खजिना..........................
"पुरातत्व ही वेगळी महत्वाची ज्ञानशाखा आहे. तुम्ही सिनेमात , चित्रफितीत पाहता तेव्हढेच जुन्या दगडांवर, अवशेषांवर ब्रश फिरवणे नाही. लयास गेलेल्या संस्कृतीचे अवशेष सर्वत्र विखुरलेले असतात. त्यांचा सखोल अभ्यास करावा लागलो. पुरावे तपासावे लागतात. यात इतिहास, भूगोल , जीवशास्त्र, कधी भौतिकशास्र सगळ्यांचा उपयोग करावा लागतो." रहाळकर सर असे बरेच काही काही तळमळीने सांगत होते. कारण होते मे महिन्यात सर पुरातत्व शाखेत रस असणाऱ्या विद्यार्थी व इतर कोणाही नागरिकांसाठी घेत असलेला एखाद्या प्रकल्पात भाग घेण्याची संधीचे.
रहाळकर शिक्षक, प्राध्यापक कधीच नव्हते. महसुल खात्यासारख्या इतरांच्या दृष्टीने रुक्ष खात्यात ते काम करत होते. परंतु त्यांना पुरातत्वात असणाऱ्या रसामुळे रजांची अडचण येत नसे. त्यांनी नोकरीत राहुनच पुरातत्वावर पुस्तके लिहीली होती.पी.एच.डी. मिळवली होती.
येव्हढा व्यासंगी माणूस आपल्या पलीकडच्या इमारतीतील खात्यात कामाला आहे तरी आपली ओळख असू नये याचे मला वाईट वाटायचे. एकदा ती वेळ आली. मी आणि आमच्या आॕफीसातले मित्र टपरीवर चहा पीत होतो. नंदू म्हणाला ," तुला रहाळकर हावे होते ना. ते बघ येताहेत. "
कोणी सांगितल्याशिवाय रहाळकरांना ओळखणे शक्य नव्हते. साधा शर्ट, पँट असा वेष. जेमतेम पाच फुट एक दोन इंच उंची. काळसर वर्ण. मोठा चष्मा. पण एकदा पुरातत्वावर बोलायला लागले की अगदी त्यात रस असणाराच थांबू शकायचा.
मी रहाळकरांना चहा देऊ केला .त्यांनी तो घेतला. मग " तुमच्याशी तुमच्या विषयावर बोलायचे आहे." असे म्हणालो." मग इथे नको. लोकांना या विषयाची नजर नाही. घरी या रविवारी निवांत बोलू."
असाच कधीतरी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी या प्रकल्पाबद्दल सांगितले . वेगळेवेगळ्या काॕलेजातील मुले, मुली , प्राध्यापक , असा पंधरा जणांचा गट होता. मी तसा मिसफीटच होतो. पण रहाळकरांचा मित्र म्हणून लोक उगाचच मलाही मान देत होते.
रहाळकरांनी सर्वांना प्रथम सर्वांना आजचे काम सांगितले . " आज आपण येथून पंधरा किलोमीटरवर वरील शीरपुर गावाजवळच्या "पर्वतेश्वर" या शंकराच्या देवळाला भेट देणार आहोत. मंदिराचे वैशिष्ट्य खास काही नाही. पण आपल्या भागात न मिळणाऱ्या कठीण काळ्या दगडांनी मंदिर बांधले आहे. थोडीशी कलाकुसर आहे. पर्वत म्हणण्यासारखेही काही नाही. तशी उंच टेकडीच म्हणायची. येव्हढ्या उंचीवर हा दगड नेला कसा असेल? कोरीवकाम कसे केले असेल? हे अभ्यासायचे हे मुख्य काम. दुसरे एक तुमच्यापैकी काही किंवा ब-याच जणांना रस असेल तर सांगतो ,की या देवळाला खजिन्याचे देऊळ असेही नाव पडले आहे. गेल्यावर तुम्हाला समजेलच की लोकांनी मंदिराच्या आसपास बरेच खड्डे पाडले आहेत. खजीन्यासाठी. परंतु आजवर एकालाही खजिना सोडाच पाच पैसेसुद्धा मिळालेले नाहीत. बघूया आज कोणाचे नशीब उजळते का?"
काॕलेजातली मुले , मुलीच ती. सर बरोबर असले तरी आज बाॕस रहाळकर होते. ते अत्यंत प्रेमळ. काम संभाळुन थोडी शिस्त, मुलींबद्दल आदर ठेवून काहीही करायला त्यांची परवानगी असे.
निघायलाच दहा वाजले. पोचलो सव्वा अकराला. उतरल्यावर चहा , नाष्टा झाला. शीरपुर लांब राहिले होते. टेकडीजवळ वस्ती कमीच होती. चार पाच छोट्या झोपड्या होत्या. लगेच त्यातुन दोन चार पुरुष स्त्रीया आले. ते सगळे रहावकरांना चांगले ओळखत असावे. त्यांनी सरांना नमस्कार केला. चहा पाणी विचारले. ते आधीच झाले होते. " जेवण करु दे का? सोबत येऊ का?" म्हणाले. " नको रे आज नको. मुलांनी सगळे आणलेय? काय आणलेय ना रे?" "हो सर. सगळे आहे. " मुलांनी सांगितले .
मुले वर चढायला लागली. काही पोचलीसुद्धा. मी , रहाळकर, कोरे सर असे आमच्या चालीने वर गेलो. मंदिर पाहिले. मंदिर छान होते. दोन फुटांचा नंदी होता. आत छान शिवलींग होते. त्यावर कळशीतील पाण्याचा अभिषेक होत होता. पांढरी फुले वाहीली होती. पिंडीवर भस्माचे पट्टे ओढले होते. धुपाच्या सुगंधाने वातावरण प्रसन्न होते.
"मुलांनो "खजिन्याचे देऊळ" नाव का पडले हे प्रथम सांगणाऱ्यास माझ्याकडून एक चाॕकलेट बरे का." रहाळकरांनी सगळ्यांना सांगितले .
मुलांना ते रहस्य आपणच प्रथम हुडकायचे असे वाटत होते. प्रथम मुलांनी मंदिराबाहेरचे खड्डे पाहिले. बाहेरच्या भिंती, जवळपासचा परिसर पाहिला. कोणालाही काहीच मिळाले नाही.
आम्ही मंदिरातच बसलो होतो. मुलांनी मोबाईल फ्लॕशच्या उजेडात आतील भिंती पहायला सुरुवात केली.अगदी बारकाईने निरीक्षण चालले होते. अचानक देविका ओरडली " सर , सर इकडे या. इकडे बघा." सगळे तिकडे जमा झाले. देवीकाने फ्लॕश पाडून दाखवले. शिवलींगाच्या बरोबर समोरच्या भिंतीवरील अगदी खालच्या दगडावर बारीक कोरल्यासारखे एक चित्र होते. दोन आकृती काहीतरी पुरत आहेत . "येस , देवीका का तू? बरोब्बर . हे घे चाॕकलेट. " रहाळकरांनी देवीकेला चाॕकलेट दिले. तीने ते सगळ्यांना अगदी आम्हालाही कण कण देऊन खाल्ले .
" मुलांनो , हा झाला पहिला भाग. खेड्यातले लोकही काही निर्बुद्ध नसतात. काही बाहेरचेही असतील म्हणा. सगळ्यांना वाटले पुरायचे चित्र म्हणजे खजिना. म्हणून हे खड्डे. कोणाला काही मिळाले नाही म्हणजे खजिना हा नव्हे. दुपारच्या कामाची देवीका कॕप्टन. बघा काय दाखवताहेत त्या आकृती. मलाही माहीती नाही . जेवणानंतर थोडा वेळ काम करु. आता लंच ब्रेक. "
मुले खुष झाली. सगळ्यांनी डबे आणलेच होते. तोवर खालचे लोक गाडग्यांतुन दही, दुध व कांदे घेऊन आले. मस्त गोड दह्यासोबत चटण्या , कोशिंबीरी भाज्या, पक्वान्ने सगळे आणले होते. दही , दुध आणणा-यांना आग्रहाने जेवायला दिले. जास्तीचे पदार्थ आधीच काढून ठेऊन त्यांना दिले.
थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही पुन्हा त्या दगडाकडे गेलो. मुलांनी त्याचे फोटो काढले. एनलार्ज केले. देवीका खरोखर हुशार होती. तीला त्याला फोटोत बारीक कासव दिसले. पुढे शोध थांबला. सगळे रहाळकरांकडे आले.
सर म्हणाले, "अरे कासवाशी संबंध दिसतोय. आणि वेडे बाहेर खजिना शोधताहेत. " पण सर कासवाचे काय करायचे?" काय करता ?" ते हलवा नाहीतर पाण्यात सोडा."
मुलांनी कासव उचलण्याचा प्रयत्न केला. ते थोडेच उचलले जाणार होते. एकाने सहज कासवाची मान धरली. तर ती हालत होती. ती फिरवताच कासवाच्या पाठीवरचे कवच हालले. ते हळूच उचलले.
प्रथम थोडा उग्र वास आला. आत पाणी, आणि माती होती. ती स्वच्छ केली. आश्चर्य म्हणजे कासवाच्या कवच्याचा आत आणखी बारिक चित्रे , एका खाली एक अशी दिसत होती.
मुलांनी लगेच फ्लॕश लावून खूप फोटो काढले. लॕप टाॕप, प्रिंटर होतेच मदतीला . भराभर प्रिंट बाहेर येऊन पडू लागले. रहाळरांच्या समोर प्रत्येक ओळीतील चित्रांची प्रिंट ठेवली.
आत आणखी काही नाही, हे पाहून कासव बंद केले. पुन्हा थोडी विश्रांती घ्यायचे ठरले. सरांना बहुतेक चित्रांवर विचार करायचा होता. थोडे खाणे , कोल्ड्रींक झाली. आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला टांगली होती.
सर म्हणाले, " मुलांनो आजचा दिवस आपला सगळ्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा व महत्त्वाचा ठरणार आहे यात शंकाच नाही. आपल्या पुर्वजांनी इतकी मोठी मंदिरे कशी उभी केली?. शिल्पकला कशी केली? यावर आपण आपल्या केवळ तर्क केले. आज आपल्यापुढे याबद्दलचा मोठ्ठा पुरावाच हाती लागला आहे. त्यांनी या मंदिराच्या कामाचा हा नकाशाच या चित्रांच्या माध्यमातून आपल्या पुढे ठेवला आहे.
मी तसा छोटा शास्त्रज्ञ आहे. पण मला वाटते या पद्धतीने आपण अशीच मंदिरेच काय वाट्टेल तसले उत्तम बांधकाम उभे करु शकू. बरे यासाठी वापरली आहे ती स्वच्छ चित्रलीपी. म्हणजे कूट प्रश्न नकोत , भाषा नको. "
मग सरांनी एक एक चित्र फीत घेतली. प्रत्येक चित्राचा अर्थ सांगितला. त्यातून एक वेगळे विश्वच डोळ्यापुढे उभे राहिले.
टेकडीजवळून नदी वहात होती. मोठे दगड लाकडी ओंडक्यांवरुन आणले. प्रथम छोट्या पायऱ्या केल्या. रहाटासारखे काही करुन दगड तीन टप्प्यात वर आणले.
दगडांना आकार दिले. कोरीव कामासाठी काहीतरी कठीण यंत्रासारखे वापरले. मंदिर हळूहळू उभे राहिले.
आता मंदिराचा कायापालट होणार, लोकांच्या , पर्यटकांच्या झुंडी येऊ लागणार. रहाळकरांचे किती सन्मान, कौतुक , होणार सांगता येत नव्हते.
सगळेजण अक्षरशः त्यांच्या पाया पडले. त्यांच्याबरोबर सेल्फी काढल्या. आजच्या कार्यक्रमाचे फ्लॕश बॕक झाले. कसला पर्वतेश्वर? कसला खजिना? याचा मोठमोठ्याने बोलून विचार करत आम्ही परत आलो.
रहाळकरांनी पुढे "खरा खजिना" या नावाचे पुस्तकच लिहीले आणि भारतीय शिल्पकला पुन्हा अमर झाली.
Comments
Post a Comment