कर्मचारी..........................
यात लिहीण्यासारखे काय आहे असे तुमच्यासारखे वाटले. पण वेगवेगळ्या कारणांसाठी यांच्याबद्दल लिहावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.
कर्मचा-यांना कोण ओळखत नाही. सगळीकडे काही ना काही सरकारी खाजगी काम करतात ते कर्मचारी. पण खरेच ते त्यांच्याकडून अपेक्षीत आहे तेव्हढे तसे काम करतात का? हा प्रश्न आहे.
कोणीच काम करत नसेल तर सगळा गाडा चाललाय कसा? सगळी कामे आज ना ऊद्या होत आहेत म्हणजे काम होतच आहे. पण..
हा पणच काय आहे? एक भारतीय जपानमध्ये कामाला लागले. पहिला दिवस. सांगितलेल्या वेळेस म्हणजे नऊ वाजता गेले. तर लीडर म्हणाले. " यू आर लेट." नो सर इट इज जस्ट नाईन ओ क्लाॕक. " देन यू आर लेट बाय टेन मिनीटस. व्हेन यू आर काॕल्ड अॕट नाइन यू शुड बी हीअर बाय एट फिफ्टी.".
ही कामाची संस्कृती. आपण आपल्या फालतू अभिमानासाठी भांडत बसतो. नेमलेले काम उत्तम ,वेळेच्या आधी ,कोणीही न सांगता करेन ही कामाची संस्कृती. आपल्याकडे पाच दहा माणसे काम करताहेत. ते नीट करतात का? हे बघायला एक माणूस. तो नीट काम करतोय का हे बघायला आणखी एक मोठ्ठा माणूस. बर येव्हढे असुनही गाडा वेळेवर नीट धावेल ? त्याची गॕरंटी नाही.
कोणत्याही कार्यालयात बरोब्बर कार्यालय उघडताना मुद्दाम जाउन पहा. दहा, अकरा काय वेळ असेल तेंव्हा चुकूनच एखाद , दुसरा कामावर असेल. "का हो. इथले साहेब कुठे गेले?" " येतील येव्हढ्यात, बसा. " बरे बसायची काही सोय असावी. ती पण धड नसते.
दहा ते वीस मिनीटांनी ते साहेब न सांगता सुटीवर गेले नसले तर येतात. बरे आल्याआल्या काम ओढुन सुरु करतील. तर अजिबात नाही. त्यांच्यात उत्साह अजिबात नसतो. आल्यापासून हे लोक कंटाळलेले कसे असतात याचेच मला मोठे आश्चर्य वाटते. तरी बरे सारखे चहा पाणी सुरु असते.
"बसा हो. आत्ताच आलोय. दिसत नाही काय? " असे म्हणून त्या आलेल्या माणसावरच ओरडणार. शक्यतो काम कसे होणार नाही अशा काहीतरी शंका काढणार . अगदीच करावे लागणारच असेल तर हळूहळू काम करणार. ही आपल्याकडे कामाची पद्धतच होऊन गेली आहे.
एक जण म्हणायचे सरकारात एक पट काम आणी दुप्पट पगार. खाजगीत दुप्पट काम आणी एकपट पगार. त्यामुळेही असे वागावे असे वाटत असेल.
एकांना विचारले " काहो तुम्ही रोज ऊशीरा कामावर येता." तर म्हणाले, " बघा साहेब ,मी ऊशीरा येतो ते दिसतय सगळ्यांना. मी रोज लवकर जातोय त्याबद्दल बोलत नाही कोणी.? "
दोन तीन तास काम झाले की जेवणाची सुट्टी. ती कमीत कमी पाऊण ते एक तास. परत दोन एक तास काम आणी संपला दिवस. दिवसोंदिवस महिनों महिने कामे हळुहळू चालतात. "वर पाठवलेय. येईल. आऊट सोर्सींग आहे. त्यांना विचारता, आमच्याकडे आले नाही येथुन सुरुवात. बर अगदी सगळे तपशील तारखा दिल्या तर होऊन जाईल. यामुळे मग माणसांच्या कामाच्या हेतूबद्दलच संशय येतात, काही वेळा ते खरेही ठरते.
एका बँकेत ग्राहक ए.टी. एम.कार्ड कधी येणार चौकशी करत होते. फाॕर्म दिला का?" " हो" मग पंधरा दिवसात यायला हवे. " तुम्हाला किती दिवस झाले फाॕर्म देऊन?" " एक वर्ष झाले बघा. "
यावर त्यांनी एजंन्सीला विचारायला हवे. आपल्याकडे जबाबदारी घ्यायला हवी. ते सावकाश म्हणाले, " दुसरा एक फाॕर्म भरुन द्या. म्हणजे वेळेचे , ग्राहकाच्या सेवेचे कोणाला काही वाटेनास झालेय याचे वाईट वाटते.
शासकीय कर्मचा-याच्ंया कामात अडथळा आणल्यास त्याला कलम ३५३,३३२, ३३३. प्रमाणे पिनल कोडात शिक्षा सांगीतली पण कर्मचारी काम न करुन, चुकीचे करुन लोकांच्या कामात खीळ घालतात त्याची काही विचारणा सुद्धा होत नाही.
प्रत्येक काम अमुक दिवसात करायचे असे बंधन येणार असे ऐकून आहे परंतु ते कागदावरुन व्यवहारात येईल तेंव्हा खरे.
त्यातल्या त्यात मला कोर्टातले कर्मचारीच बरे वाटतात. ते कामाच्या वेळी टेबलांवर तरी सापडतात. त्यांना सकाळपासून संध्याकाळपर्येंत भरपूर काम असते . त्यांच्यावर चांगले लक्ष असते. कदाचित असे सगळ्यांनाच आपल्या कार्यालयाबद्दल वाटत असेल.
टेबलापलीकडे बसल्यावर अलीकडची माणसे नगण्य व दुर्लक्षण्यासारखी का वाटतात देव जाणे.कोठेही काम होण्यासाठी मनी, मसल किंवा पाॕवर का लागावी काही कळत नाही.
हे सुधारण्यास एक सोपा ऊपाय करायला हवा असे वाटते. प्रत्येक कर्मचा-याला आठवड्यातून एकदा अजिबात ओळख न सांगता दुसऱ्या कार्यालयात जाऊन काम करुन आणायला सांगावे. मग तिकडे त्रेधा झाल्यावर कदाचित यांची दृष्टी बदलेल.
खाजगीत तर कोणीच कोणाला विचारणारा नसतो. कामावर आल्यावर प्रथम पुजा ,नमस्कार . मग कामाला सुरुवात.
अन्वय काय तर तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हाला कोठेही कसलेही कामच पडू नये. किंवा पडलेच तर काही मार्ग सापडावा. मी सुद्धा अशा मार्गांच्या शोधात आहे.
Comments
Post a Comment