होते. आता जरा मित्र, ओळखीचे लोक वाढल्यामुळे शशीने एका ओळखीच्यांकडुन जुनी, तरी चांगली मोटरसायकल विकत घेतली.
आता शशीचे कपडे सुधारले. गाडी आली. तो आणखीच चांगला दिसू लागला. "शशा पार्टी दे की गाडीची ," असे कोणी म्हणाले तर, "च्यामारी आम्ही जुनी गाडी घेतली तर पार्टी. तुम्ही काय काय घेऊन किती पार्ट्या दिला रे?" असे म्हणायचा. तरी चहा , नाष्टा दिलाच.
तिसरेच दिवशी शशीने गाडी एका डिलरच्या गोडाऊनच्या पासुन जरा लांब लावली होती. सगळी कामे करुन येऊन पाहतो तर काय एम. एच. ०९. ए.डी. ३१२. गायब.
प्रथम डिलरना, जवळच्यांना विचारुन पाहिले. कोणीच गाडी नेली नव्हती. मग चोराला, जीवासेठला , थोडे लांब गेल्यावर डिलरला , सरकारला सगळ्यांना शिव्या देऊन झाल्या. समाधान झाले. पण गाडी नाहीच.
विराजला समजल्यावर त्याने शशीला सरळ पोलीस स्टेशनला जाऊन एफ. आय. आर. देण्यास सांगितले. जरी सतत शिवागाळ , दमदाटी करत असला तरी पोलीस स्टेशनला स्वतःच्या कामासाठी फेरी झाली नव्हती.
दुसरे दिवशी शशी पोलीस स्टेशनला गेला. ठाणे अंमलदार कांबळेसाहेबांनी प्रथम शशीला गाडी हुडकण्यास सांगितले , न सापडल्यास एफ.आय. आर. घेऊ म्हटले.
हुडकाहुडकी झालीच होती. मग परत पोलीस, चोर, डिलर, जीवासेठना शिव्या देऊन झाल्या. दोन तीन दिवसानंतर एफ.आय. आर. झाला. आता त्या प्रोसेसमध्ये शशीला थोडी मजा वाटू लागली. अधूनमधून चौकशा झाल्या तरी गाडीचा थांगपत्ता नाही.
हळूहळू शशीसाहेबाची ३१२ चोरीला गेल्याची माहीती सगळीकडे पसरली. एरव्ही अशा चोरीला गेलेल्या गाड्यांचा धांगपत्ता लागणे अवघड काम असते. पण शशीच्या शिव्यांनी म्हणा की प्रसिद्धीमुळे का अशी गाडी सहज कोणी घेणार नसल्यामुळे त्याच्या पलिकडच्या तालुका पोलीस स्टेशनात ३१२ पाहिल्याची बातमी त्याला समजली.
शशीने तीचा फोटोसुद्धा मागवला. पाहिल्यावर त्याची खात्रीच पटली "ही आपलीच ३१२." तो जाम खूष झाला.
पुन्हा पोलिस स्टेशन. निरीक्षक सातपुते साहेब. त्यांनी त्याची हकीगत ऐकली. गाडीचा इंजीन क्रमांक, चेसीस नंबर विचारला. याची शंका शशीला आलीच होती. त्याने पुर्वी इन्शुअरन्ससाठी पेन्सीलच्या शिसाने घेतलेल्या इंजीन क्रमांक,चेसीस क्रमांकाच्या ठशाची चिठ्ठी दाखवली. आता सातपुते साहेबांचा काही इलाज ऊरला नाही.
"ह्या कापसे काॕन्स्टेबलना घेऊन जा. " त्यांना माहिती आहे. तीच गाडी आहे खात्री झाल्यावर पत्र देतो. "पण साहेब मला काम आहे. हे काॕन्स्टेबल जाऊन येऊ देत की. मी लागतात तेव्हढे पैसे देतो. "
तसे नसतेय ते. तुमची गाडी. तुमचीही खात्री पटलेली बरी." ते निघाले. तर साहेब म्हणाले, " अहो शशी का कोण, या कापसेंच्या येणे , जाणे, चहापाणी व्यवस्था तुम्ही बघालच." हो ,ते मीच बघणार. "वर त्यांना पाचशे रुपये द्या. " पाचशे रुपये. अहो तेव्हढा माझा तीन दिवसाचा पगार आहे , शशी मनातच म्हणाला. "नको तर नियमाने सहाशे दहाची बंदोबस्ताची पावती करु."" नको, नको पाचशे देतो." शशी म्हणाला.
शशी आणि कापसे त्या पोलीस स्टेशनला गेले. शशीने जाताना कापसेंना काय काय कागद हवेत ? विचारले होते. आर. सी. बुक, खरेदी पावती झेराॕक्स चालेल का , तर चालेल म्हणाले होते.
त्या इन्स्पेक्टरना भेटल्यावर " साहेब कडक आहे. मूळ कागद पाहिजे म्हणतात." मी तुम्हाला विचारले होते. तुम्ही नको म्हणालात. " मला काय माहिती हे साहेब असे निघतील. बाकी कोणी मागत नाही. " आता काय. "आता ऊद्या घेऊन येवू. "
परत प्रवास, चहा पाणी, पाचशे रुपये सगळे झाले. दुसरे दिवशी साहेबांनी कांबळेना न्यायला सांगितले. मूळ कागद दाखवले. तेंंव्हा त्याची खात्री पटली. पत्र पाहिल्यावर ते मुद्देमाल द्यायला तयार झाले. पण गाडी नेणार कशी. कारण ती जरी त्याची असली तरी त्याच्या ताब्यात नव्हती.
गाडी नेण्यासाठी मोठी पोलीस स्टेशनची झेब्रा गाडी न्यायची तर बारा गाड्या असल्याशिवाय ती काढता येत नाही. शेवटी एका टेंपोमधुन गाडी आणायचे ठरले. त्याला साहेब तयार झाले. आतापर्यंत गाडी आणणेसाठी बारा , पंधराशे खर्च झाले होते. शिव्यातर कित्ती खर्च झाल्या होत्या.
संध्याकाळी गाडी आल्यावर तीचा फोटो शशी काढणार तर " ओ, साहेब, तो आता मुद्देमाल आहे.कोर्ट आॕर्डर आणा.मग हात लावा." म्हणाले.
आता काय करावे. मग कोणी काका साखरे वकिलांचे नाव सांगितले. त्यांनी सगळी माहिती घेतली. साधे ४५१ चे काम आहे. कागद द्या. हजार रुपये द्या सांगितले. " साहेब गाडी आठ हजारांची.जुनी. आणायला आत्तापर्येंत दोन हजारपर्येंत खर्च झाला. काहीतरी कमी करा," म्हटले. तेंव्हा सौदा सातशेवर तुटला.
दोन तीन तारखा झाल्या. हुकूम झाला. तो घेऊन शशी पोलीस स्टेशनला जातो तो काय ?गाडीचे पुढचे चाक, आरसे गायब.विचारले तर गाडी अशीच होती. मेकॕनीकला बोलावले. टायर, ट्युब , घातली. शेवटी तीन हजाराच्या घरात खर्च गेल्यावर शशीची सुटका झाली.
पुन्हा कोणी ४५१ चा विषय काढला की शशी म्हणतो, "च्यायला त्या ४५१ च्या. आठ हजाराची गाडी सोडवायला तीन हजार खर्च. वाः रे वाः. तरी बरे गाडी तरी मिळाली. "
Comments
Post a Comment