शोध आनंदाचा.........................
शीर्षकावरुन हा कोणालाही आनंदाच्या शोधाचा मार्ग वगैरे वाटेल. परंतु शोध निबंधात करतात तसे हे दोन्ही भिन्न आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे.
हे अध्यात्मीक, विवेचन नाही. मी वापरलेल्या शब्दांना तेच अर्थ असतील असा दावा नाही. प्रत्येकाला आपापला मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य असतेच.
सुख आणि आनंद हे दोन वेगळेवेगळे शब्द आहेत. आपण काय शोधतो? सुख का आनंद? त्यात फरक काय? कशावर तरी अवलंबून असते ते सुख असे वाटते. कशावरही अवलंबून नसता मनाची काहीतरी समाधानाची अवस्था म्हणजे आनंद. म्हणून आपण मला यामुळे सुख वाटले, असे आपण म्हणतो, तर मला आनंद मिळाला, झाला असे म्हणतो.
मिळतो कुठे हा आनंद? तो बाहेर कोठेही मिळत नाही. तो आपणच मिळवू शकतो. प्रत्येकाने असंख्य वेळा त्याचा अनुभव घेतलेला असतो.
दृश्य उदाहरण आपल्या जवळपासची घरातली लहान मुले. ती बहुतेक वेळा आनंदीच असतात. त्यांच्याकडे खेळायला , वेळ घालवायला काहीही असले नसले तरी त्यांना फारसा फरक पडत नाही. तेच तेच बोलणे, हातात येईल त्याचे खेळणे करणे.एक संपले की दुसरे काही करणे असे त्यांचे उद्योग सतत सुरु असतात.
त्यातच ती तासंतास रमतात. हे जे आहे तोच आनंद . आपणच त्यांना, " काय हे करतो आहेस तासंतास? म्हणून त्यांच्या आनंदातुन बाहेर काढतो.
आपणही शाळा, काॕलेजात असेपर्येंत सुख निर्मितीच्या फारशा वस्तू जवळ नसता किती आनंदी असायचो ते आठवुन पहावे. कोठे गेला तो आनंद? तर तो हरवतो त्याच्याच शोधात. तो शोध थांबला तर आनंद आपल्या जवळच असतो.
आठवतात मित्रांबरोबरच्या निरर्थक गप्पा? लांब लांबच्या रपेटी. चालत, सायकलवरुन काढलेल्या ट्रीप? डब्यात असेल ते वाटून खालेल्ली मजा . खळाळत्या ओढ्याचे , नदीचे प्यालेले पाणी? तो आनंद आता ते सगळे आयते घरी आणून दिले तर होईल का? या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले आहे.
आज काय करावे? असलेल्या वस्तू , सुखे टाकून द्यावीत? म्हणजे मिळेल आनंद? नाही. तसे करण्याचे अजिबात कारण नाही.
आपल्याला निश्चित कशात आनंद मनापासून मिळतो ते प्रथम जाणले पाहिजे. काही बाबी सर्वांना सारख्याच लागू पडतील.
निसर्गाचे दर्शन, म्हणजे एखादे झाड, डोंगर, पक्षी, प्राणी आवडेल ते दिसेल असा कोपरा निवडावा. त्या दृश्याकडे डोळे उघडून पहात रहावे. त्यात काही मिळवायचे, तुलना करण्याचे नसल्यामुळे आपोआप बाकी सर्व विचार बाजूला राहतील. शोध संपेल आणि मिळेल तो आनंद.
एखाद्या गाई, म्हशीच्या जवळ जावे. तुम्हाला आणि तीला ते आवडते का याची प्रथम नोंद घ्यावी. तीच्या तोंडाशी हात देता , तीच्या खरखरीत जीभेने ती हात चाटते. तोंडात हात घेण्याचा अभिनय करते. ओठांत हात धरते. चावत नाही.ती मजा अनुभवण्यासारखी असते. सगळे प्राणी असेच वागतात. त्यांना कुरवळालेले , त्यांच्यांशी खेळलेले त्यांना फार आवडते. त्यात आपण कितीही वेळ रमुन जातो.
कोणाला रंगांशी खेळायला आवडेल , कोणाला स्वरांशी तर कोणाला शब्दांशी. ह्या छंदांत रमणे हाच आनंद नाही का?
आपण प्रत्येकजण कलाकार असण्याची , अजिबात आवश्यकता नाही. एखाद्या कलेचा आस्वाद घ्यायला तर आपल्याला आवडतच असते नाही का? ते सुद्धा तेव्हढाच आनंद देऊ शकते.
संगीत ऐकणे, पुस्तके वाचणे, अगदी उत्तम सिनेमे पाहणे हे सुद्धा कोणालाही सहज शक्य असते. आता तर ते भयंकरच सोपे झाले आहे.
सबब आनंद लांब नसतो. शोधता तो दूर जातो. शोध संपता उरतो तो आनंद. तो सर्वांना अखंड प्राप्त व्हावा ह्या इच्छेसह..
Comments
Post a Comment