जामीन................................
रविवारचा दिवस. नऊ, साडेनऊ वाजलेले. अजून आॕफीस भरलेले नव्हते. म्हणजे पक्षकार येऊन भराभर कामे सुरु झाली नव्हती.
आमच्या आॕफीसला मुख्यत्वे दिवाणी कामेच जास्त असायची. आमचे सिनीअर दादासाहेब खंबाटे विख्यात वकील. एखादे काम आले की अगदी सुप्रीम कोर्टापर्येंत जावे लागले तरी पिच्छा सोडत नसत. बोलायला मिठ्ठास, स्मरणशक्ती जबर. लक्ष्मी प्रसन्न होती. ते खूपच समाधानी असत.
मी आणि माझा मित्र काका साखरे दोघेच ज्युनीअर होतो. काही वाचन करत बसलो होतो . नेहमीप्रमाणे दादा आले. दोन चार पक्षकारांनी नमस्कार केला . कामाच्या चौकशा , तारखा सांगणे वगैरे चालू झाले.
पाचच मिनीटात एक पांढरी अँबेसेडर आॕफीससमोर आली. तीच्यातून दोन, तीन पांढऱ्या कपड्यातील व्यक्ती भरभर चालत आॕफीसात आल्या. नमस्कार , चमत्कार झाले.
एका व्यक्तीने सांगितले की त्यांच्या एका नातेवाईकाविरुद्ध ऊत्तर प्रदेशातील एका न्यायालयाचे पकड वाॕरंट आले नाहे. पोलीस ते बजावणार आहेत. बर त्या नातेवाईकांचे म्हणजे "धरमशेठ "चे दुकान पोलीस स्टेशन समोर. येताजाता पोलीस त्यांना बघत, भेटत, रामराम करत. त्यामुळे पंचाईत. नेहमीच्या पद्धतीने पोलीसांनी मेहरबान होऊन काही तासांची मुदत दिली होती. दोन वाजेपर्येंत कोर्टाची आॕर्डर आणली तर ठीक , नाहीतर तीनच्या गाडीने धरमशेठला ऊचलण्याची तयारी होतीच.दादासाहेबांनी आमच्याकडे पाहिले. काका म्हणाला त्याला जरा कोठे काम आहे. मग नाईलाजाने माझ्यावरच ती पाळी आली.
हळूहळू कामे करत असलो तरी वेगळे एकट्याने करायचे काम. ठीक झाले तर बरे नाहीतर धरमशेठ आत. दादासाहेबांनी समजावले. धीर दिला. त्या लोकांना अर्ध्या तासांनी यायला सांगितले .
नेमके त्या दिवशी आमच्या आॕफीसचे कारकून आले नव्हते. सीआर. पी.सी. चे पुस्तक काढले. वाॕरंट, ते रद्द करणे. दुसऱ्या न्यायदंडाधिका-यांचे वाॕरंट रद्द करता येते का शोध घेतला. तर अशी तरतूद सापडली की मुख्य न्यायदंडाधिकांना असे वाॕरंट रद्द करता येते. चला एक प्रश्न मीटला.
आता मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे जायला हवे. अर्ज करायला हवा. कारकून नाहीत. नाहीतर ते मामा लगेच अर्ज करुन देत. तोवर गाडी आलीच. दादांनी काम पूर्ण करुनच यायचे असे बजावले होतेच .
गाडीतून मामांच्या घरी गेलो. ते लेंगा सावरत बाहेर आले. "आज का नाही आलात हो?" विचारले. तर ते ताप आलाय म्हणाले. आता त्यांना कशाला त्रास म्हणून त्यांच्या घरात बसूनच जामीनाचा अर्ज लिहीला. त्यांना धरमशेठच्या भावाकडून थोडे पैसे दिले. त्यांनीच अर्ज करुन दिला आहे सांगितले .
सुदैवाने धरमशेठच्या भावाला म्हणजे मंगलशेठला कोर्ट वगैरे बरीच माहिती होती. "वकीलसाहेब जमेल ना तुम्हाला? का आणखी कोणाला घेऊया. " आता मलाही ऊत्साह येऊ लागला होता. "न जमायला काय झालेय. साधे जामीनाचे काम तर आहे." मी अशा प्रकारची कामे रोज करत असल्यासारखे सांगितले . प्रत्यक्षात माझे तसले पहिलेच काम होते. दिवाणी कामे करणा-यांना फौजदारी कामे ऊगाचच किरकोळ वाटत असतात.
रविवार असल्यामुळे साहेब कोर्टात नसणारच होते. कात्रेसाहेब मुख्य न्यायदंडाधिकारी आहेत एव्हढे ऐकले होते. ते साधारण कोठे राहतात माहिती होते. कोट घालून गेलोच होतो. विचारत विचारत साहेबांच्या घरापाशी गेलो. बेल वाजवली. साहेबांनीच दार ऊघडले. बसायला सांगितले . बसलो. सगळी हकिकत सांगितली. नड सांगितली. नशीबाने मंगलशेठने प्रकरणाची माहिती घेतली होती. केस नंबर, कोर्टाचे नाव ,गुन्ह्याची कलमे माहिती होती . साहेब म्हणाले "माझ्या कोर्टात जाऊन बसा, मी येतो. " जवळजवळ बारा वाजत आले होते. साहेबांना कोठेतरी जायचे होते. जाता जाता ते काम करण्यास तयार झाले.
आम्ही गाडीतून कोर्टात गेलो. साहेब आले. चेंबरमध्ये बसले. मी परत कॕसेट वाजवली. "तुम्ही नुसते वाॕरंट रद्द करा. आम्ही जामीन देतो. पुढील तारखेला त्या न्यायदंडाधिका-यांपुढे हजर होतो." साहेबांनी बाहेर थांबायला सांगितले .
सांगून तर झाले. आता साहेब हुकूम काय करतील. छातीत धकधक चालू होतीच. चांगली पंधरा मिनीटे गेली. शिपाई आणी भाऊसाहेब बाहेर आले. "साहेबांनी पाच हजाराचा जामीन द्यायला सांगीतला आहे.जामीन कागद कुठे आहेत?" माझा जीव भांड्यात पडला. कोण कुठला धरमशेठ त्याला पाहिला सुद्धा नव्हता. पण त्याला आता अटक होणार नाही समजुन मीच खूष झालो होतो.
जामीन कागद आॕर्डरला आणायला सांगून साहेब गेलेसुद्धा. त्या भाऊसाहेंबाच्या मदतीने कागद भरले. जामीनदाराला बोलावले. ऊतारे जोडले. आता त्याला साहेबांपुढे ऊभे करायचे. येव्हढ्यात समजले की सर्व साहेबांचे कोठेतरी जेवण आहे. कात्रेसाहेब तिकडे गेले. सव्वा वाजून गेला. अर्धा पाऊण तास आमच्याकडे होता. पण अजून दोन कामे व्हायची होती.
मंगलशेठ बरोबरच्या दोघांना खाली ऊतरवले. मी, मंगलशेठ , जामीनदार आणी देशपांडे भाऊसाहेब ,कात्रेसाहेब जाणार होते तिकडे गेलो.
ते जवळचेच एक मंदिर होते. बरेच साहेब लोक दिसत होते. मी आणी देशपांडे पुढे गेलो. मी एका दरवाज्यामागे थांबलो. साहेब दिसताच देशपांडेनी हळूच साहेबांना येण्याचे कारण सांगितले . साहेबांनी कागद मागीतले. मी पुढे झालो. "जामीनदार आणलेत" सांगितले . साहेबांनी देशपांडेना "पाहिलेत ना?" विचारले. त्यांनी हो सांगितले .येव्हढ्यात मोठ्या साहेबांची गाडी आली असे कोणी म्हणाले. साहेबांनी जामीन स्वीकारल्याची सही केली. पोलीस स्टेशनचे पत्र घेतले. आणी आम्ही पळतच गाडीत बसलो. ड्रायव्हरने शिताफीने पंधरा मिनीटांत गाडी पोलीस स्टेशनसमोर आणली.
ईंन्स्पेक्टर साहेबांना परत सगळे सांगितले . कोर्टाची आॕर्डर पाहिली तरी "हेही कोर्टे काहीही आॕर्डर करतात "म्हणालेच. "त्यांच्या कुठे नादाला लागा" म्हणत मी निघालो. धरमशेठ अटकेपासुन वाचले.
पूढे त्या केसचे काय झाले काही समजले नाही. ठरलेली फी घेतली. मी घरी गेलो. दादासाहेबांना वृतांत सांगितला. ते खूष झाले. "असेच काम करत जा. " म्हणाले. पुढे बरीच फौजदारी कामेही चालवली पण तो जामीन कधीच विसरणे शक्य होणार नाही.
Comments
Post a Comment