री-युनीयन अर्थात मैत्री.............................................
कामावरच्या जीवलगांबद्दल लिहील्यानंतर बाकीच्या मित्रांना वाईट वाटणे स्वाभाविक होते . म्हणून मुद्दाम त्यांच्यासाठी हा भाग. अर्थात लग्नाकार्यात सुद्धा काही जवळच्यांनाच बोलावणी करायचे राहून जाते तसाच हा प्रकार म्हणावा लागेल.
यात विशिष्ठ कारणासाठी अगदी गावातल्या जवळच्या मित्रांबद्दल लिहीण्याचे मुद्दामच टाळले आहे.
न्यायाधीश आणि वकिल यांच्यातील संबंध खूप पुर्वीच्या काळी अत्यंत जवळचे सलगीचे असत असे ऐकीवात आहे. म्हणजे न्यायाधीश सकाळी फिरुन येतायेता सहज एखाद्या वकिलाच्या घरी जायचे गप्पा, कधीतरी चहापाणी घेऊन यायचे. संध्याकाळी कोठे खेळायला जायचे वगैरे. सध्याच्या काळी वेगळेवेगळ्या कारणांसाठी अशी जोखीम कोणी पत्करत नाही. त्यामुळे बाहेरच्या लोकांना हे नाते मित्रत्वाचे असू शकेल असे वाटत नाही. काहीजणांना तर ते तसे असू नये असेच वाटते. खरे म्हणजे न्यायाधीश व वकिल यांचे संबंध सलोख्याचे, खेळीमेळीचे व चांगलेच असले पाहिजेत.
आजही या सर्व संकेतांना छेद देणारे एक गाव आणि सर्व वकिल आहेत यावर कोणाचा विश्वास बसणारही नाही. ते आहे आमचे आवाडते सांगोला. त्याबद्दल बरेच वेळा मी बरेच लिहीले आहे.
सांगोल्याला गेल्यावर येव्हढेसे गाव , त्यात कसले काम, कसले वकिल असणार हा विचार काही दिवसात संपला. कोर्टकामात ईतर चर्चा नाहीत. तिथले सगळे त्याच शिस्तीत पार पाडायचे. नंतर मात्र सगळे बाजूला ठेऊन मित्रांसारखे वातावरण.
हातरोटेसाहेब मस्त रिंग खेळायचे. सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करायचे. कोजागीरी कार्यक्रम करायचा.
चव्हाणभाऊ, नामदेवराव चांडोले, ढेरे वकिल , हॕटवाले आप्पा, नागेशराव, नवले वकिल , पाटणे वकिल, ऊदयबापू, बाळासाहेब चव्हाण,बनकर वकिल , नवे जूने काही भेद नसायचा. कोर्टातल्या गमती जमती, अगदी राजकीय मतेसुद्धा हिरीरीने मांडायचे. त्यांच्याबरोबर आम्ही बिनधास्त ट्रीपला सुद्धा जायचो.
कोणाच्या कसल्या अडचणी असल्या की सगळे मदतीला जायचे.गावचे अंबीका देवीचे देवस्थान हा सगळ्यांच्या आदराचा श्रद्धेचा विषय होता. त्यातसुद्धा त्यांनी आम्हाला सामील करुन घेतले.
मग सगळे गाव तिथले प्रतिष्ठीत म्हणजे केळकर डाॕक्टर, संजुताई, माता बालक परिवार, डबीर डाॕक्टर, डाॕ. मेधा देशपांडे, झपके सर, सुनील बीडकर कित्तीतरी लोक सतत भेटत गेले.
झपके सरांच्या शाळेच्या संवत्सरीक कार्यक्रमात आम्ही "सौजन्याची ऐशी तैशी" नाटक केले. अजूनही सांगोल्यात काही निघाले की पहिले निमंत्रण आम्हाला येते. काय आहे हे? सगळे गाव मित्र असण्याचे सुख शब्दांत सांगणे अशक्य आहे. तरीही तिथल्या मसाला किंवा बाजार आमटीला मी सांगोला आमटी नाव देऊन, बनवून , मी ब-याच जणांना खिलवून आनंद मिळवला आहे.
कोल्हापूरचे आर. व्ही. कुलकर्णी व मुंबईचे सुनील गोंसालवीस, सरकारी वकिल ही मनात घर केलेली जिवाभावाची माणसे. भरपूर अभ्यास, विषयाची तयारी, कितीही चर्चा करण्याचा ऊत्साह. बस्स आणि काय लागतय यशस्वी व्हायला. तरी गर्व शुन्य. अशांबरोबर कितीही कोणत्याही विषयावर गप्पा माराव्या. अशा मित्रांनी मिळते ती समृद्धी पैशाने मिळणे शक्य नाही.
सर्व शालेय जिवनात कित्येक तास एकत्र घालवलेल्या मित्रांना जिवनातील कामाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकत्र यावे वाटते. सगळ्यांचे पत्ते, फोन नंबर घेऊन गृप काढलाजातो ते री युनीयन.
अशा आमच्या गृपमध्ये श्रीपाद कुलकर्णी संगीताचा जाणकार , रेडिओचा संग्राहक. त्याने "श्रीपाद रेडिओ" असे एफ.एम. चॕनलच काढले आहे. स्वतःचा छंद जोपासता तो सर्वांना ऊत्तम जुनी, हिंदी , मराठी गाणी ऐकवतो. रोज चोवीस तास. किशोर वकिल असुनही त्याला त्यात मदत करतो.
डाॕ. रामकृष्ण सखदेव आपले व्याप सांभाळून मॕरेथाॕन धावतो. काँटीनेंटल फूड तयार करतो. कुमार गोखले विख्यात चित्रकार ,छायाचित्रकार, मनस्वी लेखक आहे. श्याम कवठेकर गाणी, कविता म्हणतो .सगळेजण काहीना काही छंद जोपासतात, सोबत रोजचे काम असतेच. शाळातल्या आठवणी काढतात. असा मित्रमेळा कधी आभासी कधी प्रत्यक्ष भेटतो. मग आनंदास पारावार उरत नाही.
चार फुटावर बसत असुनही नियमांमुळे मुले , मुली शाळेत बोलू शकत नसत. एकत्रच असल्यामुळे न बोलता बोलणे होत असे. त्याची कसर भरुन काढण्यासाठी वैजयंतीने वर्गमित्रांचा गृप काढला. मग काय विचारता. पुन्हा तोच वर्ग दृश्यात भरतो. मनात उतरतो. काळाचे बंधन गळून पडते. उरतो तो मेळा सर्वांचा. ते मैत्रसुख सर्वांस मिळत रहावे, प्रयत्नाने सगळ्यांनी मिळवावे या शुभेच्छेसह मित्राध्याय समाप्त करतो.
Comments
Post a Comment