एच टू...............................
पहिल्या घराची मजा आपण वाचलीच. येव्हढ्यातच दुसऱ्याची सांगायची वेळ येईल असे वाटले नव्हते. पण सुदैवाने तसे होत आहे.लहान मुलगा प्रणव हा सुद्धा पुण्यात राहणार असे ठरले. मग भाडे भरत बसण्यापेक्षा किंवा शेअरींगमध्ये राहण्यापेक्षा त्यालासुद्धा एखादे छोटे का होईना पण स्वतःचे घर असावे असे वाटू लागले.
घर शोधायला सुरुवात. आता काय कोरोनामुळे धडाधड भाव कोसळताहेत. लोक घरे सोडून जात आहेत अशा बातम्या . परंतु आपण घर घेणार आहे म्हटल्यावर ह्या बातम्याच आहेत हे समजते. किंमतींत तसा फारसा फरक पडत नसतोच. स्टँप ड्युटी ब-यापैकी कमी झाली आहे हे मात्र खरे आहे. म्हणजे पाच टक्क्यांच्या जागी तीन टक्के, एकतीस डिसेंबरपर्येंत. त्याचा फायदा घ्या असेही म्हणतात. म्हणजे काय करायचे ते लवकर करा.
हे थोडेसे लग्नासाठी मुली बघतात तसेच असते. ओळखीच्यांना, नातेवाईकांना सांगणे, जाहिराती , सोशल मिडीया कसेही. शिवाय मोठ्या शहरात एजंटांची सेवासुद्धा ऊपलब्ध असते. आपण त्यांना कोणत्या भागात किती रक्कमेपर्येंत असे सांगितले की ते त्याप्रमाणे हालचाल करतात.
प्रणवच्या ओळखीचे असे एक छान एजंट राजू गाठ पडले. मग शोध मोहीम. नवीन फ्लॕट घेणे सध्या अशक्यच होते. म्हणजे ते कायमच असते. कधी शक्य होईल असे वाटत नाही. भागही ठरला एरंडवणा, कोथरुड वगैरे.
तसे रिटायर झाल्यानंतर प्रणवला दिलेले काही पैसे होते. एके ठिकाणी ठेवायला नकोत म्हणून त्याने स्टेट बँकेत ई. एफ.डी.त थोडे ठेवले होते व एक एफ.डी. आय. डी.बी. आय. मिरज येथे ठेवली होती.
काही पैसे मेघनाच्या नावे जनता सहकारी बँकेत एफ.डी.त ठेवलेले. काही पैसे युनीयन बँकेत आर. डी.त ठेवले होते. ते सुदैवाने जमा झाले होते. स्टेट बँकेच्या ऊस्मानाबाद शाखेत पी.पी.एफ. खाते पार दोन हृजार सतरापासुन मुदत संपल्याने पडून होते. जळगाव, भुसावळ शाखांत तीन चार छोट्या एफ.ड्या होत्या. ते काय सहज आणू असा विचार. सुदैवाने स्टेट बँक आॕफ हैद्राबाद मधील एक डाॕरमंट खाते मिरज शाखेत आल्याचे समजले होते. अशी गोळाबेरीज करुन काहीतरी करता येईल असे वाटले.
राजूला आकडा सांगितला . त्याने त्याचे काम सुरु केले. करोना थोडा ऊठल्यावर लोक फिरते झाले. शनिवार रविवार वेळ मिळेल तेंव्हा ते घरे पाहू लागले.
सुट्यामध्ये त्यांनी फ्लॕट पाहून प्रथम पाच सहा, नंतर दोन तीन करत एक फ्लॅट पसंत पडेल असे कळवले. आम्हालाही तोच म्हणजे डहाणूकर मधील फ्लॕट पसंत पडला.
दोन आॕक्टोबर गांधी जयंतीच्या सुटीच्या दिवशी जाऊन मी फ्लॅट पाहिला. छान वाटला. बजेटमध्ये कसाबसा बसत होता. मालकीणबाईंना जाऊन भेटलो. इकडच्या तिकडच्या गप्पा. किंमतही फार घासाघीस न घेता ठरली. आता कागदाचा दिवस. "सतरा तारीख धरुया का?" त्या म्हणाल्या . पैसे असले तरी ते एके ठिकाणी नव्हतेच. काही पावत्या मोडायच्या. कोणी म्हणाले पावत्या जळगाव, भुसावळला असल्यामुळे तिकडे जावे लागेल. कोरोना कमी झाला असला तरी बँकांच्या पद्धती पाहता वेळ लागणारच. ते गृहीत धरुन "तेवीस तारखेचा मुहूर्त धरावा." असे म्हटले. सगळ्यांनाच ते पसंत पडले. एक अंक पार पडला.
बँकांना चार पाच तारखेला एफ.डी. बंद करुन खात्यात पैसे जमा करा असे इ.मेल. पाठवले. वाटले आता तीन चार दिवसात आपोआप पैसे जमा जमा होतील. पण कुठचे काय.
चौकशी करता एक बँकेतली पाहुणी म्हणाली "एफ.डी.ज तुमच्याकडे आहेत तर खातीच इकडे ट्रान्फर करायला सांगा. " बर तसे तर तसे म्हणत पुन्हा नव्याने इ.मेल. करायला घेतले. अकरा बारा तारखेला तसे इ.मेल केले. तर एका इ.मेलला ऊत्तर आले होते की सहीचा अर्ज पाहिजे.
मग तेच प्रींट आऊट काढले. अर्ज तयार केले. एका सहका-याला स्पीड पोस्ट करायला सांगितले. तर बाबाने दोन तीन दिवास ते पाठवलेच नाहीत. पण ते बरेच झाले कारण दुसरा निरोप आला की तुम्ही ब्रँचचा कोड नंबर लिहीला आहे. आम्हाला आय.एफ.एस. सी. नंबर आणी पत्ता पाहिजे.
आता कोड नंबर वरुनच आय.एफ.एस.सी. नंबर तयार होतो किंवा उलट असेल. तो त्यांना कळायला हवा. पत्ता त्यांच्याच साईटवरुन घेतला. ते स्वतः काहीही करायला तयार नसतात. पाकिटे ऊघडली. त्यात आय.एफ.एस.सी. कोड पत्ता लिहीला. आता पंधरा सोळा तारीख आली. अजुन एकाही खात्यातले पैसे आले नाहीत. आता त्यांचा नाद करण्यात अर्थ नाही हे समजले.
परत कागद घेऊन आकडेमोड. इकडचे किती तिकडचे किती. नशीबाने खूप पुर्वी म्हणजे वर्ष, सहा महिन्यांपुर्वी इ.मेलने कळवल्यावरूनच एक डाॕरमंट खाते इकडच्या शाखेत येऊन पडले होते. त्यात दोन लाख अठरा हजार होते. ते जिवंत केलेच पाहिजे.
बँकेत गेलो. आधार, पॕन काॕपीज द्या, फोटो द्या. दिले. म्हटले. "आता करा खाते चालू ." "आता उद्या या. " दुसरे दिवशी गेलो. चेक बुक ए.टी.एम. साठी फाॕर्म भरा. भरला. म्हटले "चेक बुक कधी येईल?. " चार आठ दिवस परस्पर येईल. खात्यातुन पाचशे काढले. पाचशे भरले. डुप्लीकेट पासबुक दिले. मग तोपर्येंत पैसे कसे कसे काढायचे. विड्राॕल स्लीपने. दोन लाखांची स्लीप भरली.
तर म्हणे चेकबुक फॕसिलीटी असता दोन लाखांची विड्राॕल सिस्टीम घेत नाही. पण चेकबुक आलेय कुठे. तेंव्हा म्हटले चेकबुक फॕसिलीटी नको. तर "तुमचे व्यवहार मोठे असतात ना? चेकबुक हवेच." हे आमचे मोठ्ठे व्यवहार.
आता शेवटचा आठवडा सुरु झाला. ऊपाय त्यांनीच सांगितला. रोज एकोणपन्नास हजार काढा. चार दिवस जाऊन रोज एकोणपन्नास हजार काढले.
दुस-या दोन तीन बँकातून आर.टी.जी.एस. केले. ते लवकर झाले. आता मुलाच्या आय.डी.बी.आय. खात्यातून आर.टी.जी.एस. करायची. खाते मिरजेत. मुलगा पुण्यात. पासबुक पुण्यात, चेकबुक मिरजेत. नशीबाने आर.टी.जी.एस. पुण्यातुन करता येते म्हणाले. आता ऊद्या चेकबुक पुण्यात पोचणार कसे? कुरीयरवाले म्हणाले "आत्ता संध्याकाळ झाली. ऊद्या स्पेशल माणूस पाठवतो. दोनशे रुपपये द्या. परवा पोचेल. "
माझ्याकडे दिवसच नव्हता. कर्मधर्मसंयोगाने एक मित्र पुण्यालाच चालले होते. त्यांच्याकडे पाकिट दिले. मुलाला ते घ्यायला सांगितले . ते बरोब्बर पोचले. शेवटची आर.टी.जी.एस. झाली.
परत पुणे. मालकिणबाईंना भेटलो. एक मालक थोडे आजारी. त्यांचा फोटो कसा मिळवायचा. प्रणवने त्यावर युक्ती काढली. व्हाॕट्सच्या डी.पी.वरुन फोटो प्रींट करता येईल. तशा त्या केल्या.
तेवीस तारीख ऊजाडली. आत्ता बहुतेक काही राहिले नाही. आवरुन गाडीवर बसणार येव्हड्यात फोन वाजला. मागच्या व्यवहाराची वेळ आठवली. घाबरतच फोन ऊचलला. " निघताय ना तुम्ही ? पोचलात की कळवा. " हुशः झाले. " हो निघतच आहे. पोचलो की कळवतो." म्हणालो.
पोचलो. कार्यालयाच्या शिस्तीने म्हणजे सर्वर स्लो होऊन वगैरे वीस मिनीटात होणारे काम दिड दोन तासात झाले. मालकांनी वयांकडे न पाहता पुर्ण सहकार्य केले. संध्याकाळी घरी गेलो. निवांत पुजा केली. आणी दुसऱ्या घराची कहाणी साठा ऊत्तरी सफळ संपुर्ण झाली. दुसरीकडुन यायची खाती अजुन येतच आहेत...
Comments
Post a Comment