एक घर घेताना.................................

 काही मित्र मजेत सांगायचे "आम्ही पुण्यात घर घेतल. चाळीस, पंचेचाळीस लाख पडले. " कोणी म्हणायचे "आम्ही मुंबईत घर घेतल. फार आश्चर्य वाटायच. हे लोक पुणे, मुंबईत घरे कशी घेतात, कशाला घेतात. आपल्यालाही तसे करावे लागेल, करता येईल असे कधीच वाटत नव्हते .

मुलाच्या लग्नाबाबत कुणकुण लागली. आता त्याला पुण्यात घर म्हणजे फ्लॕट लागेल. तेंव्हा काही करावेच लागेल. मग सुरु झाल्या चौकशा. प्रथम घर घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते असे समजले. मग ते फाॕर्म आणणे. ते भरणे. फ्लॕट पाहणे.
सुरवात तर केली. साईटस असतात असे कोणी म्हणाले. ते काही जमले नाही. मग ओळखीत सांगणे. मुलाबरोबर जाऊन दोन तीन फ्लॕट पाहून आलो. त्यांच्या किंमती व अंतरे पाहून ते काही जमेना.
शेवटी होणारी सुनबाईच मदतीला धावली. पुण्यात शनीवार पेठेत अगदी मध्यवस्तीत एक फ्लॕट होता. मालक गोडबोले सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले होते. ते दुसरीकडे रहायला गेले होते. म्हणून त्यांना फ्लॕट विकायचा होता. चांगली सोसायटी , चांगली जागा त्यामुळे लगेच पसंत पडली.
मग किंमत. त्यातही फारशी घासाघीस न होता मनात खूप किंमत असताही आजोबा पन्नास लाखाला तयार झाले. मी किती पैसे आहेत, ऊरलेले कसे ऊभे करायचे याचा विचारही न करता "हो. जरुर ." म्हणालो. निदान फाॕर्ममध्ये भरायची माहिती तर तयार झाली.
नोकरीच्या गावी परत आलो. आॕगस्ट महिना ऊजाडला होता. आजोबांना काही कारणासाठी डिसेंबरच्या आत व्यवहार पूर्ण करायचा होता. पैशांची जमवाजमव. नोकरीची तीनच वर्षे राहील्यामुळे आणी पेंशनमधून हप्ता घेता येत नसल्यामुळे बँका कर्ज देऊ शकत नव्हत्या . वित्त संस्थांकडे चौकशी. ती कामे करणारेही एजंट असतात. अशाच एका संस्थेचा एक एजंट संजय माने भेटला. त्याला भेटलो.
सर्व माहिती सांगितल्यानंतर तो तयार झाला. परत त्यांच्याकडे अर्ज. कागदपत्र, ऊतारे, पगाराचे दाखले देणे झाले. घराच्या किंमतीबाबत ईंजीनिअरचा दाखला सगळे देऊन झाले.
आॕफीसकडून परवानगी आली की झाले. ब-याच दिवसानंतर आॕफीसकडुन ईंजिनिअर दाखल्यातील किंमत व ठरवलेली किंमत यातील फरकाबाबत विचारणा झाली. त्याचेही समाधान आजोबांकडून पत्र घेऊन केले.
मालकांकडून सतत विचारणा व्हायची "आॕक्टोबर संपत आला. कधी होणार काम?" "लवकरच होईल. तुम्ही काही घाबरु नका " सांगत होतो. पण मलाच काम होईल की नाही ही धाकधुक होतीच.
पुन्हा संस्थेकडुन मालकांना आम्ही द्यायचे पैसे पाच लाख दिलेच नसल्याची आठवण करुन देण्यात आली. ते फारसे अवघड नव्हते.तो चेक देऊन एक कागद करुन आलो. तो दिल्यानंतर परत सोसायटीकडुन ना हरकत दाखला आणा म्हणाले. सोसायटीचे सेक्रेटरी "असा दाखला कोणीच मागत नाही." म्हणाले. हो ना करता एकदा दाखला दिला. तर संस्थेला वेगळ्या नमुन्यात हवा म्हणाले. "तुम्ही काय काय पाहिजे, ते एकदाच का सांगत नाही?" म्हणालो. त्यांनी नमुना दिला. येव्हढा दिला की संपले म्हणाले. सेक्रेटरी वैतागले. परंतु एकदा हवा तसा दाखला दिला.
नोव्हेंबर चालू झाला. अखेर एकदा संस्था तयार झाली तीस लाख द्यायला. हप्ता ठरला. सगळे झाले. परवानगी काही आली नव्हती.
एकदाची डिसेंबर बावीस का चोवीस तारखेला परवानगी आली. काही पैसे प्राॕव्हीडंट फंडातून काढले. काही बचत वापरली. संस्थेला व संजयला फोन केला. दोन चार दिवसांची सुटी काढली. पुण्याला रवाना झालो.
दुसरे दिवशी संस्थेत गेलो. कायदेशीर अडचण नसल्याचे त्या खात्याने सांगितले होते. तीन वर्षे हप्ते पगार खात्यातून जातील नंतर थोडा कमी हप्ता द्यायचा अशा अटी होत्या.
प्रकरण पुढच्या म्हणजे चेकच्या खात्यात जायचे होते. संध्याकाळपर्येंत वाट पाहिली. चेकच्या मशीनमधुन भराभर चेक निघत होते पण आमचा चेक त्यात नव्हता. सगळे आॕफीस नाताळच्या सुटीच्या मूडमध्ये होते. "आता काय करु". "आता परवा असे या असे साचेबंद उत्तर आले.
वकिलांकडे गेलो. कराराचा कागद करायचा होता. रजीस्ट्रार आॕफीसच्या सुट्या पहायच्या होत्या. सुदैवाने त्यांना फार सुट्या नव्हत्या. शेवटी अठ्ठावीस तारीख धरली.
तीसरे दिवशी सव्वीस तारीख. परत आॕफीस . नशीबाने प्रकरण पूढे सरकले होते. "आज चेक होणारच म्हणाले".सकाळ, दुपार संपली. शेवटी आॕफीस बंद होता होता चेकची झेराॕक्स प्रत ताब्यात दिली. सह्या घेतल्या. मुळ चेक मालकांच्या नावे करारपत्र, इंडेक्स, दिल्यावर देतात म्हणाले. "बर, तसे तर तसे. " घेणा-याला बोलायचा अधिकार थोडाच असतो.
काम झाले म्हणून मस्त आनंदात होतो. आजोबांना सारखे फोन करुन सांगत होतो. त्यांना समाधान वाटत असावे. दोन साक्षीदार हवेत. त्यांना सांगितले . कसे जायचे, किती वाजता जायचे सगळे ठरवले. आजोबा परस्पर रीक्षेनेच येणार होते.
आणि अठ्ठावीस तारीख ऊजाडली. साडू गावी गेल्याने त्यांच्याकडे रहात होतो, मुले खोलीवर रहात होती. आवरले. सगळे आले. वकिलांना फोन केला. तर ते मुंबईला गेलेले. आता कसे होणार. ते म्हणाले,"माझ्या सहका-याला सांगितले आहे. ते आॕफीसातच भेटतील. " चला बरे झाले म्हटले.
गाडीवर बसणार येव्हढ्यात कंपनीचा मेसेज " युअर लोन प्रपोजल आॕफ सिक्स्टीन्थ डिसेंबर इझ कँन्सल्ड. " मेसेज परत परत वाचला. डोक्यावर बाँब पडल्यावर किंवा पायाखालची जमीन सरकल्यावर कसे होईल तसे झाले. अरे असे होईलच कसे. माझ्याकडे कंपनीने दिलेल्या अठ्ठावीसच्या चेकची प्रत आहे तर प्रपोजल कँन्सल कसे होईल.
परत कंपनीत फोन केला. नशीबाने संबंधित बाई लगेच भेटल्या. विचारले "ह्या मेसेजचा अर्थ काय. माझ्याकडे चेकची प्रत तुम्हीच दिली आहे." तर थंडपणे म्हणाल्या "सव्वीसचे मूळ प्रपोजल होते, ते कँन्सल झाले. अठ्ठावीसचे आहे. " मग म्हटले"तो मेसेज कुठे आहे?" "तो आत्ता पाठवणार आहे. " छान कामे करता, आमचा जिव जायची वेळ आलेली. " हे सगळे जमवलेले संपले तर काय. खुलाशाने बाँब फुसः झाला. गाडी सुरु करायला सांगितले .
आॕफीसला गेलो. सगळे आलेले. वकिलांचे सहकारी भेटले. सगळे पाहिले. साहेबांनी काम करुन दिले.काॕपी ठेवली. आता इंडेक्स. तिकडे गेलो.तर प्रींटर बिघडला म्हणाले. फार कामाने तो प्रींटर सारखाच बिघडतो म्हणे. दहा वीस मिनीटे फिरुन या. चहापाणी केले. साक्षीदारांचे काम संपले होते. त्यांना परत पाठवले.
परत आॕफीस . प्रींटर महाराज सुरु झाले होते. इंडेक्स घेतला. आता खरोखरच काम संपले होते.
आजोबांनी मोठ्या मनाने फ्लॕटची किल्ली दिली. ताबा घेतला. आनंदाने साफसफाई केली.नारळ फोडला पुजा केली.
दुसरे दिवशी परत कंपनीत जाऊन करारपत्र, इंडेक्स प्रत दिली. चेक घेतला. आजोबांच्या खात्यात जमा केला. एकोणतीस, तीसला म्हणजे कोर्टाच्या पद्धतीने मुदतीच्या एक दिवस आधी खात्यात पैसे जमा झाले.
आजोबांची मुदत गाठली गेली. ते त्यांच्या कामाला रिकामे झाले आणि मी हप्ते भरायला.
यथावकाश तीन वर्षांतच सर्व हप्ते भरले. कंपनीने ऊरलेले सर्व हप्ते अगदी विमा ऊतरवल्याचे कागद भांडल्यानंतर दाखवून, त्यासह वसूल केले. आम्ही आमचे कागद ताब्यात घेतले . एक घर घेतानाची गोष्ट संपली आणि आम्ही घराचे मालक झालो....

Comments