सिंधूकाकु..............................................

 वाड्यातील काही पुरुष पात्रांबद्दल व आजीबद्दल लिहील्यानंतर काही स्त्री पात्रांची ओळख करुन देणे आवश्यक वाटले त्यापैकी सिंधूकाकु हे अत्यंत महत्वाचे पात्र ठरेल.

ती आमचे काका वसंतराव यांची पत्नी. ते रहायचे विलेपार्ल्याला. काका महानगरपालिकेच्या पाणी खात्यात कामाला होते. तर काकू महानगरपालिकेच्याच प्राथमिक शाळांत शिक्षीका. त्यांना मुलेबाळे नव्हती.
सिंधूकाकुचे माहेर कोकणात दापोली ,वाकवली जवळच्या तेटवलीचे. पुर्वी तेटवलीला जाणेसुद्धा सहज सोपे नव्हते. चिपळूणपर्येंत किंवा दापोलीपर्येंत बस असत. तेथून वाकवली व चालत तेटवली असा प्रवास असे.
काकूची आई, तीला मोठी आई म्हणत ती एकटी रहायची. शेत , झाडे सांभाळायची. ती चांगली वैद्य होती. आयुर्वेदिक औषधे अगदी डाग वगैरे सुद्धा देत असे.
सिंधूकाकुने तीच्या कोकणच्या ऊन्हाळ्याच्या फेरीत आम्हा सर्वांना तिकडे नेऊन आणले होते. कोकणात निसर्ग छान आहे म्हणतात म्हणजे काय ते समजत नसे. आकर्षण होते फणस, काजु खाण्याचे आणि विंचू पाहण्याचे. ते बरेच दिसत. त्यांना सहज मारुन टाकत. तेथे रेडिओ थोडासा लागत असे. काही काम , खेळ, गप्पा यात वेळ जाई. लाईट नव्हते.
कोकणातुन येताना काका काकू मोठे फणस आणत. ते फोडण्याचा कार्यक्रम असे. कोकणातील असल्यामुळे सिंधूकाकु आणि तीची बहीण मालुताई यांचे भरपूर नातेवाईक , ओळखीचे मुंबईत सर्वत्र पसरलेले होते. त्यांच्या कुटुंबीयांसह सर्व माहिती त्यांना तोंडपाठ असे. त्यामुळे गप्पा निघाल्या की कधी संपतील ते सांगता येत नसे. ते सुद्धा तीच्याकडे येत जात असत.
कधी कोणती कामे याचे गणित ठरलेले असे. मार्च , एप्रील धान्ये वाळवणे, साठवणे. लोणची , पापड करणे. नंतर कोकणातून किंवा डायरेक्ट मिरज. एक काका सुटता सुटता गाडी धरत तर हे गाडीच्या वेळेच्या तास दिडतास आधी पोचत.त्यांना काकुच सांभाळत असे.
शिक्षीका असल्यामुळे शिस्त हा सिंधूकाकुचा स्थायीभाव होता. तो जरा जास्तच कडक होता. त्यामुळे लहानपणी सगळ्यांकडुन तीसपर्येंत पाढे म्हणून घेणे हा तीच्या आवडीचा विषय होता. वड्यासुद्धा आणायची त्या आल्ल्याच्या. तब्येती चांगल्या असल्या पाहिजेत इकडे कटाक्ष असे.
ती शाळेत जातांना पाचवारी तर घरी नऊवारी साडी नेसत असे. ती ऊंच, करारी ,ताठ स्त्री होती.आवाज वर्गभर पोचण्यासाठी खणखणीत . सगळे करायचे ते ताबडतोब आणि ऊत्तम असा तीचा दंडक असे.
तसा संगीताचा तीचा संबंध नव्हताच असे नाही. जयवंत कुलकर्णी तीच्या घराजवळच रहात. रामदास कामत येता जाता दिसत. सी. आर. व्यासांचे विद्यालय जवळच होते. अगदी पु.ल. सुद्धा पुर्वी चिमण्या रामाजवळ कोठेतरी रहात होते. नाट्यसंगीत ऐकायला ती जात असे. पण मुख्य आवड वेगवेगळ्या विषयांवर सतत वाचन आणि भाषणे ऐकणे. लोकसत्तेतल्या अग्रलेखांची पारायणे करण्याचे ते दिवस होते. मुलांकडुन मोठ्याने अग्रलेख वाचुन घेतले जात.
रेडिओवर सकाळपासून रात्रीपर्येंत सर्व भाषांतल्या बातम्या कशाला ऐकतात हे लोक, असा आम्हाला नेहमीच प्रश्न पडे. नंतर गाण्याचा कार्यक्रम असला की रेडिओची मान पिरगाळली जाई. ते मला नको होई.
सिंधूकाकु व काकांनी गरजा कमीतकमी ठेऊन शक्य होईल त्या सर्वांना, शक्य होईल ती सर्व मदत सतत केली. त्याबद्दल कणभराची वाच्यता न करता. हाच कर्मयोग असतो. त्याला वेगळे साधन लागत नाही.
अगदी कामवालीलासुद्धा रोज घासातला घास ती देत असे. आम्हा सर्व भावंडांच्या शिक्षणाला त्यांनी खूप मदत केली. अट एकच असे ,जमेल ते शिक्षण प्रामाणिकपणे पूर्ण करणे. काम करणा-याला जगात काहीही कमी पडणार नाही हा विश्वास होता.
कडक माणसांचे कलाप्रेम तसेच असते. सिंधूकाकुने दोन मोठे गालीचेसुद्धा केले होते. ते मोर आणि वाघ यांची चित्रे असणारे.परंतु ते गोणपाटावर काही कापड घालून केल्यामुळे फारसे वापरले गेले नाहीत तरी टिकले भरपूर . एकूणच तीचा प्लॕस्टीक आणि टिकाऊपणावर फारच विश्वास होता. कपडेसुद्धा चांगले घळघळीत शिवायला सांगत असे.
कोणत्याही गावी गेले की तिथल्या पाहुण्यांना आठवणीने भेटत असे. पत्रव्यवहार करत असे. महानगरपालिकेच्या शाळेत झोपडपट्टीतली मुलेही येत. ती आवर्जून मुलांचा पाया पक्का व्हावा म्हणून लहान मुलांचे वर्ग घेत असे. जवळपास शाळा असता चालत किंवा लांब असता बसने जात असे.
सर्व व्याख्यानांना जात असे. आवर्जून पुस्तके विकत घेत असे. वाचत असे. चर्चा करत असे. सामाजिक संस्थांना भरपूर मदत करत असे.
काका काकू रिटायर्ड झाल्यावर मिरजेला आले. आम्ही मुले सतत मजेच्या मुडमध्येच असू. ते तीला आवडत नसे. "मज्जा तेव्हढी आम्हाला सांगू नका. " असे म्हणायची. जेवणात आग्रह केलेला तीला अजिबात खपत नसे.
शेवटी ती परत मुंबईला गेली. काका गेल्यानंतर , मुले मोठी झाल्यावर तीच्या कडकपणाची जागा काळजीने व प्रेमाने घेतली. आता तीला मुलांचा अभिमान वगैरे वाटू लागला.
गुढगे दुखत. वाट्या बदलल्या. आता ती काठी घेऊन चालू लागली. "कशी आहेस ?" म्हटल्यावर " मी ठणठणीत. मला काय झालेय?" हे पाय फक्त हालू देत नाहीत" म्हणायची.
तशी हिंडता फिरता ,थोड्याशा आजाराचे निमीत्त होऊन ती गेली. शेवटी देहाचेसुद्धा दान देऊनच. जन्मभर शिस्तीने , ताठपणाने
जगली आणि गेलीही तशीच कोणाला कणभरही त्रास न देता.

Comments