लव्ह मॕरेज..........................................

 परवाच एकाला म्हटले की आमच्या मित्राच्या लव्ह मॕरेजबद्दल लिहीणार आहे. त्यांच्या प्रतीक्रिया बघण्यासारख्या होत्या. लव्ह मॕरेज झालेला म्हणाला , "ए आमचे काही लिहू नकोस हं." तर दुसरा म्हणाला "लिही , लिही आम्हाला वाचायचेच आहे."

लव्ह मॕरेज म्हणजे फिल्म लाईन च्या लोकांच्या भाषेत "वन लाईन स्टोरी" की आवडत्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करणे. अन्य लोकांना हा फारच अरसीकपणा वाटेल.
बहुतेक प्रेमांची लग्नांत इतीकर्तव्यता होते. येव्हढे सांगून ते संपत नाही. तो प्रवासच कधी मजेचा, कधी धाकधुकीचा , असतो.
स्टोरी सगळ्यांची तशीच असते. काही प्रसंग, वाक्ये, पात्रे , कलाटण्या वेगळेवेगळ्या येव्हढेच. संबंधीतांना ते एकमेवाद्दितीयच वाटत असते.
हे फारच बोजड, निरस असे प्रेमाचे प्रवचन झाले का? ज्यांनी ते केले, निभावले , त्यांना ते खरे माहिती असेल. आम्हा पामर प्रेक्षकांस, आणखी काय समजणार नाही का?
ते ढाई अक्षरांचे विश्व असते म्हणे. ती प्रेमाची ढाई, म्हणजे अडीच अक्षरे आणि लग्नाचीही ढाई म्हणजे अडीच अक्षरे अशी ही पंचाक्षरी कहाणी म्हणजे लव्ह मॕरेज. जगातले सर्व भाषांतील पन्नास साठ टक्के साहित्य आणि कलाविष्कार यांच विषयावर आधारित आहे. आणि मालिकाविश्व नव्वद पंचाण्णऊ टक्के.
शाळा, काॕलेजात इकडेतिकडे सगळेच पाहताच. पण प्रेमीकांना दिव्य दृष्टी असते. प्रेम शारीर कधीच नसते. एका मित्राचा करीन तर लव्ह मॕरेजच करीन असा पण होता. चांगले शिक्षण, चांगली नोकरी, दिसायला ब-यापैकी असा तो, प्रेमासाठी शोधात झुरत होता.
घरच्यांनी छान , छान मुली लग्नासाठी आणल्या. पण ह्या बाळाला त्यात प्रेम दिसले नाही. वय जात चालले. शेवटी कोणत्यातरी आॕफीस कामासाठी गेला असता, ती दिसली आणि प्रेम बसले. ते वाटच पहात होते. सिग्नल मिळाला. जुळले.
तीला आनंदाने घरी नेले. आणि तो व ती सोडता सगळे चकीत झाले. ह्याच्या दिडपट तरी वजनाची, काळी म्हणणे वाईट दिसते म्हणून सावळ्या रंगाची म्हणायचे अशी परी नाईलाजाने पसंत करावी लागली.
तसे त्यांचे छान चालले आहे. तीचा स्वभावही वाईट नाही. पण जोडा शोभत नाही असे लोक म्हणतात त्याला काय करणार?
तशी ती इतिहासातील लैलासुद्धा दिसायला अप्सरा नव्हती म्हणे. पण त्यांच्यातील प्रेमाने तीला अप्सरा बनवले. अजरामर केले.
तर आता वळूया मुख्य कथेकडे. हा किस्सा बहुतेक प्रेमीकांचा असतो. त्यामुळे त्याला नामरुपात्मक लेबले लावण्यात काहीच अर्थ नसतो.
का कोणास ठाऊक, शाळा, काॕलेज, क्लासमध्ये, तो किंवा ती दिसताच, मनात कोठेतरी काहीतरी हलून जाते. अरे हा /ही किती छान आहे असे वाटून जाते. कधीकधी ओळख झाल्यानंतर एकत्र येताजाता, बोलतानाही तसे वाटून जाते.
नंतर नजरेचा खेळ. तो जमला तर बोलण्याचा मेळ. जमलेच तर एक एक दिवसांनी त्यात वाढ. पुर्वी हा कालावधी महिने, वर्षे इतका असत असे. आता फ्रेंड, गर्लफ्रेंड, बाॕयफ्रेंड, वगैरे चटकन चढायच्या पायऱ्या मुलांनी छान शोधून काढल्या आहेत.
तर अशांना कायम आपले सगळे गुप्त आहे असे वाटत असते. त्या भेटी गाठी, ते गुफ्तगु, ते विभ्रम, त्याचे, तीचे सगळेच आवडू लागते. पण कोणत्याही गुन्ह्याला जसे साक्षीदार नकळत तयार होतात तसे इकडेही होतात. मग त्यांना गाठून "ए आमचे तसले काही नाही आहे हं." वर" कोणाला सांगू नकोस." हेही ठेऊन दिले जाते.
चांगल्या मित्र, मैत्रीणींना हे बरेच वाटत असते. ते उलट त्यांना मदतच करतात. घरातलेच भाऊ, बहीण असले तर विचारायलाच नको.
याउलट अभ्यास, कामे सोडून हे काय नस्ते धंदे चालले आहेत. आमच्यात असले अजिबात चालायचे नाही म्हणणारे व्हीलन वाटणारे कोणी असतातच.
शिवाय ते महत्त्वाचा भूमिकेत असतात. म्हणजे आई, वडिल , काका, काकू वगैरे. त्यांचा रागरंग पाहून शक्यतर त्यांना मनवायचे प्रयत्न करावे लागतात. विरोध हा कधी टोकाचाही असतो.
त्याला मोडण्यासाठी मग कट केले जातात. तर ते त्यांच्या परीने मुला , मुलींची दुस-यांशीच लग्ने ठरवायला लागतात. ही कुणकुण प्रेमीकांना लगेच लागते.
त्या वेळेस मित्र, मैत्रीणी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. गुप्तपणे दिवस , वार, वेळ ठरते. विरुद्ध बाजुला ते अजिबात कळणार नाही हे पाहिले जाते. आणि अचानक झाल्यासारखे तो आणि ती शाळा, काॕलेज , आॕफीस , ट्रीप चे निमित्त सांगून बाहेर पडतात.
मित्र, मैत्रीणी तयारच असतात. काही धर्मक्षेत्रे अशा लग्नांसाठीच तयार केल्यासारखी असतात. लवकरात लवकर लग्न लावणारे भटजीसुद्धा जमवलेले असतात. हल्ली सगळ्याच भटजींचा लवकर उरकण्याकडे कल असतो ते वेगळे.
गाड्यांवरुन ठरलेल्या वेळी, खूप मित्र, थोड्या मैत्रीणी जमतात. मुलगा , मुलगी तर तयार असतातच. काळजांत प्रचंड धडधड ऐनवेळी काही होणार नाही ना? मित्रांच्या मनात मात्र जबाबदारीचे ओझे असते.
एकदा फटाफट सगळे आटोपतात आणि पहिल्या अंकाचा पडदाच पडतो. लग्न झालेल्यांची सोय केलेलीच असते. मित्र , मैत्रीणी साक्षीदार बाजुला होतात.
घरच्यांना ते कळतेच. प्रचंड आदळआपट, राग, क्षोभ, नाव टाकणे वगैरे सोपस्कार होतात. काही दिवसांनी , वर्षांनी मावळतात. शेवटी त्यांचे सगळे सरळ चांगले व्हावे, लोकांनी नावे ठेऊ नयेत अशी सगळ्यांची इच्छा असते.
आपली पहिली भेट, पहिला साक्षीदार, पहिला ओरडा खाणे, असे लव्ह मॕरेज केलेल्यांना गप्पांचे चार जास्त विषय मिळत असतील तेव्हढेच.
हे सरळ झाले तर ठीक असते. एरव्ही आमच्या विरुद्ध जाऊन लग्न केले, वेगळ्या जातीतल्या मुला , मुलीशी केले म्हणून त्यांना त्रास देणारे, त्यांच्या जिवावर ऊठणारे , अतीरेकी जन्माला येत आहेत. त्यांच्याशी कायद्यानेच लढावे लागते.
नपेक्षा लग्नाआधी किंवा नंतर प्रेम असले म्हणजे झाले. संपली लव्ह स्टोरी. ती आपापल्या चष्म्यातुन पहावी. सगळे सारखेच असतानाही आमचे वेगळे म्हणून खूष व्हावे नाही का?

Comments