गिरणी ............................
काॕटन मील, स्पीनींग मीलला सुद्धा गिरणी म्हणतात. मला अभिप्रेत आहे ती आपली साधी पिठाची गिरणी. तीचा काहीजण चक्कीसुद्धा म्हणतात.
आहे काय त्या गिरणीत येव्हढे? असा प्रश्न साहजिकच कोणाला पडू शकेल. पण सगळ्याच गोष्टी कुतूहलाने , आवडीने पाहणाऱ्यांना कशातही पहावेसे वाटू शकते.
गिरणीत जाणारे लोक ठराविक असतात. लहान मुले, एखादी ताई, कधी आईने ताईबरोबर पाठवले म्हणून जाणारा मुलगा आणि मुख्यत्वेकरून स्त्रिया गिरणीत जात असतात. तसे पुरुषांना तिथे जायला काही बंदी नसते. पण फार पुरुष जात नाहीत हे खरे. काहींना तो कमीपणाही वाटत असेल.
अलिकडे सगळी पीठे तयार मिळत असल्याने गिरणीचे मार्केट जरा कमी झाल्यासारखे वाटत आहे. तरी तीची कधी गरज पडेल सांगता येणार नाही.
लहानपणापासून मी आवडीने गिरणीत जात आलो आहे. अगदी पाच , दहा पैसे किलो दळण होते तेंव्हापासुन म्हणा ना. आता ते सामान्यतः पाच रुपये काही धान्यांसाठी सहा सात रुपये किलो झाले आहे.
त्यात मिरच्यांपासुन तिखट करणारे दोन , चार पहारींचा डंक हा एक प्रकार असतो. तेथे तिखट वास असल्याने प्रत्यक्ष काम असलेल्यांशिवाय कोणी जात नाही. एखादी मावशी छोट्या झाडणीने झाडताना दिसते.
सकाळपासून येव्हढी दिवसभर गिरणी चालवून मिळणा-या सुट्या पैशात यांचे भागते कसे? असा प्रश्न मला सतत पडत असे. अजूनही पडतो. तरीही परवडत नाही म्हणून गिरणी बंद झालेली दिसत नाही. जसे कितीही रेडीमेड, ब्रेंडेडचा जमाना आला तरी टेलरींग दुकाने चालतातच तसेच हे असावे. अजूनही टेलर्सच्या दुकानात कधीही जा शिवलेले भरपूर कपडे टांगलेले दिसतातच. दिवाळीच्या एक दोन दिवस आधी ते आॕर्डर घेतच नाहीत.
गिरणी ही अशीच , कायम जुनीच असते अशी वास्तू असते. नवी गिरणी काढलेली कधी दिसत नाही पण काढली तरी ती पाहता पाहता जूनी होत असेल यात शंका नाही.
सर्व गिरण्या , गिरणीवाले सोडता, सारख्याच दिसतात. तेथे तीन चार फक्त तारखा दाखवणारी कॕलेंडरे असतात. ती कोणासाठी असतात ते कळत नाही. गिरणीवाल्यांचे काही हिशेब लिहायला ती ऊपयोगी पडत असतील. बाकी गिरणीत सर्वत्र ऊडालेल्या पीठाशिवाय व कोप-यातील कोळीष्टकांशिवाय काही दिसायचे नाही. चुकून एखाद्या ठिकाणी एखाद्या देवाचा फोटो दिसेल बस्स .
गिरणीवाल्यांना स्वच्छतेची आवड नसते. संध्याकाळी काम संपल्यावर बिचारे हात, पाय , तोंड , केस सगळीकडे भरलेले पीठ झाडून घरी जातात.
सतत हालणारी गिरणीची यंत्रे , पट्टे असल्यामुळे कोणत्याही गिरणीत फरशी दिसत नाही. ती घातली तर टिकणारही नाही हे कारण असेल. जरा जागा असेल तर गिऱ्हाईके उभी राहतात तेथे फरशी , एक फळी डबे ठेवण्यासाठी असते.
क्वचित एखादा पेपर असतो. पीठ ऊडाल्यामुळे तो त्या दिवसाचा असला तरी वाटत नाही. वेळ असला दळप व्हायला तर चाळायचा येव्हढाच त्याचा ऊपयोग असतो.
खडुशिवाय गिरणीवाल्याचे अजिबात चालायचे नाही. "दळणाचे दर एक जानेवारी एक जुलैपासून बदलले " येव्हढे लिहीण्यापुरताच त्याचा ऊपयोग असतो. त्यांच्या लेखी तेच खूपच महत्वाचे असते .
गिरणी चालवणारे सहसा मालक नसतात. ते बहुतांश वेळा जाड कापडाच्या शक्यतो खाकी रंगाच्या हाफ पँट,जास्तीतजास्त लेंगा, पुर्वी बनीयन आता निळसर रंगाचे शर्ट घालतात.
दोन, तीन गिरण्या असतात. कधी एखादी कधी सर्व चालू असतात. वरुन धान्य पडण्याच्या जागी जाळी असते. तरीही ते मध्ये हात घालतात. एक पाय वाकवून गिरणीवरच ठेवतात. धान्य संपत आले की खालचा डबा, पिशवी भरुन झाल्यावर बाजूला सरकवतात.
काही ठिकाणच्या स्त्रिया अती चिकीत्सक असतात. त्या अगदी पीठ पडते त्या तोंडाजवळ बसतात. एखादी बारीक काटकी घेतात आणि त्या तोंडात घालून आपल्या धान्याचे कणभरही पीठ वाया जाऊ नये असे पाहतात.
अशा वेळेवर गिरणीवालेही एखादी रबरी स्लीपर घेऊन वरुन गिरणीवर फटाफटा मारतात. मग खात्री झाल्यावर त्या आजी मावशी उठतात आणि समाधानाने डबा घेऊन घरी जातात. खानावळवाले, मोठ्ठी घरे असणारे , हाॕटेलवाले यांचे भरपूर पन्नास पन्नास शंभर किलो दळण असते. ते फारच काटेकोर असतात.
लाईट बंद असायच्या दिवशी गिरणीवाले दुरुस्ती काढतात. मग पट्टा काढुन गिरणी खोलुन आतील जात्याला टाकी लावतात.
पुर्वी गिरण्या आॕइल इंजीनवर चालत. त्यांचा विशिष्ठ पटपट आवाज येत असे. त्यानंतर विजेवर गिरण्या चालु लागल्यावार आवाज कमी झाले असतील. उभ्या जात्याच्या जागी आडवी जाती आली.इकडेतिकडे उडालेले पीठ सक्शन करणारे पाईप दिसू लागले . लगेच गिरणी वाल्यांनी तयार पीठ विक्रीची दुकाने चालू केली. त्याचे रहस्य तेच असावे. काही ठिकाणी साऊंड प्रुफ गिरण्यासुद्धा निघाल्याचे ऐकले होते.
गिरणीत पडलेले सर्व पिठांचे मिश्रण असलेले पीठ वडे, भजी यांना फार चांगले म्हणून हाॕटेलवाल्यांच्या फार आवडीचे असे म्हणत असत. "येथे पीठ दळून मिळेल" असा बोर्डही वाचल्याचे आठवते पण गिरणीवाल्यांना त्यात फार मोठी चूक वाटत नसावी.
जन्मभर आपण ज्यांच्यामुळे खातो त्या या अन्नदात्याचे स्मरण करावे वाटले एव्हढेच..
Comments
Post a Comment