बाॕईज अँण्ड बेबज...................................

 आपल्याला जरा मुलांसारखा विचार करता येतो का? त्यांच्या जरा मनाचे अंतरंग , खेळ समजतात का हे पाहण्याचा हा प्रयत्न आहे. अर्थातच त्याला डिसक्लेमर आहेच. हा विशिष्ठ कोणा एकाचा विचार नाही. कोणावर टीका नाही. मजेने वाचायचं आणि आल हसायला तर खुदकन हसायच बस्स.

मला माणसांइतकेच किंवा त्यांच्याहुन जास्त प्राणी खूप आवडतात. लहान बाळांनासुद्धा हल्ली मोबाईल आवडतात. आया नको नको म्हणत मुलांकडे मोबाईल देतात. "आमच्या बाळाला मोबाईलचे फारच वेड आहे " म्हणतात. तसे मी बैलांना , कुत्र्यांना मोबाईल दाखवला तर तेसुद्धा मजेने मोबाईल पाहतात. मनात " या माणसांनी काय काय भन्नाट वस्तू काढल्यात." म्हणत असतील.
मोबाईल हा मुलांचा श्वासाइतका महत्वाचा झाला आहे. मनोरंजनाबरोबर मार्केटींग ,प्रवास, खाणे आॕर्डर करणे , सर्व बीले भरणे , सगळं करुन तो नामानिराळा राहतो. कोणा त्याच्याशी किंवा तीच्याशी नाते जुळवून देतो क्वचित अलगही करतो.
मुले कितीही मोठी झाली तरी साधी आपापली खोली आवरणे त्यांना आवडत नाही. वावरतात त्या पट्ट्याचा केर कसाबसा काढतील. ते सोडून कोठे काय किती दिवस टाकलेले सापडेल सांगता येणार नाही. कट्टा वस्तूंनी ओथंबुन वहात असतो. पाणीवाला जार बदलुन जातो. थोडक्यात स्वतःची कामे स्वतः करण्याचा अट्टाहास त्यांनी कधीच सोडून दिला आहे. जे फक्त स्वतःच करावे लागते ते सोडून सर्व आऊटसोर्स करायला त्यांना खूपच आवडते.
दोनच शब्दात बाॕईजचे वर्णन करायचे तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार नव्हे तर स्वातंत्र्य आणि लवचिकता असे करावे लागेल.
कशाकशाचे आहे हे स्वातंत्र्य ? तर सगळ्याचे. पण तेही कोणाशी भांडून , दुराग्रहाने नसते तर शांतपणाने दूर होणे असते. जुने साहित्य, संगीत, नाट्य हे तर अपवादानेच आवडते. त्याचबरोबर धर्म, जात, देव, परंपरा हे सुद्धा केवळ पुर्वजांनी केले म्हणून करतील असे नाही.
काही मुले , मुली देवळांसमोरच्या गर्दीत दिसतीलही परंतु त्यांची कारणे वैयक्तिक असतील. त्यांचे प्रमाण अती नगण्य वाटते. कलांचे अविष्कार प्रत्यक्ष अनुभवलेच पाहिजे असे त्यांस वाटत नाही. ते मोबाईलच्या माध्यमातून आज ना ऊद्या ऊपलब्ध होतातच. तोपर्येंत थांबण्याची त्यांची तयारी असतेच.
लवकर निजे , लवकर ऊठे . ही ऊक्ती भूतकाळ झाली आहेच. त्यांची रात्र छोटी होत आहे. झोपायला अकरा बारा कमीतकमी होतातच त्यामुळे ऊठायला सात आठ झाले तरी उशीर नसतो. त्यामुळे सकाळच्या सहाला , पहाटे सहा म्हणू लागले तर नवल वाटण्याचे कारण नाही.
ध्येय, तत्व यांना चिकटून वेळ घालवायला त्यांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे कोणत्याही मार्गाने काम करुन घेण्याला ते जास्त महत्व देतात. आपला वेळ घालवुन उगाच तत्वांना चिकटून , माणसांची किंमत वाढवण्यापेक्षा चटकन चार पैसे देऊन कामे करुन घेण्यात त्यांना फारसे गैर वाटत नाही. त्यामुळे सगळी कामे करुन देणारे एजंट हा नवा रोजगार उपलब्ध होईल असे वाटते.
स्वयंपाक रोज घरीच केला पाहिजे, तो आपल्याच पद्धतीचा असला पाहिजे ही सुद्धा त्यांच्या लेखी अंधश्रद्धा आहे.
सर्वच बाबतीत समज जास्त असल्यामुळे भूतकाळात ते रमत नाहीत. नातीसुद्धा ओझे होईपर्यंत सांभाळण्याचे कारण त्यांस वाटत नाही. कोणत्याही बाबींचा "डोक्याला शाॕट घ्यायचा नाही " असा सरळ व्यवहार ते ठेवतात.
स्वातंत्यामुळे तशी बरीचशी मुक्ती त्यांना मिळत आहेच. लवचिकतेचे फायदेही असतात व तोटेही. काही मुले अगदी आवडीने समाजकार्यही करतात पण त्याचेही अवडंबर माजवणार नाहीत. आम्हाला आवडते लोकांना जरुरी आहे, ते चांगले आहे म्हणून करतात. त्यासाठी चांगले तंत्रज्ञान , संगणक, आंतरजाल सगळे वापरतात.
थोडक्यात जुन्यातले चांगले, आवश्यक , ते घेऊन , नको ते सरळ सोडून देऊन, मस्त मजेत राहणारे हे झाले आहेत. त्यांना काही सांगण्यापेक्षा बरेचसे त्यांच्याकडून घेतले तर चांगले होणार आहे.

Comments