जावे त्याच्या वंशा. ..................................

 तुला सतत वेगळे कसे काय सुचते? असा एक प्रश्न येत असतो. काही सुचेपर्येंत, इकडेतिकडे फिरत असल्यामुळे, म्हणजेवेगळेवेगळ्या बाबतीत काही ना काही करत असल्याने तिसराच विषय आपसुक उभा राहतो. शिवाय आपणच करणारे, पाहणारे असल्यामुळे चुका करण्याची निस्तरण्याची हमी असते.

पाडव्याला बरेच लोक पुरणपोळी करत असतात. तर बरेच जणांसारखे आमच्यात श्रीखंडपुरीचा बेत ठरलेला असतो.
एकटा असलो म्हणून काय झाले? श्रीखंडपुरी झालीच पाहिजे असे कालच ठरवले होते. बरे एकटेच खायचे तर चार समदुःखीसुद्धा जमवावे असे ठरवले. त्या मित्रांनीसुद्धा काहीना काही, करण्याचे, आणण्याचे ठरवले.
पु-या आणि मसालेभात असे मी करतो म्हटले. यु ट्युब काढली. त्यांनी मुख्य माहिती दिली. पण ते पुस्तक वाचुन पोहण्यासारखेच. पाण्यात पडा, हातपाय मारा. म्हणजे काय ? ते आपण पाण्यात पडल्यावरच समजते.
अंदाजेच कणीक घेतली. थोडे मीठ, थोडी साखर, तेल घालून चांगले लावून घेतले. घट्ट गोळा केला. परत वरुन तेल लावले आणि वीस, पंचवीस मिनीटे ठेऊन दिला.
पोळपाटाला तेल लावले. आता खरी मजा सुरु होते. कोरडी कणीक घ्यायची नाही. लाट्या करुन तशाच पोळपाटावर लाटायच्या. त्या पोळीसारख्या फिरत नाहीत. तशाच गोलसर करायच्या.
नेहमी आपण तळणीत पुरी टाकल्यानंतर , कशी टम्म फुगते येथुनच प्रोसेस पाहतो.तेंव्हावाटते काय सोपे आहे. लाटायची , तळायची. झाले.
प्रथम वाटले पुरी दिसते तेव्हढी गोल करायला हवी. त्यामुळे पहिल्या पाच सहा पु-या झाल्या पण त्या भटु-या येव्हढ्या.
नहीं. इसमें कुछ अलग बात है! असे वाटले. गोळे अर्धे केले. म्हणजे पाणीपुरी दिसते तेव्हढीच पुरी लाटली. आता मात्र घरात "त्या वंशा " येव्हढ्या पू-या दिसू लागल्या.
तेल मस्त तापावे लागते. फारशी लालसर न दिसणारी पांढरी , टम्म फुगली तर पास. अशा ब-याच पु-या तयार झाल्या. जेवेपर्येंत तशाच जिवंत राहील्या. सर्वांस तशाच वाटल्या. पास झालो, असे ठरले.
पोळ्या वगैरे पेपरांत आत्ता आत्ता काठावर पास झालो. डोश्यांचा पेपर सुटायचाच आहे. तेंव्हा समजले की "त्यांच्या वंशा गेले की कळो येते, " येत नाही, असे नाही. पण जायला हवे , खरे की नाही?

Comments