संमोहन....................................
त्याने केलेल्या ख-या गुन्ह्यांबद्दल त्याला कधीच शिक्षा झाली नव्हती. वयाच्या बाराव्या वर्षी डॕड आणि एकाच वर्षाने ममा गेल्यानंतर राॕबर्ट पाॕल जगात एकटाच पडला. दोन खोल्यांचे उपनगरातले छोटे घर त्याला खायला उठत असे. दूरवर राहणारा जाॕन अंकल शुद्धीवर असला तर कधीतरी भेटायला यायचा. राॕबर्टला चार पैसे , खाऊ देऊन जायचा. बस्स. बाकी कोणी नव्हते त्याला.
एकटे राहणा-या प्राण्यांची जशी जगण्याची धडपड चालते तसे राॕबर्टचे झाले. शाळा त्याला फार आवडत नसे. आता तर शाळेत जायलाही पैसे नव्हते.
मुंबईत अशी शेकड्याने मुले रोज येतात, कुठेही राहतात. राॕबर्ट तर इथलाच होता. करायचे काय हा प्रश्न त्याचा त्यानेच सोडवला. मजुरी करुन दहा पाच रुपये मिळवणे त्याला आवडलेच नसते. वातावरणामुळे त्याला इंग्रजी बोलायला चांगले येत असे.
रेल्वे स्टेशनवर जायचे. परगावाहुन येणारे भांबावुनच जात. असे कोणीतरी हेरायचे. चांगल्या इंग्रजीची भुरळ घालायची आणि त्यांना फक्त त्यांच्या मुक्कामी न फसवले जाता पोचवायचे. हे काम असू शकते यावर कोणाचा विश्वासही बसणे शक्य नव्हते. पण या कामाचेच राॕबर्ट हळूहळू शंभर, दोनशे करत पाच पाचशे रुपये सहज कमावू लागला.
रोजचे मस्त जेवायचे , खायचे, नवीन कपडे घालायचे. सिनेमे बघायचे आरामात जगायचे. आजुबाजुचे लोकसुद्धा फार मोठे काही करणारे नसल्यामुळे राॕबर्ट चांगलाच प्रसिद्ध व्हायला लागला.
वीस वर्षाचा होइपर्येंत राॕबर्ट पाॕश राहणीमुळे हिरो वाटायला लागला. आॕफीस वेअरचे कपडे, उंची गाॕगल, चकचकीत शुज घालून नाक्यावर तो कधीतरी सिगारेट ओढताना दिसत असे. तर कधी कोणाबरोबर गाड्यांतुन फिरताना दिसे.
हळूहळू राॕबर्टने लोकांना घरी पोचवणे कमी केले आणि नवीन सावज हेरुन त्यांना नवनवीन स्कीम सांगणे चालू केले. कोणाला फ्लॕट हवा असे , तर कोणाला झटपट पैसे वाढायला हवे असत. याची योजना त्याला सांगून दोघांकडून थोडे थोडे पैसे घेउन पुन्हा तोंड दाखवत नसे. तसे पैसे फार नसत त्यामुळे फसलेला तक्रारी करण्याच्या फंदात पडत नसे. बरे ओळखलेच कोणी तर चिठ्ठी ना चपाटी. राॕबर्ट त्यालाच "सर इट इझ डिफीकल्ट टू बुक मी." म्हणून सल्ला देत असे.
महिने, वर्षे जात होती. राॕबर्टकडे बरेच पैसे जमा व्हायला लागले. त्याने ते फ्लॕट्स घेण्यात व्यवस्थीत गुंतवायला सुरुवात केली.
एके दिवशी लोकलमध्ये कोणाला म्युच्युअल फंडाबद्दल सांगताना त्याला मणीने गाठले. मणी सुंदरम असा असाच दुसरा नग होता. केरळमधून येऊन त्याने चार वर्षांत चांगलाच जम बसवला होता. त्याचा धंदा पाकिट मारण्या पासून सुरु होऊन दागीने, सूटकेस मारण्यापर्येंत आला होता. त्याने राॕबर्टला ब-याच वेळा पाहिले होते.
आॕफीस बॕग घेउन हा बाबा सी.एस.टी. चर्चगेटला उतरायचा पण कोणत्याच आॕफीसात जायचा नाही. इकडे तिकडे फिरुन चहा, सिग्रेट झाली की परत जायचा.
राॕबर्ट तसा कोणाचाच मित्र नव्हता. पण आता हळूहळू इतके पैसे, इतके फ्लॕट घेउन करायचे काय? आता हळूहळू सगळे गुंडाळून गोव्याला जाऊन रहावे असा त्याचा प्लॕन चालला होता.
मणी त्याच्यामागे नुसता सर ,सर करत फिरु लागला. राॕबर्टने हा आपल्याच लायनीतला आहे हे ओळखलेच होते. एकत्र चहा , वडापाव, करता करता त्यांची ओळख झाली.
राॕबर्टने मणीकडून त्याच्या धंद्याबद्दल जाणून घेतले. त्यातल्या धोक्यांबद्दल मणीला सांगितले . मणी काळा , जाडा, टकलू असल्यामुळे चटकन नजरेत भरत असे. त्यामुळे तो काहीवेळा पकडला ही जायचा. त्यालाही लाईन बदलायचीच होती.
राॕबर्टचा चेला व्हायला तो तयारच होता. राॕबर्टचे निश्चित ठरत नव्हते. सोडता सोडता एखादा चांगला मोठा हात मारावा असे त्याने ठरवले होते.
राॕबर्ट आणि मणी एकदा दुपारी एका नाटकाच्या थिएटर बाहेरुन चालले होते. "सुप्रसिद्ध संमोहन तज्ञांकडून आठ दिवसात संमोहन शिका " असा मोठा बोर्ड लावला होता.
वर्ग आजच दुपारी चार वाजता सुरु होणार होता. "ए मणी चल! देखते है!" सर सर करत मणी मागे मागे गेला. प्रो. संदेश सोनार. अशी एका खोलीवर पाटी लावली होती. सोनार हे मस्त दाढीवाले रुबारदार गृहस्थ टेबलमागे खुर्चीवर पेपर वाचत बसले होते. राॕबर्ट दारावर नाॕक करुन " मे आय कम इन सर" म्हणत आत गेला. मणीही आत शिरला.
राॕबर्टने कोर्सची माहिती घेतली. हल्ली आर्केस्ट्रा , नाटक , वगैरे स्टेज शोजला गर्दी होत नसल्याने संमोहन विद्या चार इच्छुकांना शिकवून जावे , यासाठी त्यांनी कोर्स सुरु करत असल्याचे सांगितले . ते नशीबवान म्हणून दोनच जागा शिल्लक असल्याचेही सांगितले . राॕबर्टने दोघांची फी जमा केली.
सोनारांचे शोज रात्री नऊ ते बारा चालत. ब-यापैकी गर्दी होत असे. इकडेतिकडे फिरुन झाल्यावर दोन मिटींग करुन राॕबर्ट हाॕलवर पोचला. पावणेचार वाजले होते. खरोखर संमोहन शिकण्यासाठी तरुण मुले, काही प्रौढ, दोन चार मुलीसुद्धा आल्या होत्या.
बरोब्बर चारला सरांनी सर्वांना आत बोलावले. सगळ्यांना सरांनी स्टेजवरच बसायला सांगितले . ज्यांना बसण्याची अडचण होती त्यांना खुर्च्या दिल्या गेल्या. सर्वांच्या ओळखी करुन घेण्यात आल्या. कोण कोण काय करते? संमोहन का शिकायचे ? लोकांची उत्तरे वेगवेगळी व मनोरंजक होती. कोणाला मजा म्हणून शीकायचे होते तर कोणाला उत्सुकता , कोणाला स्टेज शो करायचा होता. राॕबर्ट आणि मणीने उत्तरच ठरवले नव्हते. असेच जस्ट इंटरेस्ट असे ठोकून दिले.
सरांनी एकदम छोटा प्रयोगच केला. राजेश आणि हेमाला सहज संमोहीत केले आणि त्यांच्याकडून सुंदर गाणी म्हणून घेतली. नकला करुन घेतल्या. त्यांना भानावर आणले. "बघा असे सुप्त गुण सर्वांकडे असतात. ते संमोहनाने बाहेर आणता येतात. पण त्याचा उपयोग फक्त चांगल्या कारणांसाठीच करायचा. कसा ते शिकवेन येत्या आठ दिवसात.
सगळ्यांना फारच मजा वाटत होती. सरांनी संमोहनाचा इतिहास. त्राटक, लक्ष केंद्रित करणे, दुसऱ्याच्या मनाचा शोध असे हळूहळू सांगायला शिकवायला सुरूवात केली.
"संमोहन करुन तुम्ही कोणाला गुन्हा करायला लावू शकत नाही. माणसाच्या सुप्त मनातही जाणीव कायम असते. एखाद्याच्या वृत्तीच्या विरुद्ध कृती करायला सांगताच ते जागृत होते." "पण एखाद्या गुन्हेगाराला संमोहीत केले तर काय होईल?" राॕबर्टने सहज विचारले. "काय होईल मलाही माहिती नाही. पण हा प्रश्न तुम्ही का विचारला?" जस्ट क्युरिओसिटी.नथींग मोर ." बर. बर. तसे करु नका येव्हढेच माझे म्हणणे आहे. " म्हणून क्लास पुढे सुरु झाला.
एकमेकांना संमोहीत करायलाही त्यांनी शिकवले. "आणखी सराव करा. एक दिवस तुम्ही चांगले संमोहक व्हाल. याचा उपयोग सुप्त मनातील भिती काढण्यासाठी, चांगला अभ्यास करण्यासाठी करा." असे सांगितले . त्यांनीच लिहीलेली पुस्तके सगळ्यांना भेट दिली आणि कोर्स संपला.
राॕबर्टने कोर्स गंभीरतेने घ्यायचे ठरवले. चांगला अभ्यास सुरु केला. मणी बरोबर होताच. तो सहज संमोहीत व्हायला लागला.
त्याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे असे राॕबर्टला वाटले. शेवटचा हात मारण्यासाठी हेच वापरावे असेही त्याच्या मनात आले.
फ्लॕटच्या व्यवस्था करण्यात त्याचे बरेच दिवस गेले. एकदा जोडी गोव्याला जाऊनही आली. तेथे एका खेड्यात राॕबर्टने छानसे घरही घ्यायचे ठरवले.
त्या घराजवळच एक छोटी बँक होती. राॕबर्टने बँकेचे ए.टी.एम. त्यात पैसे केंव्हा, कसे, कोण भरते.व्हॕन कोण चालवते सिक्युरिटी काय असते सगळी माहिती काढली.
तो दिवस उजाडला. मणी तयार झाला होता. शनिवारी कॕश भरताना फार सिक्युरिटी नसते. जोडून सुट्टी म्हणून शिपाईही नसला तर बाबूभाई एकटेचसुद्धा जातात हे समजले.
चहापाण्याच्या निमीत्ताने बाबूभाईंशी ओळखही झाली होती. व्हॕन बँकेपासून थोडी लांब जाताच बाबूभाईंना चहासाठी उतरवायचे.त्यांना संमोहीत करायचे. किल्या घ्यायच्या, मणीने तेव्हढ्यात व्हॕनमधून पैसे काढायचे आणि तडक स्टेशनवर जायचे असे ठरले.
बँकेपासून व्हॕन निघाली. चौकातुन पुढे येताच राॕबर्टने हात केला. कॕश व्हॕन अशीतशी थांबत नसते. पण बाबूभाईनी ड्रायव्हरना थांबायला सांगितले . त्यांना काही काम आठवले असेल वाटून व्हॕन थांबली. राॕबर्टने बाबूभाईंना "जरा पाचशेची चेंज द्या सांगितले ."
ते चेंज काढताहेत तोवर राॕबर्टने त्यांच्या डोळ्याकडे पाहिले. त्यांना एकदम कळेचना काय चालले आहे? ते स्वतःला विसरु लागले. "सर जरा कीज द्या."
बाबूभाई खिशातून किल्या काढणार येव्हढ्यात एक गाडी अचानक आली आणि गाडीतून सोनार सर उतरले. "नो. नो. मॕन. आय हॕड वार्नड यू." म्हणाले. राॕबर्टला वाटले. संपले सगळे. तो लगेच पळून जाऊ लागला. सरांनी त्याचे मनगट घट्ट धरले.
बाबूभाईंना भानावर आणून व्हॕन पाठवून दिली. राॕबर्टला म्हणाले. " मी एक सांगितले नाही. मी या विद्येचा उपयोग कधीकधी पोलीसांना मदत करण्यासाठीही करतो. मी तुमच्या मागावरच होतो. आता तुम्हाला अटक करवू शकतो. तुम्हाला भरपूर शिक्षा होईल असे पाहू शकतो. पण पहिलीच वेळ आहे. सुधारा स्वतःला." म्हणाले आणि आले तसे निघुनही गेले. राॕबर्ट आणि मणी त्यांच्या वाटेकडे पहात राहिले संमोहीत होऊन...
Comments
Post a Comment