हायब्रीड सांजा.....................................
सगळीकडे हायब्रीडची बोलणी चालू असतात.कोणत्यातरी दोन पद्धती एकत्र केल्या की हायब्रीड होत असते.
एरवी हायब्रीडचा अर्थ फार फोफावणारे जास्त ऊत्पन्न देणारे दिसायला आकर्षक पण गुणांची खात्री नाही असे पीक.
आता सांजा म्हणजे काय तेही सांगायला हवे. त्याचेही अर्थ घराघरांनुसार बदलतात. कोणी तिखट सांजा असेही म्हणतात. आमचेकडे त्याला उपीट(उच्चाराने-उप्पीट) म्हणतात. त्यातही भेद आहेत म्हणे पांढरे असले की उपीट. पिवळे असले की तिखटाचा सांजा.
जाउदे ते ज्ञानेश्वरीच्या आवृत्यांत पाठभेद असतात म्हणे तसे हे असावे. आम्ही म्हणजे कर्नाटक सीमेलगतचे लोक गुळ घालून केलेल्या रव्याच्या पदार्थाला सांजा असे म्हणतो.
सगळ्याच पारंपारिक पदार्थांचे मार्केट केंव्हाच डाऊन झाले आहे. आता प्रांताप्रांताच्या, देशोदेशीच्या , गरम, थंड पदार्थांच्या फ्युजनचे दिवस आहेत. खेड्यापाड्यातील लग्नात भात, वांग्याची भाजी, कटवाली आमटी आणि सांजा असा सर्वमान्य बेत असे. अगदीच मोठा माणूस असला तर सांज्याऐवजी बुंदी येव्हढाच फरक.
शेतातच एका बाजूला खाली पाले घालून पत्रावळींवर शेकडो लोकांच्या पंगती उठत असत.
स्वैपाकी लोक आदले दिवशी रात्रीपासून तयारीला लागत. पहिले काम मोठ्या पातेल्यात आधण उकळणे. नंतर भात , भाजी, आमटी एकीकडे सांजा असे करायला घेत. मोठ्या पंगतीत रवा भाजणे वगैरे चैन परवडत नसते.
मोठ्या पातेल्यात रवा शिजवून घ्यायचा. नंतर त्याला मध्ये भोक पाडून त्यात (तूप खरे म्हणजे डालडाच) तापवून भरायचा आणि झाकून ठेवायचे. म्हणजे मस्त घमघमाट सुटतो. तो मग गुळाच्या आधणात घातला की झाला सांजा तयार.
च्यायला कसला भारी सांजा करतोय अशी दाद मिळते. मग तो कोरडा व्हावा म्हणून कधी धोतरांवर पसरुन ठेवत.पाहिजे तसा काढून घेत.
खरे खाणारे दर्दी असले गोड पदार्थ खातच नाहीत . पोळी, चार वांगी खाऊन कणभर भात , आमटी तोंडी लावून कट मारुन पसार होतात.
असा असतो सांजा. परवा काय झाले. काहीतरी खाणे झाले होते. थोडी खिचडी होती. तीला पुरक म्हणून एखादा पदार्थ करावा म्हटले.
पदार्थ करण्याआधी सामुग्री वगैरे आहे की नाही हे पाहण्याची अर्थात माझी पद्धत नाही. आळस आणि मारून नेण्याची वृत्ती . त्यामुळे नवीन नवीन शोध लागतात हा भाग वेगळा.
शीरा करावा थोडासा , असा मुळ विचार होता. छोटे पातेले ठेवले गॕसवर. चमचाभर तूप टाकले. ते तापायला लागले. जरासा धूर यायला लागला. जळू नये म्हणून गॕस बारिक केला. नंतर लागलो रवा हुडकायला.
फ्रीझ ऊघडला. तर रव्याच्या पिशवीत अर्धी मुठ रवा शिल्लक. आता चालू केलेले बंद कसे करायचे. तेव्हढाच रवा लागलो भाजायला. त्याला काय लागली असतील दोन चार मिनीटे. आता तोही तापून काळेपणाकडे जायला लागला. आता काय करावे. काहीतरी करुन हा वाढवला पाहिजे.
दुसरा एक डबा ऊघडला. त्यात बेसन दिसले. रवा बेसनाचे लाडू चालतात तर शीरा का चालू नये? असा गोड विचार मनात आला. चांगले एक, दीड मुठी बेसन रव्यात घातले. त्याची काही या मिश्रणाला हरकत दिसली नाही.
ते दोन्ही मिळून छान परतले. आता पाणी नंतर साखर घातली की झाले. पण आता परत धोका पत्करायला नको. साखर पाहिली. ती खच्चून दोन चमचे शिल्लक .
जाउदे आता शीरा नको. सांजाच करु म्हटले. नशीबाने गूळ होता. तो चांगला मुठभर घेवून आधणात टाकला. मधूनमधून ढवळून घेतला. झाकून ठेवला. वास तर मस्त येत होता.
आपणच पहिल्यांदा खाणे चांगले नाही. कोणीतरी यावे असे वाटत होतेच. येव्हढ्यात मित्राचा फोन आलाच. " महत्वाचे काम आहे. येऊ का रे दोन मिनीटे.?"
ये ,ये , मी वाटच बघतोय. वाट कशाला बघतोय असे त्याला वाटले म्हणाला. त्याचे काम पाहिले. प्रथम खिचडीची ताटली त्याच्यापुढे ठेवली. " मी खिचडी खात नाही. मला त्रास होतो. " येव्हढीशी खा. म्हटले. ती छानच होती.
नंतर त्याला हायब्रीड दिला. "काय केलयस रे हे ?" अरे खाऊन तर बघ. म्हटले. त्याला ते रसायन फारच आवडले. सगळे सांगितल्यावर माझ्या आईने एकदा असे केले होते त्याचीआठवण झाली म्हणाला. पण त्याने खाल्लेला खरा सांजाच होता. हायब्रीड नव्हता. ते सांगितल्यावर चकीत झाला.
तो केटरींग करतो. " तू कर एकदा कार्यात असा प्रकार. " म्हटल्यावर म्हणाला. " मी करीन रे. पण खाणार कोण?"."असेच आहे बघ नवीन शोधांचे. उद्या कदाचित घरोघरी लोक मुद्दाम हा पदार्थ करतील. तेंव्हा माझे नाव निश्चितच घेतील म्हटले. तो गेला.
नंतर मी पदार्थाची चव घेतली. ती खरेच भारी झाली झाली होती. असा झाला जन्म हायब्रीड सांजांचा आणि मी धन्य झालो.
Comments
Post a Comment