विंग्रजी.........................................

 ती आपली भाषा नाही. थोड्या चुका झाल्या तरी चालतात. शुद्ध लिहीता , बोलता आले म्हणजे झाले .अशी बरीच सोयीस्कर मते आपण सतत ऐकत असतो. मराठी माध्यमातील मुले कित्येक वर्षे इंग्रजी शिकतात. इंग्रजी माध्यमातली मुले , मराठी वळणाचे का असेना इंग्रजी लहानपणापासून ऐकतात. बोलतात.

आपल्याला व्याकरण म्हणून शिकवले जाणारे सर्व वर्षांचे धडे "वर्ड पाॕवर मेड इझी" पुस्तकाच्या दिड पानात छान समजावून सांगीतले आहेत. "व्हाॕटएव्हर इझ डिसक्राईब्ड बाय अ नेम इझ अ नाऊन." असे सांगत तो पुढे जातो. मस्त मजा येते वाचायला.
शब्द कसे तयार होतात. त्यांचा मुळ शब्द , त्यांचा सराव, प्रत्येक पाठावर प्रश्न असे करत पुस्तक पुढे जाते. तो छोटा लाल ठोकळा साठ रुपयांना होता. आता ऐंशी , शंभरला झाला असेल. लाॕकडाऊनात करायचे काय प्रश्न पडणाऱ्या सर्व कुटुंबाने एकत्र वाचण्यासारखा हा स्वाध्याय होऊ शकतो.
असो. आजचा विषय तो नाहीच. इंग्रजी आपली भाषा नसल्यामुळे आपण तीच्या कशा आणि किती त-हेच्या गंमती करतो हे पाहण्यासारखे असते.
सुरुवात अर्थातच आमच्यापासुनच म्हणजे न्यायालयापासुनच. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आमचे (म्हणजे त्यांचे ) इंग्रजी अगदी सोपे म्हणजे सातवीतल्या मुलालाही कळेल असे असते असे एकदा म्हटले होते.
सरावाने न्यायनिर्णय वाचले तर कळण्यास अडचण नसते. पण न्यायक्षेत्र सोडून न्यायनिर्णय वाचण्याची तसदी फारच थोडे लोक घेत असतील.
सोपे लिहीणे अवघड असते , असे कोणी म्हणतात. पुर्वी दिवाणी दाव्यात सुद्धा जाबजबाब निर्णय इंग्रजीत असत. नंतर दिवाणीत मराठी, फौजदारीत फक्त इंग्रजी काही प्रकरणात तर इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांत जाबजबाब लिहून घेतले जात. आता जिल्हा न्यायालय स्तरापर्येंत न्यायालयाची भाषा मराठी केल्यामुळे बरे झाले , येव्हढेतरी म्हणता येईल .
साक्षीदाराने शब्द उच्चारताक्षणी त्याचे इंग्रजी करुन सांगणे तसे नुसते पाहणा-यास साधे, सोपे वाटले तरी ते तसे नसते, हे तसे करण्याचा प्रसंग आल्यानंतरच कळेल.
काहीकाही खास मराठी शब्द भाषांतरकारकाचा कस लावणारे असतात. उदा.रस्त्यावरची खडी. वैद्यकीय परिभाषेतले शब्द.
अवघड शब्दांचे जाऊद्या. सोप्या शब्दांबाबत असे झाले की खसखस पिकते. एकजण लघुलेखकांस "त्यानंतर तो तिकडे गेला." याचे भाषांतर "देन ही गोड देअर." करते झाले तेंव्हा त्यास हसू आवरेना. "साहेब हे जरा चुकीचे वाटतय हो." अस्स मग "वेंटेड लिहा " म्हणाले तेंव्हा मात्र लघुलेखक हसले नाहीत.
एकांनी उसाचे युएस करुन वर टिंब द्यायला सांगितले होते असे पु.ल. म्हणाले आहेत. मुंबई मीररने तर एकदा न्यायालयातील इंग्रजीबाबत पहील्या पानावर मोठ्ठा लेख लिहीला होते. त्यातला एक किस्सा भयानक आहे . तेव्हढाच सांगतो.
अर्जदार स्त्री आहे येव्हढेच म्हणायचे होते. त्याचे "आय हॕव पर्सनली व्हेरीफाईड दॕट अॕप्लीकंट इझ अ वुमन." झाले होते. म्हणजे अर्थाचा अनर्थच नाही का.
"सकमड टू डेथ" असे म्हटल्यावर डाॕक्टर अहो साहेब "सकमड" म्हणजे टू डेथच असते म्हणाले.
हे झाले कागदोपत्री. व्यवहारात तर काय विचारायची सोयच नसते. वाचणारे समजून घेतात. हवी तीच सेवा मिळते. कोल्ड्रींक हा शब्द लिहीणे चित्रकारास येत नसावे किंवा सांगणारेच सांगत असावे असे वाटते. कोल्डींक,कोल्डिंग, कोड्रींक, काय वाट्टेल ते लिहीतात. कोल्ड्रींकाचा अर्थच माहीती नसल्यामुळे मग "येथे थंड कोल्ड्रींक मिळेल." असे लिहीणाराचा काय दोष .
एस.टी. स्टँडांवर अशा मजा फार बघायला मिळतात. " येथे ए.सी. तली केळी मिळतील." हे खरेच तसे लिहीले आहे का मी दोन तीनदा पाहून खात्री केली. मग विचारले तेंव्हा मामा म्हणाले, " त्ये माहिती नाय व्हय तुमाला. ते माल थंड ठेवायचा गोडाऊन असतो त्ये." मग माझी ट्युब पेटली. त्यांना "कोल्ड स्टोरेज " म्हणायचे हौते. मग येव्हढे कुठे लिहायचे म्हणून ए.सी. तली केळी झाली होती.
"देअर इझ अ बीग डोंगर टू द साऊथआॕफ द सिटी " असे एका अर्जात वाचून मी चाट पडलो होतो. एका अपघात नुकसानीच्या अर्जात "डिसीज्ड बाॕय वाॕज क्लेव्हर, हेफ्टी, अँण्ड कराटेपट्टू" असे बिनधास्त लिहीले होते. कशाला ती इंग्रजी. ती गेली तर बरे वाटू लागते.
पक्षकारसुद्धा मग ते ऐकून ऐकून " साहेब काय बी करा "टी" मिळवून द्या म्हणजे झाले." म्हणू लागतात. मग त्याला "टी " म्हणजे स्टे मिळण्यासाठी दावा करावा लागतो, अर्ज करावा लागतो, ते सगळे सांगावे लागते. काम अजरीमेंटला हाय असे म्हणतात. म्हणजे कायतरी इंग्रजीत जोराजोरात बोलतात बघा. असे म्हणतात.
मोबाइल दुरुस्तीच्या दुकानांवर असे बरेच चमत्कार दिसून येतात. रेचाज करुन मिळेल. कार्ट मिळेल. काय वाट्टेल ते लिहीतात.
एकदा एका गाडीवर वडे आणायला गेलो. "साहेब साधा देऊ का स्प्रे करुन देऊ." मी चकीत झालो. वडा स्प्रे कसा काय करणार हा? दोन चार आॕर्डर अशाच पहात राहिलो. काहींना वाडा पाव वेगळेवेगळा देत होता तर काहींना वड्यात पाव घालून देत होता. स्प्रे वगैरे मारत नव्हता. म्हटले, " काय रे बाबू स्प्रे का काय म्हणालास ते चार वाडे दे." पुन्हा पहात बसलो करतो काय हा. त्याने सरळ पावात वडे घालून दिले. स्प्रे काय. काय नाय साहेब. पावात वडा घालून दिला. कोणतरी म्हटला ते स्पे का काय. अरे ते स्प्रे नाही प्रेस करायचे म्हणजे दाबून द्यायचे पावात असे ना. स्प्रे नाही म्हणत प्रेस असे सांगितल्यावर बाबूला पटले.
एकदा कोणाला रस्ता विचारता "जरा पुढे जावा एक दोन किलोमीटरवर . मग चांगला स्टार रोड येतोय बघा." म्हणजे काय कोण सिनेमातले स्टार येतात का? "नाय हो . चांगला रोड. त्या बिचाऱ्याला "टार रोड" म्हणायचे होते ते स्टार रोड केल्याने जरा फरक पडाला येव्हढेच.
मी तेरा साली जाॕइंट झालो . म्हणजे जाॕइन हे जरा सोपेच म्हणायचे.
आता संगणक आले म्हणून बरे झाले. पोलीसांच्या कागदपत्रातील अक्षर , पुर्वीतर निळ्या कार्बनने काढलेल्या प्रती वाचून अनेक वकिलांच्या चष्म्यांचे नंबर वाढले म्हणे.
कॕन शब्दाचे कँड वाचून त्यांना काय म्हणायचे असेल ते शोधत जावे लागते. " नानचकू कराटे प्राॕक्टीस" म्हणजे काय हो? असे विचारल्यावर त्यांनी नानचक हे मध्ये साखळी असलेले बाजुने लाकडी दांडे असलेले मुद्देमालातून काढून दाखवले तेंव्हा समजले.
गॕस गिझरवर गॕस, फ्लेम अॕडजस्ट असे चांगले छापले आहे म्हणजे कंट्रोल शब्दाचे सोपे अॕडजस्ट.
असे वाचत वाचत गेल्यावर समजले की भाषा भगिनी असल्यामुळे आम्ही लोकांनी तीला प्रेमाने विंग्रजी केले आहे. तीचीही तक्रार नाही. काय करते बिचारी. रहायचे आहे ना इथे?

Comments